विशाळगड : औरंगजेबाची व्यथा –
औरंगजेब ८२-८३ वर्षांचा झाला तेव्हाचा हा प्रसंग आहे. १७०१ च्या एप्रिलमध्ये पन्हाळगड घेतल्यानंतर पावसाळ्यातल्या मुक्कामासाठी तो सातारा जिल्ह्यातील खटाव येथे राहिला. पावसाळा संपल्यावर विशाळगड घेण्यासाठी त्याने ६ नोव्हेंबर १७०१ रोजी खटाव सोडले आणि रहमतपूर, कऱ्हाड , शिराळा , सातगाव या वाटेने प्रवास करत तो २६ नोव्हेंबर रोजी मलकापूरात पोहोचला.औरंगजेबाची व्यथा.
त्याच्या पुढील हालचाली थोडक्यात पुढीलप्रमाणे होत्या…
४ डिसेंबर १७०१- मलकापूराहून दुर्दान येथे.
७ डिसेंबर – येळवण-जुगाई येथे.
२२ डिसेंबरला विशाळगडाला पूर्वेच्या दिशेने मोर्चे लावण्यास मोगलांनी सुरवात केली.
२४ ते २९ डिसेंबर दरम्यान मोगल आणि मराठ्यांच्यात चकमकी होऊन अनेक मोगल त्यात ठार झाले.
३१ डिसेंबरला राणोजी घोरपडे यांनी साताऱ्यावर हल्ला केला.
११ जानेवारी १७०२ ला औरंगजेब स्वतः मोर्चे पाहण्यासाठी गेला. मुक्काम किल्ल्यापासून साडेतीन कोसांवर असलेल्या पांढरेपाणीनजीकच्या पावनखिंडीपाशी.
१६ जानेवारीला मुक्काम हलवून, किल्ल्यापासून अर्ध्या कोसांवर छावणी.
या वेढ्यात मआसिर-ए आलमगीरीचा लेखक साकी मुस्तैदखान स्वतः हजर होता. त्याने मराठ्यांशी लढताना मोगलांच्या झालेल्या दैनेचे वर्णन केले आहे.
अनेक महिने झाले तरी किल्ला सर होण्याची लक्षणे दिसेनात. अखेर ९ मे रोजी कोकणी दरवाजासमोरचा रेवणीचा बुरुज मोंगलांनी काबीज केला. तह झाला. दोन लाख रुपये मराठ्यांना देऊन औरंगजेबाने विशाळगड घेतला. (संदर्भ जेधे शकावली)
८ जून १७०२ ला औरंगजेबाने किल्ल्याला भेट दिली. किल्ल्याचे नाव ‘सख्खरलना’ असे ठेवले. “सख्खरलना” म्हणजे अल्लाहने आमच्या ताब्यात आणून दिलेला. हा अरबी शब्द कुराण सूरह ज़ुकरुफ (४३) , आयत १३-१४ मध्ये येतो.
औरंगजेब १० जून रोजी विशाळगडावरुन परत फिरला. १६ जून रोजी त्याने आंबा या गावाजवळ मुक्काम केला. या ठिकाणी औरंगजेबाला एक ओढा लागला. त्याने तो ओढा पार केला, परंतु त्याचे बरेचसे सैन्य त्या ओढ्यात बुडून मेले असे साकी मुस्तैदखान लिहीतो.
*औरंगजेबाच्या छावणीभोवती भिकारी जमतात*
आता मुघल अखबारातील या मजेशीर नोंदीकडे येऊ.
जुलुस ४६, सफर १४ हिजरी १११४ (२९ जून १७०२) ची मुघल अखबारातील पहिल्या तीन नोंदी पुढीलप्रमाणे आहे.
*फार्सी*
مقام نزدیک ناله آب است باران عدالت موقوف فرمودند
دی شب بخشی الملک روع الاه خان و حمیدالدین خان بهادر و سیادتخان و منعم خان که بدربار معلی بچوکی طیار نمودند / بودند الوش مرحمت شد
دی شب مردم فقیر نزدیک دولتخانه آواز صداشتی خیرات می کردند چندان للا حضرت شنیده فرمودند کامیاب خان چطور ناله به مینماید خانمزکور متقدمی دوصد پنجا سوار بود پنجا سوار کم فرمودند
मकाम नजदीक नाला-ए आब अस्त. बारान अदालत मौकुफ फरमुदंद
दी शब बख्शी उल मुल्क रुहुल्लाखान व हमीदुद्दीनखान बहादूर व सियादतखान व मनीमखान की बदरबार-ए मुअल्ला ब-चौकी तय्यार नमुदंद/ बुदंद. अलुश म-रहमत शुद
दी शब मरदम-ए फकीर नजदीक दौलतखाना आवाज सदाश्ती खैरात मी-करदंद चंदान आला हजरत शनीदे फर्मुदंद कामयाबखान ची-तौर गीर्द नाला बे मी-नुमायद. खानमजकूर मुतक्कदी दो सद पंजा सवार बूद पंजा सवार कम फर्मुदंद.
*मराठी*
बादशहांचा मुक्काम एका नाल्याच्या (ओढ्याच्या) काठी होता. पावसामुळे दरबाराचे कामकाज बंद होते (बारान अदालत मौकुफ फरमुदंद )
काल रात्री बख्शी उल मुल्क रुहुल्लाखान, हमीदुद्दीनखान बहादूर, सियादतखान आणि मनीमखान पहाऱ्याच्या कामासाठी उपस्थित होते. त्यांना बादशहाच्या मुदपाकखान्यातून जेवण पाठवण्यात आले (अलुश म-रहमत शुद )
काल रात्री काही फकीर/भिकारी दौलतखान्याच्या (बादशहाच्या निवासस्थानाच्या) बाहेर मोठ्याने ओरडून खैरात मागत होते. त्यातल्या काही आरोळ्या बादशहांच्या कानावर गेल्या. (त्या ऐकून) बादशहा म्हणाले, “हा कामयाबखान नाल्याच्या आजुबाजूला कोणत्या प्रकारे फिरतोय / गस्त घालतोय ?(कामयाबखान ची-तौर गीर्द नाला बे मी-नुमायद ?) कामयाबखान हा पूर्वी २५० स्वारांचा प्रमुख होता. त्याची मनसब ५० स्वारांनी कमी करण्याचे आदेश बादशहांनी दिले.
संदर्भ:-
१) बहु असोत सुंदर, सेतू माधवराव पगडी
२) रॉयल एशियाटिक सोसायटी येथील जुलुस ४६ चे औरंगजेबाच्या दरबारचे मुघल अखबार
अखबारातील काही कठीण शब्द वाचण्यास साह्य केल्याबद्दल श्री. मनोज दाणी, श्री. पराग पिंपळखरे, श्री. प्रशांत सोमण आणि श्री निखिल परांजपे यांचे आभार.
सत्येन सुभाष वेलणकर, पुणे
Written By: सत्येन सुभाष वेलणकर- प्रथम रघुजीराजां सोबत नागपुरात आलेली सरदार मंडळी…
- मराठेशाहीच्या सेवेत सलग सहा पिढ्या चिटणीस (चित्रे) घराणे
- मालेगाव किल्ला : १८१८ मधील इंग्रजांच्या हल्ल्याची साक्ष देणारे दुर्मीळ रेखाटन
- छत्रपती शाहू महाराज आणि आवजी कवडे व मार्तंड मंदिराचा जीर्णोद्धार
- फ्रेंच वृत्तपत्रातून नोंदवलेले शिवछत्रपतींचे गौरवचरित्र इ. स. १७८४
