मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग २० –
शिक्क्यांचे स्थित्यंतर आणि ऱ्हास – ब्रिटिश राजवटीतील एक ऐतिहासिक वास्तव : ई.स. १८१८ मध्ये मराठ्यांचे राज्य संपुष्टात येऊन ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला. त्यानंतर सुरुवातीला राजकीय परिस्थितीत फार मोठा बदल झालेला नाही, असेच ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील जनतेला भासवण्याचा प्रयत्न केला. याच धोरणाचा भाग म्हणून ब्रिटिशांनी सुरुवातीला आपले अधिकृत शिक्के मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीत तयार करून घेतले. एवढेच नव्हे, तर पुणे सुभ्यातील परगण्यांचे शिक्केही मराठीतच बनवले गेले. ही स्थिती साधारणपणे १८५७ च्या उठावापर्यंत पाहायला मिळते.
काही ऐतिहासिक पुरावे व उदाहरणे:
१) पुण्याचे कलेक्टर:
”हुकुम कुपणि इंग्रेज बहादर कलेक्टर पुणे”
दि.२२ नोव्हेंबर १८१९
(संदर्भ: भारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल, शके १८३६, पृ. १५५)
२) अहमदनगरचे कलेक्टर: (अत्ताचे आहिल्यानगर) –
”कपतान हनरी पाटंजर साहब बहादर कलक्टर आमदानगर”
दि: २४ ऑगस्ट १८१८
(संदर्भ: भारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल, शके १८३६, पृ. १८४)
भाषेचे स्थित्यंतर आणि परदास्य:
महाराष्ट्रात इंग्रजी सत्ता स्थिरावल्यानंतर इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली. या शिक्षणाच्या प्रभावामुळे हळूहळू लोकांना स्वतःच्या संस्कृतीचा विसर पडू लागला आणि इंग्रजांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली. याचा थेट परिणाम आपल्या शिक्क्यांवरही झाला. शिक्क्यांवरील मराठी/संस्कृत भाषा आणि देवनागरी लिपी मागे पडून त्यांची जागा इंग्रजी भाषा आणि लिपीने घेतली.
संस्कृतीचा अभिमान जपणारी घराणी:
इंग्रजी शिक्षणाच्या या प्रभावापासून जी काही मोजकी घराणी दूर राहिली, त्यांनी आपली पूर्वापार चालत आलेली संस्कृती आणि परंपरा अभिमानाने जपून ठेवली. यामध्ये ‘माळेगावकर जाधवराव’ या घराण्याचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
त्यांच्या मुद्रेवरील पुढील संस्कृत श्लोक या अभिमानाची साक्ष देतो:
“श्री शंभो रमरसिंहस्य सुवर्णपदपंकज।
यादवस्य कुलोत्तंसो रत्नसिंहो विराजते॥”
संदर्भ: महाराष्ट्र कुळाचा इतिहास, भाग – १
राम वाघोले
