सुधागडचे ऐतिहासिक महत्त्व…
सुधागड हा लोणावळा डोंगर रांगांमधील किल्ला रायगड जिल्ह्यातील पाली गावापासून फक्त १० किमीवर आहे. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर असून गड विस्ताराने फारच मोठा आहे.
या प्राचीन गडाला भोरपगड असेही म्हणत असत. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणावळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली.
छत्रपती राजाराम महाराजांनी शंकरजी नारायण याला पंतसचिव केले. इ.स. १७१४ च्या सुमारास छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सचिवपद वंशपरंपरेने दिले. त्यानंतर त्यांचे वंशज परंपरेने त्या पदावर बसत होते. इंग्रजांच्या काळात पंत सचिवांना संस्थानिक म्हणून मान्यता मिळाली. भोर संस्थानाचे ते राजे झाले. आजही भोर मध्ये पंत सचिवांचे घराणे चालू आहे.
रायगडाचा महादरवाजा आणि सुधागडचा महादरवाजा यात साम्य आहे. सुधागडाला लाभलेली अभेद्य तटबंदी, गडमाथ्यावरील विशाल पठार, पाण्याचे असंख्य टाक, तसेच भौगोलिकदृष्ट्या असलेले महत्त्व यामुळे सुधागड हा बळकट किल्ला म्हणून गणला जातो.
सुधागड किल्ल्याला आजही पंचक्रोशीत भोराईचा डोंगर म्हणूनच ओळखतात. सुधागडावरून समोरच उभा असणारा सरसगड, घनगड, कोरीगड, तैलबैला तसेच अंबानदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.