पानिपत वीर मराठा फौजेचे दिल्लीतील सेनानी अंताजी माणकेश्वर गंधे यांचा धर्मकार्याचा एक शिलालेख आणि त्यांचे इतिहासातील योगदान व कार्य !!!
राशीन येथील जगदंबा मंदिर ओवरी शिलालेख !!!!!
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे राशीन येथील प्रसिद्ध असलेले श्री जगदंबा मंदिराच्या मागील भागात ओवऱ्या आहेत त्यावरील एका खांबावर कोरलेला आहे. सदर अंताजी माणकेश्वर गंधे यांचा धर्मकार्याचा शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून सात ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. लेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने तसेच सततची रंगरंगोटी केल्याने लेखातील अक्षरे मुजुन गेली आहेत.शिलालेखाचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर थोड्या प्रयत्नाने वाचता येतो
शिलालेखाचे वाचन :
१ .श्री भवानी प्रसन्न
२ .स्वस्ति श्रीनृप शाळीवाहन श
३ .के १६७९ ईश्वर नाम संवछरे मा
४ .घ वद्य प्रतिपदा ते दिवसी श्री य
५ .माई चरणि तत्पर अंताजी माण
६ .केस्वर गंधे कुळकर्णी मौजे काम
७ .रगाव वोवऱ्या श्री भवानी श्री सार्थ
अर्थ : श्री भवानीच्या कृपेने, शालिवाहन शक १६७९, ईश्वर नाम संवत्सर, माघ वद्य प्रतिपदा म्हणजेच २४ फेब्रुवारी १७५८ शुक्रवार या दिवशी, श्री (जगदंबा)यमाई देवीच्या चरणी समर्पित असलेल्या मौजे कामरगाव चे कुळकर्णी अंताजी माणकेश्वर गंधे यांनी श्री भवानीच्या नावाने ओवऱ्या बांधून तिचे धार्मिक समर्पण केले.
शिलालेखाचे महत्व :- हा शिलालेख मराठाकालीन मंदिर स्थापत्य, शक्ती-उपासना आणि स्थानिक समाजाच्या धार्मिक योगदानाचा महत्त्वपूर्ण पुरावा आहे. अंताजी माणकेश्वर गंधे कुळकर्णी यांनी जगदंबा भवानी मंदिराची ओवरी बांधल्याचा उल्लेख असल्यामुळे त्या काळात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मंदिरांच्या जीर्णोद्धार व विस्तारासाठी आर्थिक मदत देत असल्याचे दिसून येते.
“श्री यमाई चरणी तत्पर” या उल्लेखातून लेखकर्त्याची देवीभक्ती स्पष्ट होते. त्यामुळे हे कार्य केवळ वास्तु-निर्माण नसून धार्मिक श्रद्धेतून केलेले पुण्यकर्म होते.
ओवरी हा मंदिराचा उपयुक्त भाग असल्याने येथे यात्रेकरू, भक्त, पुराणश्रवण करणारे लोक किंवा धार्मिक विधींमध्ये सहभागी होणारे ग्रामस्थ यांना आश्रय मिळत असे. त्यामुळे या बांधकामातून मंदिराच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्षेत्राचा विस्तार झाल्याचे दिसून येते.
याशिवाय, शिलालेखातील शके १६७९, ईश्वर नाम संवत्सर, माघ वद्य प्रतिपदा ही कालनोंद मराठाकालीन इतिहासाच्या कालमापनासाठी महत्त्वाची ठरते. तसेच कुळकर्णी पदाचा उल्लेख त्या काळातील ग्रामप्रशासनाची माहिती देतो.
एकंदरीत, हा शिलालेख भवानी-यमाई उपासना, मराठाकालीन मंदिर स्थापत्य, स्थानिक दानपरंपरा आणि ग्रामप्रशासन यांचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुरावा आहे.
गावाचे नाव :- मु.पो. राशीन ता. कर्जत जिल्हा- अहिल्यानगर
जी.पी.एस. :- N-१८.४३६१०७,E..७४.९२१०७१
शिलालेखाचे स्थान :- राशीन येथील जगदंबा मंदिराच्या पाठीमागील ओवऱ्याच्या दगडी खांबावर वरील भागात कोरलेला आहे
अक्षरपद्धती :- कोरीव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- देवनागरी – लिपी , मराठी भाषा
प्रयोजन :- श्री जगदंबा चरणी तत्पर देवीच्या मंदिराच्या ओवऱ्या बांधल्याची स्मृती जपणे..
