माऊंट मेरीच्या हातातला बाळ येशू मुंबईचा इतिहास कसा सांगतो?
मुंबईतल्या वांद्र्याच्या डोंगरावर ८ सप्टेंबरला माऊंट मेरीचा जन्मोत्सव साजरा झाला असून आता जत्रेचा माहोल सुरू झालाय. फक्त ख्रिश्चनच नाही, तर शहरातील विविध जातीधर्माचे लोक या जत्रेला जातात, हे सगळ्यांना माहितेय. पण या चर्चमधील माऊंट मेरीच्या मूर्तीमध्ये एक खास गोष्ट आहे. ती म्हणजे तिच्या हातातला बाळ येशू. जो या मूळ मूर्तीचा भागच नव्हता. तो तिथं कसा आला, यामागे आहे मुंबईचा जवळपास पाचशे वर्षांचा इतिहास.
एखादा देव किंवा धर्मस्थळ फक्त उपासनेचं केंद्र नसतं. तिथं असलेल्या खाणाखुणा आपल्याला काही तरी सांगत असतात. आज माऊंटमेरीला लोकं नवस फेडायला येतात. कारण ती नवसाला पावते, अशी लोकांची श्रद्धा आहे. मग कुणी मेणाचा हात देतं, तर कुणी मेणाचं घर. पण ज्या मूर्तीला आपण ते अर्पण करतो, ती मूर्ती आपल्याला काही तरी सांगतेय, हे आपल्या ध्यानातच येत नाही.
आता पुन्हा कधी या चर्चमध्ये गेलात तर त्या मूर्तीकडे किंवा तिचा फोटो आवर्जून पाहा. हातात बाळ येशू घेतलेली माऊंट मेरीची ही लाकडी मूर्ती जवळपास साडेचारशे वर्ष जुनी आहे. पण तिच्या हातात असलेला बाळ येशू हा १७६१ मध्ये जोडला आहे. मूळ मूर्तीच्या हातात हा बाळ येशू नव्हता. हे असं का झालं, हे समजून घेतलं की आपल्याला मुंबईचा इतिहास सापडतो. हा इतिहास धर्माचा आहे, धर्मसंघर्षाचा आहे आणि धर्मसमन्वयाचाही.
आज आपण जे भव्य चर्च पाहतो ते १९०४ मध्ये उभं राहिलेलं आहे. पण त्या मूर्तीची गोष्ट सोळाव्या शतकापर्यंत मागे जाते. ही गोष्ट सुरू होते साधारणतः १५७०च्या आसपास. वांद्र्यात काम करणाऱ्या जेसुइट धर्मगुरूंनी लँड्सएंडवळ एक साधं प्रार्थनास्थळ उभारलं आणि पोर्तुगालहून मदर मेरीची लाकडी मूर्ती आणून तिथे ठेवली. हे प्रार्थनास्थळ सुरुवातीला खासगी उपासनेसाठी होतं; पण ते हळूहळू सार्वजनिक झालं. याचं कारण होतं धर्मांतर.
१५६८पासून पोर्तुगीज जेसुइट वांद्र्यात मिशनरी काम करत होते. सुरुवातीला त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण १५७५ नंतर ब्रदर मॅन्युएल गोम्स यांनी स्थानिक भाषा आणि प्रथा समजून घेत मिशनरी कामाला वेग दिला. सेंट अँड्र्यूजच्या इतिहासात १५८०मध्ये सुमारे २,००० धर्मांतरित, १५८८मध्ये ४,००० आणि १५९१मध्ये ६,००० धर्मांतरित अशी संख्या नोंदवली आहे.
धर्मांतर चांगलं की वाईट हा वाद घालण्यासाठी नाही,पण इतिहास म्हणून तो नक्कीच समजून घ्यायला हवा. त्यामुळे वांद्र्यात ख्रिश्चन समाजाचा विस्तार हा केवळ लोकसंख्येतील नैसर्गिक बदल नव्हता; त्यामागे नोंदलेली धर्मांतराची प्रक्रिया होती. माऊंट मेरीचं प्रार्थनास्थळ आणि नंतरचं चॅपल या बदलत्या ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक जीवनाचा एक भाग बनत गेलं. हे सगळं सुरू असताना, इस्लाम आणि ख्रिश्चन यांच्यातला संघर्षही इथंही पाहायला मिळाला. १७००च्या आसपास मस्कतच्या अरब चाच्यांनी वांद्र्यावर हल्ला केला. खजिना मिळेल या आशेने त्यांनी माऊंट मेरीचं प्रार्थनास्थळ लुटण्याचा प्रयत्न केला. मूर्तीच्या हातातली काठी सोन्याची असावी, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी तिचा उजवा हात कापला. या आशयाची नोंद माऊंट मेरीच्या अधिकृत इतिहासात आहे. त्यानंतर चर्च पेटवण्याचा प्रयत्न करत असताना मधमाशांच्या प्रचंड थव्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि ते पळून गेले, अशी कथाही सांगितली जाते. हीच कथा फादर ऑगस्टिन्हो यांच्या नोंदीतही आढळते.
