मिर्झा राजे जयसिंग यांनी बांधलेली ऐतिहासिक पायविहीर, जयपूर, बुलढाणा –
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात जयपूर हे एक छोटेसे ऐतिहासिक गाव आहे. मिर्झा राजे जयसिंग विदर्भाच्या दौऱ्यावर असताना काही काळ जयपूर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या वास्तव्यासंबंधीच्या आठवणी आजही गावातील ऐतिहासिक वास्तूंमधून जपल्या गेल्या आहेत. त्यांनी येथे पायविहीर (बारव) आणि छत्री बांधल्याचे सांगितले जाते. छत्री सध्या अस्तित्वात नाही; मात्र पायविहीर आजही तग धरून उभी असून, जयसिंगांच्या काळाची साक्ष देत आहे. ही विहीर सतराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.
ही पुरातन पायविहीर अष्टकोणी आकाराची आहे. विहिरीचा खालचा भाग दगडांनी बांधलेला असून, वरील भाग जुन्या काळातील चपट्या विटांनी बांधण्यात आला आहे. विहिरीच्या आतील बाजूस विविध खोल्या व कमानीदार रचना पाहायला मिळतात. विहिरीत उतरण्यासाठी दोन बाजूंनी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आजही ही वास्तू बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. योग्य साफसफाई, डागडुजी आणि संवर्धन केल्यास या ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य आणखी खुलून दिसू शकते.
जयपूर हे केवळ एक गाव नसून, इतिहासाच्या अनेक खुणा जपणारे ठिकाण आहे. गावाच्या पूर्व दिशेला प्राचीन सूर्य मंदिर आहे. पायविहिरीच्या परिसरात पूर्वी तीन प्राचीन समाधी असल्याचे सांगितले जाते; मात्र काळाच्या ओघात त्या नष्ट झाल्या आहेत.
पूर्वी जयपूर आणि कोथळी ही दोन्ही गावे एकच होती, असे स्थानिकांकडून सांगितले जाते. जयपूर हे नाव मिर्झा राजे जयसिंग यांच्या नावावरून ठेवण्यात आले असल्याचीही स्थानिक मान्यता आहे. जवळच असलेल्या गोसिंग गावाचाही संबंध जयसिंगांशी असावा, अशी शक्यता व्यक्त केली जाते. मिर्झा राजे जयसिंगांचे मूळ गाव राजस्थानमधील जयपूर असल्यामुळे त्यांनी या गावाला ‘जयपूर’ हे नाव दिले असावे, अशी आख्यायिका प्रचलित आहे.
गावात आजही काही प्राचीन वाडे आणि देशमुखांची दोन मजली पुरातन वास्तू पाहायला मिळते. तसेच हे गाव श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याचे मानले जाते. गजानन महाराजांच्या पादुका जयपूर गावात आहेत.
जयपूर गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा. गावात हनुमान मंदिर आणि मशीद अगदी भिंतीला भिंत लागून असल्याचे पाहायला मिळते. धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देणारे हे दृश्य गावाच्या वैशिष्ट्यपूर्ण इतिहासात आणखी एक महत्त्वाचे पान जोडते.
इतिहासाच्या खुणा जपणाऱ्या या पायविहिरीसह जयपूर गावातील प्राचीन वास्तूंचे संवर्धन होणे गरजेचे आहे. दुर्लक्षित राहिलेल्या या ऐतिहासिक ठेव्याकडे शासन आणि स्थानिक प्रशासनाने लक्ष दिल्यास जयपूरची ऐतिहासिक ओळख आणखी उजळून निघू शकते.
Written By: Vidarbha Darshan