मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग १६ –
मराठी आणि मुस्लीम राजवटींतील शिक्क्यांमधील कलाकौशल्याचा फरक – देवगिरीच्या यादवांच्या काळात आणि त्यापूर्वी महाराष्ट्रात कलाकौशल्याच्या दृष्टीने अत्यंत श्रेष्ठ दर्जाची प्रगती झाली होती. या सुवर्णकाळाचे सर्वात उत्तम आणि परिचित उदाहरण म्हणजे अजिंठा व वेरूळ येथील अद्वितीय लेणी! परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील देवालय, मूर्ती, भिंतींवरील चित्रे आणि नाणी पाहिली, तर यादवांच्या काळातील अजिंठा-वेरूळसारखे सूक्ष्म खोदकाम व कलाकौशल्य त्यात दिसून येत नाही. हे पाहून “त्या काळात खरोखरच कौशल्याने परिपूर्ण असे कारागीर होते का?” अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. यादवांच्या काळापासून ते थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत या कलाकौशल्याचा ऱ्हास झालेला आढळतो. या ऱ्हासामागे प्रमुख २ कारणे होती,
१. परकीय सत्तांचा प्रभाव आणि मानसिक ऱ्हास – सुमारे अडीच-तीनशे वर्षे महाराष्ट्रावर मुसलमानी सत्ताधीशांचे राज्य होते. या परदास्यात राहिल्यामुळे येथील लोकांची कर्तृत्वशक्ती अत्यंत संकुचित झाली. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक शक्तीच्या ऱ्हासावर झाला. याच कारणाने शिवकाळात तयार झालेल्या राजमुद्रा आणि नाण्यांवर कलाकुसरीच्या दृष्टीने सुबकपणा, स्पष्ट वळणदारपणा आणि रेखीव अक्षरे आपल्याला दिसून येत नाहीत. मराठेशाहीचा अंत होईपर्यंत शिक्क्यांच्या कलाकौशल्यात हवी तशी सुधारणा होऊ शकली नाही.
२. निरंतर युद्ध आणि शांततेचा अभाव – कोणत्याही राज्यात कलाकौशल्याला उत्तेजन मिळून त्याची प्रगती होण्यासाठी ‘स्थैर्य आणि शांतता’ अत्यंत आवश्यक असते. मराठ्यांचे राज्य स्थिर होऊन कलेला वाव मिळण्यासाठी जितकी शांतता हवी होती, तितकी शांतता सततच्या युद्धांमुळे मराठी राज्याला मिळू शकली नाही.
मुसलमानी व मोगल सत्ताधाऱ्यांचे शिक्के श्रेष्ठ का ठरले?
देवगिरीच्या यादवांची सत्ता संपल्यानंतर दक्षिणेतील मुसलमानी राज्यकर्ते आणि उत्तरेकडील मोगल बादशहा तसेच त्यांच्या अधिकाऱ्यांचे शिक्के कारागिरीच्या दृष्टीने मराठी पुरुषांच्या शिक्क्यांपेक्षा अधिक उत्तम प्रतीचे दिसतात.
याचे कारण,
मुसलमान राज्यकर्त्यांना त्यांच्या शांततेच्या काळात कलेचा अनुभव घेण्यास पुरेशी सवड मिळाली. त्यामुळे त्यांच्या राज्यात अनेक कलांमध्ये प्रवीण असलेले कारागीर निर्माण झाले. याच कारणाने त्यांच्या शिक्क्यांमध्ये सफाईदारपणा, रेखीव व वळणदार अक्षरे ,स्पष्टता दिसून येते.
संदर्भ: ऐतिहासिक पुरुषांच्या मुद्रांचे प्रदर्शन (पृष्ठ क्र. १५५ ते १५६)
राम वाघोले