पण इथून मूर्तीची कथा एक वेगळंच वळण घेते. मूर्तीचा हात तुटल्यामुळे मूळ मूर्ती बहुधा बाजूला, लाकडाच्या साठवण खोलीत ठेवण्यात आली. भक्तांना मात्र रिकामं वेदीस्थान पाहावं लागू नये म्हणून सेंट अँड्र्यूज चर्चच्या बाजूच्या वेदीवर असलेली दुसरी मूर्ती माऊंट मेरीच्या जागी आणण्यात आली. म्हणजे १७००नंतर माऊंट मेरीचं चॅपल बंद पडलं नव्हतं; तिथे दुसरी मेरीची मूर्ती ठेवून उपासना सुरू राहिली. आणि मग पुन्हा हल्ला झाला तो म्हणजे मराठ्यांचा. १७३७–३९च्या सुमारास मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात साष्टी-वसई परिसरात संघर्ष सुरू होता. त्या संघर्षात माऊंट मेरीचं चॅपल नष्ट झालं. मुंबईच्या जुन्या बॉम्बे गॅझेटिअरमध्ये १७३८ मध्ये मराठ्यांनी चॅपल नष्ट केल्याची नोंद आहे; मुंबईच्या वारसा नोंदीतही १६४० चं हे चॅपल १७३८ मध्ये मराठा सत्तेच्या काळात आगीत नष्ट झाल्याचं नमूद आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट ठेवायला हवी की, माऊंट मेरीच्या मूर्तीचा हात मराठ्यांनी कापला नव्हता. तो १७००च्या मस्कतच्या चाच्यांच्या हल्ल्यात गेला होता. मराठा-पोर्तुगीज संघर्षात चॅपल नष्ट झालं.
१७३९मध्ये शेवटचे जेसुइट व्हिकार फादर थॉमस विलानोव्हा वांद्रे सोडून गेले आणि स्थानिक धर्मगुरू फादर पाउलो डायस यांनी सेंट अँड्र्यूजच्या परगण्यासोबत माऊंट मेरीची जबाबदारी घेतली. त्यानंतरच्या राजकीय अस्थिरतेत आणि धर्मगुरूंच्या कमतरतेमुळे १७४१ ते १७६१ या काळात माऊंट मेरीवरील सार्वजनिक भक्ती जवळजवळ थांबली, अशी बॅसिलाकाच्या इतिहासात नोंद आहे.
म्हणजे १७००मध्ये जखमी झालेली मूळ मूर्ती, तिच्या जागी आलेली सेंट अँड्र्यूजची दुसरी मूर्ती, १७३८मध्ये उद्ध्वस्त झालेलं चॅपल आणि त्यानंतर काही काळ ओस पडलेलं हे चर्च. माऊंट मेरीची ही कथा जवळजवळ एखाद्या कादंबरीसारखीच आहे आणि मग येतं १७६१.
माऊंट मेरीचं चॅपल पुन्हा उभं राहिलं. सेंट अँड्र्यूजमधून आणलेली मेरीची मूर्ती परत पाठवण्यात आली. आणि १७००मध्ये जखमी झालेली मूळ माऊंट मेरीची मूर्ती दुरुस्त करण्यात आली. तिच्या तुटलेल्या हाताच्या जागी स्वतंत्रपणे जोडता येईल अशी बाळ येशूची मूर्ती बसवण्यात आली. ही मूर्ती एवढ्या बेमालूमपणे बसवली आहे, की आज जणू ती मूळ मूर्तीचा भाग आहे असंच वाटते.
पण, आपण जेव्हा हा इतिहास वाचतो तेव्हा धर्मांतर, व्यापार त्यातून झालेला संघर्ष आणि संघर्षानंतर पुन्हा समन्वयाचं गणित हे सगळं दिसतं. त्यामुळे या शहराला धर्मांमधला संघर्ष जेवढा नीट माहितेय, तेवढंच त्यातलं सख्य आणि समन्वयही माहितेय. आज माउंट मेरी ही फक्त पोर्तुगीजांची, ख्रिश्चनांची राहिलेली नाही. तिथं सर्वधर्मातले लोक येतात. ते आपापल्या पद्धतीनं तिची उपासना करतात. त्यातला कुणीही आपला धर्म बदलत नाही.
या मूर्तीला स्थानिक ईस्ट इंडियन किंवा कोळी परंपरेत मोती माऊली, मोटी सायबिणी अशा नावांनीही संबोधले जाते. मोतमाऊली हे तिचं बोलीभाषेतलं नाव, आज माऊंटमेरीएवढंच लोकप्रिय आहे. वांद्र्यात हे आता एवढं एकजीव झालंय की, काही ठिकाणी तर माऊंट मेरीला साडी नेसवली जाते.
एक कथा तर अशी सांगितली जाते की, माऊंट मेरी ही शहरातील सहा देवींची बहीण आहे. ८ सप्टेंबरच्या उत्सवाआधी ती बोटीतून आपल्या बहिणींना, शीतलादेवी, प्रभादेवी, महालक्ष्मी, शांतादेवी, लिलावती आणि मुंबादेवी यांना उत्सवाचं निमंत्रण द्यायला जाते, असं मानलं जातं. प्रो. एफ. एच. ग्रॅशियस यांनी आपल्या ग्रंथातही या कथेची नोंद केली आहे. शेवटी या कथाच समाज घडवत असतात, हे कुणीच नाकारणार नाही.
माउंट मेरीची ही कथा म्हणून खऱ्या अर्थानं मुंबईच्या इतिहासाची कथा आहे. तसंच ती माणसाच्या संघर्षाची आणि समन्वयाचीही कथा आहे. म्हणून इतिहास सांगताना फक्त संघर्ष न सांगता, समन्वयही समजून घ्यायला हवा.
(या लेखासाठीची माहिती इंटरनेटवरील विविध स्रोतातून घेतलेली आहे. चूक भूल द्यावी घ्यावी.)
Nilesh A. Bane
