मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग ८

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 2
4 Min Read

मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग ८ –

प्रशासकीय अधिकार, नियम व शिवकालीन मुद्रा –
१. प्रशासकीय अधिकार व नियम –
​मराठा साम्राज्यात छत्रपतींच्या आज्ञेने चालणाऱ्या राज्यकारभारात शिक्का व मोर्तबाचा वापर अत्यंत नियमबद्ध आणि शिस्तबद्ध रीतीने केला जात असे.
अंमल व अधिकाराची मर्यादा –
​छत्रपतींची पूर्वपरवानगी – शिक्का व मोर्तब राजाच्या स्पष्ट परवानगीशिवाय वापरण्याचा अधिकार कोणालाही नव्हता.
अधिकाऱ्यांना अधिकारांनुसार शिक्के-
देशमुख, देशाधिकारी, हवालदार, सुभेदार, प्रांतनिहाय सरकारकून, सेनापती, सहस्त्री, पंचसहस्त्री आणि न्यायाधीश यांसारख्या हुकुमत चालवणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या पदाच्या अधिकाराप्रमाणे शिक्का-मोर्तब दिले जात असत.

सरदारांचे अधिकार –
सरदार मंडळींना त्यांच्या सरंजामाच्या दर्जानुसार शिक्का व मोर्तब वापरण्याची परवानगी होती.
शिक्का व मोर्तब उमटवण्याची पद्धत छत्रपती आपल्या हाताखालील नोकरांना किंवा प्रजेला आज्ञापत्र/हुकूम काढताना कागदाच्या मथळ्यावर मध्यभागी ‘श्री’ काराच्या खाली शिक्का आणि कागदाच्या शेवटी मोर्तब उमटवत असत.
​इतर पत्रव्यवहार –
इतर सामान्य पत्रांवर केवळ मोर्तब केला जात असे.
​
पत्रांचे प्रकार आणि वापराचे नियम –
सनदा, खास हुकमी पत्रे व यादी
यावर छत्रपती शहाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिक्के उमटवले जात.
करार, तह, खुर्दखते व कौलनामे
या पत्रांवर फक्त मोर्तब केला जात असे. तहाच्या व कराराच्या प्रत्येक कलमाकलमावर मोर्तब करणे अनिवार्य होते.
न्यायनिवाडा (महजर)
महजराच्या कागदावर ‘हाजीर मज्यालस’ म्हणून उपस्थित असणारे अधिकारी व वतनदार मंडळी आपापल्या सहीच्या जागी स्वतःचे शिक्के उमटवत असत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासकीय पत्रलेखनाला लावलेले हे वळण पुढे संपूर्ण मराठेशाहीत कायम राहिले. (संदर्भ: साधन चिकित्सा – वा. सी. बेंद्रे, पृ. १४५)
​

२. शिवकालीन अष्टप्रधान मंडळातील प्रधानांच्या मुद्रा –
​शिवकालीन कानूजाबत्यातील नियमानुसार, राजपत्रावर छत्रपतींच्या नावासोबत प्रधानांची मुद्रा असणे बंधनकारक होते. “मुख्य प्रधानांनी राजकार्य करावे व राजपत्रावर शिक्का करावा” असा कानूजाबत्याचा दंडक होता.
​प्रमुख प्रधानांच्या मुद्रा:
​अ. सामराज निळकंठ (इ.स. १६६२ पर्यंत)
वापर: राजपत्र ‘अजरख्तखाने’ या मायन्याचे असेल आणि इ.स. १६६२ पूर्वीचे असेल तर ही मुद्रा आढळते.
स्वरूप: पाच ओळींची वर्तुळाकार मुद्रा.
मजकूर: ​”श्री शिवनरपति हर्षनिदान सामराज मतिमत प्रधान”
बदल – इ.स. १६६२ नंतरच्या मुद्रेत ‘सामराज’ ऐवजी ‘महादेव’ असा बदल करण्यात आला.
ब. मोरोपंत पिंगळे (जून १६७४ नंतर)
वापर – जून १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर मोरोपंत पिंगळे यांची मुख्य प्रधान म्हणून नेमणूक झाली.
स्वरूप- चार ओळींची लंब-वर्तुळाकार मुद्रा.
मजकूर – “श्री शिवराजेंद्र हर्षनिदान त्र्यंबकसुत मोरेश्वर मुख्य प्रधान”
​”श्री शिवराजेंद्र हर्षनिदान त्र्यंबकसुत मोरेश्वर मुख्य प्रधान”
(संदर्भ: शिवछत्रपतींची पत्रे – प्र. न. देशपांडे, पृ. १९ ते ४९)
​

३. शिवोत्तर काळातील छत्रपतींच्या मुद्रा
१. छत्रपती संभाजी महाराज –
​छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा उभट पिंपळाच्या पानाच्या आकाराची असून सात ओळींची आहे.
​
श्री शंभो शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते |
यदंकसेविनो लेखा वर्तते कस्य नोपरि ||
​
अर्थ – शिवपुत्र शंभूची मुद्रा आकाशाप्रमाणे शोभत आहे. या शंभूचा अंकांश्रय करणाऱ्यांचा पगडा कोणावर बसणार नाही! (मराठी रियासत खंड २ पृ. ३२)
२. छत्रपती राजाराम महाराज –
​छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्यकाळात वेगवेगळ्या प्रसंगी तीन मुद्रा वापरल्या गेल्या:
​
पहिली मुद्रा –
मजकूर: “श्री धर्मप्रद्योतिता शेषवर्णा दशरथेरिव राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते”
​
अर्थ – “दशरथपुत्र रामाप्रमाणे राजाराम महाराजांची ही विश्ववंद्य मुद्रा धर्माच्या योगाने प्रज्वलित झालेली असून सर्व वर्ण जिने प्रकाशित होत आहेत.”
​
दुसरी मुद्रा (अनुकरणी मुद्रा) –
मजकूर- “श्री प्रतिपद् चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता। शिवसुनोरियं मुद्रा राजारामस्य राजते॥”
​
वापर – ही मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचे अनुकरण करणारी होती. राजाराम महाराज जिंजीवरून परत आल्यानंतर, पूर्वीच्या काळात दिलेल्या सनदा, वतने व इनामे यांचा पुनर्विचार करून नवीन सनदा जारी करण्यासाठी ही मुद्रा तयार करण्यात आली असावी.
​
तिसरी मुद्रा (प्रारंभिक) –
मजकूर: “श्री राजाराम छत्रपती” (तीन ओळींची मुद्रा)
​वापर- ही मुद्रा राजचिन्ह अधिकृतपणे धारण करण्यापूर्वीच्या काळातील असावी.
​
संदर्भ: अर्वाचीन महाराष्ट्रेतिहास काळातील राज्यकारभाराचा अभ्यास – शं. ना. जोशी, पृ. २१९

राम वाघोले

Leave a Comment