.मिती / वर्ष :- शके १६७९ईश्वर नाम संवत्सरे माघ वद्य प्रतिपदा
काळ वर्ष :- अठरावे शतक – – सन २४ फेब्रुवारी १७५८शुक्रवार
राजा /कारकीर्द:- छत्रपती रामराजे
ग्राम नाम:- कामरगाव
देवता नामः-श्री भवानी
व्यक्तीनाम :- श्री अंताजी माणकेश्वर गंधे कुलकर्णी
शिलालेखाचे वाचक :- . श्री. अनिल किसन दुधाणे..श्री अनिकेत रजपूत
संक्षेप :- शाळीवाहन –शालिवाहन ,संवछरे-संवत्सरे , कुळकर्णी,-कुलकर्णी माणकेस्वर-माणकेश्वर,वोवऱ्या-ओवरी ,
अंताजी माणकेश्वर गंधे यांच्या लढाया.:-
१. दि. ४ मे १७२९ बुंदेलखंडात सुपे येथे दावलजी सोमवंशी आणि पिलाजी जाधवराव यांच्यासोबत अंताजींची वहम्मदखान बंगशच्या मुलाशी, कायुमखानाशी चकमक.
२. एप्रिल १७३१ अंताजींची बंगशच्या अधिपत्याखाली असलेल्या माळव्यात कौथा आणि सारंगपूर-शहाजहानपूरच्या प्रदेशात धामधूम.
३. इ.स. १७३१ च्या अखेरीस अंताजी आपल्या तुकडीसह चिमाजीअप्पांसोबत माळव्यात.
४. एप्रिल ते डिसेंबर १७३९ : आवजी कवडेंसोबत अंताजींच्या वऱ्हाडात स्वाऱ्या आणि भास्कर हरी आदींसोबत लढाया.
५. एप्रिल १७३४ गढाकोट्याला मोर्चे.
६. इ.स. १७४६ अखेर : अंताजींच्या मगरोणी आणि अंत्री येथे नरवरकरांशी लढाया, ग्वाल्हेरचा मुलुख काबीज.
७. दि. ९ आणि १० मे १७५३ : अंताजींकडून दिल्लीत वजिराच्या पक्षाच्या राजेंद्रगीर गोसाव्याच्या पराभव.
८. दि. १९ ऑगस्ट १७५३ : भद्रापूरच्या कालव्यावरील अंताजी आणि सफरजंग वजीर यांच्यातील लढाई. अंताजींचा विजय.
९. नोव्हेंबर १७५५ अखेर दीडवाणी जवळ आणि डिसेंबरमध्ये जयपूरच्या आसपासच्या प्रदेशात अनिरुद्धसिंगाच्या राजपूर फौजांचा पराभव.
१०. दि. २१ जानेवारी १७५७ : दिल्लीपासून सहा कोसांवर अंताजी आणि अब्दालीचा वजीर शहावलीखान यांच्यात लढाई. अंताजींचा माघार.
११. दि. २२ जानेवारी १७५७ : फरीदाबादेजवळ नजीब आणि अब्दालीच्या संयुक्त फौजांचा अंताजींकडून पराभव.
१२. दि. २३/२४ जानेवारी १७५७ : बारापुल्याजवळ अब्दालीचा सरदार सरवरखान आणि अंताजींची लढाई, अंताजींचा विजय.
१३. दि. ३ फेब्रवारी १७५७ फरीदाबादेजवळ अब्दालीचा मुलगा आणि वजीर यांचा अंताजींवर हल्ला. यात अंताजींच्या फौजेचे मोठे नुकसान होऊन, जवळपास एक हजार माणसं मारली जाऊनही त्यांनी हल्ला परतवून लावला.
१४. दि. १० ते १५ जुलै १७५७ : अंताजी आणि नजीबखानाचे सैन्य यांच्यात मेरठजवळ दोन लढाया. दोन्ही वेळेस अंताजींचा विजय.
१५. दि. १२ जानेवरी १७६० रोजी उद्गीरजवळ चंद्रसेन जाधवांशी अंताजींची लढाई आणि विजय.
१६. पानिपतच्या सबंध मोहिमेत अंताजी भाऊसाहेबांसोबत. शिवाय, पानिपतावर भाऊंचा उजव्या बाजूला यशवंतराव पवार आणि समशेरबहाद्दर यांच्यासोबत हुजुरातीच्या फौजेचे नेतृत्व..
पानिपतवीर सरदार अंताजी माणकेश्वर गंधे आणि त्यांचे इतिहासातील योगदान –
१. पानिपतवीर सरदार अंताजी माणकेश्वर गंधे कामरगाव वसवले. कामाक्षिचा दृष्टांत झाला म्हणून. कारभारासाठी गढी बांधली. यांची गढी म्हणजे एक भव्य वाडा आहे.. सद्यस्थितीत गावाची वेस असलेले बुरूज, तटबंदी पहायला मिळते. आज गावात असंख्य पेशवेकालीन वाडे आहेत. त्यामध्ये गंधेंचा वाडा आहे.. गावचे आंधळे-पाटील यांचा सुस्थितीतील वाडा आहे. आंधळे हे पूर्वीपासून गावचे पाटील होते हे अंताजींनी सदाशिवभाऊना इ.स. ७/११/१७५० ला लिहिलेल्या पत्रात उल्लेख आढळतो.गढीच्या एका बुरुजावर आंधळे यांचे नाव असलेला त्यावर शिलालेख दिसून येतो.
