महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 95,25,609

मराठीशाहीतील शिक्का व मोर्तब भाग १

Views: 5
4 Min Read

मराठीशाहीतील शिक्का व मोर्तब भाग १ –

ऐतिहासिक साधनांपैकी पत्र हे प्रस्तुत अभ्यासाचे मुख्य साधन आहे, असे इतिहास संशोधकांनी मानले आहे. ऐतिहासिक कागदपत्रातील अंतरंगाचा म्हणजेच पत्रातील प्रास्ताविक भाग व मजकुर याचा विचार करण्यापूर्वी त्याच्या बाह्यांगाचाही विचार होणे तितकेच गरजेचे असते. त्यासंबंधी ऐतिहासिक कागदपत्रावरील शिक्का व मोर्तब हा एक महत्वाचा भाग मानला जातो.

महाराष्ट्राच्या इतिहासात सोळाव्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत ज्या काही राज्यकर्त्यांनी आपापली राज्ये निर्माण केली, त्यासंबंधीचा बराचसा राजकीय पत्रव्यवहार इतिहास संशोधकांनी प्रकाशित केला आहे. या कागदपत्रातून काही महत्वाच्या ऐतिहासिक पुरषांच्या मुद्रांचा अभ्यास केला असता, त्यातून आपणास काही विशिष्ट भाव निदर्शनास येतात. इतिहासात ज्या ज्या महापुरुषांनी राजकीयदृष्ट्या आपापल्या मुद्रा बनवल्या त्यामध्ये त्यांच्या मनात जी काही भावना निर्माण झाली, ती भाषेच्याद्वारे मुद्रेत व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. असे त्यांच्या मुद्रेतील वेगवेगळ्या मजकुरावरून दिसून येते.

या दृष्टीने विचार केला असता स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते मराठी राज्य संपुष्टात येई पर्यंत बरेच कर्ते पुरुष होऊन गेले. त्यापैकी काही महत्वाच्या पुरुषांना कोणत्या गुणांची थोरवी वाटत असे, ते कोणत्या देवतांचे उपासक होते, स्वराज्य स्थापनेचे महत्कार्य करण्यासाठी कोणत्या लोकांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मानसिक ध्येयाचे प्रतिबिंब काय होते हे सगळं त्यांच्या मुद्रेतून आपणास दिसून येते. त्यासाठी सर्व प्रथम या मुद्रांची पूर्व पिठिका आपणास जाणून घेणे आवश्यक आहे.

मुद्रांची पूर्व पिठिका – मुद्रा करण्याचा प्रघात नेमका कधी पासून अस्तित्वात आला त्याचा ठोस पुरावा तरी अध्याप उपलब्ध नाही. परंतू हा प्रघात खूप पुरातन काळापासून चालत आलेला आहे हे निश्चितपणे सांगता येईल. त्याचे कारण म्हणजे प्रभू श्री रामचंद्रजी यांनी सितामातेचा शोध करण्याकरता हनुमंतास लंकेत पाठवले. त्यासाठी हनुमंत आपला दूत आहे. अशी सीतामातेची खात्री पटण्यासाठी आपली मुद्रा हनुमंतासोबत दिली होती. हनुमंताने लंकेत जाऊन सितामातेचा शोध केल्यानंतर प्रभू श्रीराम यांच्याकडून आपण आलो आहोत, अशी सितामातेची खात्री करून देण्याकरिता श्रीराम यांची मुद्रा हनुमंतानी सितामातेस दिली. असा रामायणात काहीसा कथाभाग वर्णन केलेला आहे. या संबंधीचा उल्लेख रामायणातील एका श्लोकात खालील प्रमाणे आहे.

“रामनामांकितं चेदं पश्य देव्यगुलीयकम् |
प्रत्ययार्थ तवानितं दत्तं महात्मना” ||

या वर्णनावरून रामायणकाळी मुद्रा करण्याचा प्रघात अस्तित्वात होता हे या श्लोकावरून दिसून येते. याप्रमाणेच याज्ञवल्क्य स्मृतीपैकी आचराध्यायांतील राजधर्म प्रकरणाच्या ३१८ व्या श्लोकात खालील उल्लेख आढळतो.

“पटे वा ताम्र पटे वा स्वमुद्रोपरिचिन्हितम् |
अभिलेख्यात्मनो वंश्यानात्मानं च महिपति” ||

या श्लोकाचा अर्थ दानपत्र लिहिताना राजाने कापडावर अथवा ताम्रपत्रावर लिहावे. व त्यावर त्याने स्वकुल चिन्हांसहित आपली मुद्रा करावी असा आहे. आणि दिलेल्या दानाचा भावी राजांनी वा इतरांनी अपहार करू नये. व ते दान चिरकाल टिकावे म्हणून त्या दानाबद्ल राजाने स्वत:ची मुद्रा व स्वकुलाचे चिन्ह करून ज्यास दान दिले आहे त्यास लेख करून द्यावयाचा असतो. दानपत्रावर राजाने मुद्रा व स्वकुलाचे चिन्ह करण्याचे कारण दान देणाऱ्या राजाने दिलेल्या लेखाच्या सत्यतेविषयी भावी राजांची व इतरांची खात्री पटावी हेच असते.

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व भरतखंडात इतर प्रांतातून याज्ञवल्क्य स्मृतीत उल्लेखलेल्या स्वरुपाची ताम्रपत्रांवर खोदलेली अनेक शासने उपलब्ध झालेली आहेत. ज्या ताम्रपत्रावर ही शासने खोदलेली आहेत. त्यांच्या मथळ्यावरील भागात एक वर्तुळाकार छिद्र केलेले असते. व त्या छिद्रात एक ताम्रधातूची जाड कडी अडकवलेली असते. त्या कडीच्या मध्यभागास अथवा एका टोकास पसरट आकार दिलेला असून, त्या पसरट भागावर दानपत्र देणाऱ्या राजाची मुद्रा व कुलचिन्ह कोरलेली असतात.

उदा. पूर्वचालुक्य घराण्यातील दुसरा अम्म ऊर्फ विजयादित्य राजाच्या शके ८६७ सालच्या मुद्रेत “श्री त्रिभूवनांकुश” अशी अक्षरे मध्यभागी कोरलेली आहेत. मुद्रेचा आकार गोल असून या अक्षराच्या वरील बाजूस मध्यभागी डावीकडे तोंड केलेला एक वराह आहे. त्याच्या वरच्या बाजूस सूर्य उजव्या बाजूस चंद्र आणि डाव्या बाजूस अंकुश व अक्षराच्या खालील बाजूस पुष्प इत्यादी चिन्हे कोरलेली आहेत.

मध्ययुगीन महाराष्ट्राच्या कालखंडात राज्यकारभाराची पत्रे व जमीनधाऱ्या संबंधाचे कागदपत्र यावर आढळणाऱ्या मुद्रा या राजा, प्रधान, अमात्य, न्यायाधीश, सेनापती, सरदार, जहागीरदार व देशमुख, इ. वतनदारांच्या आढळतात. याच धोरणास अनुसरून मुद्रा करण्याचा प्रघात पूर्वपार चालत आलेली ही परंपरा पुढेही अशीच चालत राहिलेली आहे असे दिसून येते.

ऐतिहासिक पुरुषांच्या मुद्रांचे प्रदर्शन पृ. ११८

राम वाघोले

Leave a Comment