२. अंताजी गंधे हे कर्तृत्ववान होते. सुरवातीला छत्रपती शाहूमहाराजांकडे होते नंतर चिमाजी आप्पांची मर्जी हुशारीने संपादन केली.चिमाजी अप्पांनी त्यांना माळव्यावरील स्वारीत पराक्रम दाखविण्याची संधी दिली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. बाजीराव पेशव्यांनी बुंदेलखंडाच्या स्वारीत त्यांना सामील करून घेतले. त्यांनी गोविंद बल्लाळ यांची बाजीरावांकडे कमावीसदार पदासाठी शिफारस केली. इ.स.१७३३ मध्ये त्यांच्या शिफारसीनुसार गोविंद बल्लाळ हे बुंदेलखंडाचे सर्वेसर्वा झाले. ‘सागर’ नावाचे शहर त्यांनी वसविले.
३. .मराठ्यांच्या बंदोबस्तासाठी दिल्लीच्या बादशहाने इ.स. १७३० च्या सुमारास महंमदशहा बंगश याची नेमणूक केली. बुंदेलखंडाप्रमाणेच मराठ्यांचा निःपात करण्याच्या कामास तो लागला. इ.स. १९/५/१७३१ रोजी बंगश उज्जैनीस आला. त्याला अंताजी माणकेश्वर सामोरे गेले. पण त्याचा पराभव झाला.
४. अंताजींस उत्तरेकडील राजकारणात शिंदे-होळकरांप्रमाणे सेनापती म्हणून महत्त्व प्राप्त झाले. दिल्लीला ७००० स्वारांचे ते मनसबदार होते. दिल्लीच्या राजकारणात त्यांनी फार मोठी कामगिरी केली. बादशहाकडून त्यांना इटावा व पुफुंब हे परगणे मिळाले. इ.स. १७५५ मध्ये ते दत्ताजी शिंदे यांचेकडे गेले.
५. अंताजी गंधे व हिंगणे बंधू हे लष्करी अधिकारी मराठ्यांचे दिल्ली दरबारी राजकारण सांभाळणारे अत्यंत मातब्बर असे वकील होते. हिंगणे यांचा तेथे अधिक वकूब होता. अंताजी हे लष्करी बाण्यात अत्यंत धाडसी वृत्तीचे तसेच बोलण्यात व लिहिण्यात चतुर होते.
६. ६. इ.स. १७५७ मध्ये अब्दालीला त्यांनी चांगलाच हात दाखविला.उत्तरेत ग्वाल्हेरच्या बाजून लढणारे अंताजी हे एकमेव मराठा सरदार होते. सुरजमल जाट व अंताजी या दोघांनी अब्दालीला तोंड दिले.
७. .पानिपतवर लढताना मल्हारराव, विठ्ठल शिवदेव, तानाजी गायकवाड, सटवोजी जाधव, साबाजी शिंदे, अंताजी माणकेश्वर, गंगोबा तात्या चंद्रचूड हे साठीच्या वरील वीर जखमी होऊन रणांगणातून बाहेर पडले. नंतर बाजी हरि, नाना पुरंदरे रात्री चालले असता दांडग्यांच्या हुल्लडीत फारुकाबादच्या जमीनदाराकडून बाजी हरी व अंताजी माणकेश्वर ठार झाले.
८. जदुनाथ सरकार हे बंग इतिहासकार त्यांचा गौरव करताना म्हणतात: “अंताजी माणकेश्वर हा तलवार व लेखणी दोनही कुशलतेने चालवणारा पुरुष पानिपतावर गारद झाल्यामुळे इतिहासाची हानी झाली आहे.”
९.दिल्ली दरबारी एक मुत्सद्दी वकील म्हणून चमकलेल्या या वीराने आपली गावची आठवण मात्र कायम ठेवली. त्यांनी गावी कोट बांधला. त्यांच्या पत्रावर खालील मुद्रा पाहण्यास मिळते
“मुद्रषाशंभुचरणद्वद्वनिष्ठस्य सर्वदा
माणिकेश्वर संभूत अनन्तस्य विराजते”
१०.आपल्या मूळ मातीची कामरगावची व आपल्या मूळ कुलकर्णीपदाची मात्र त्यांनी आठवण जपली. राशिन येथील श्री अंबिका मंदिरात त्यांनी दीपमाळ उभारली. राशिन मंदिराच्या मागच्या ओवऱ्या या गंधेंनी बांधल्या आहेत. , अंताजी माणकेश्वर गंधे यांनी ओवरी व दीपमाळ आणि शेटे सरकार यांनी राशिनचे मंदिर बांधले. या दीपमाळेवरील शिलालेखात ते म्हणतात’अंताजी माणकेश्वर गाव कामगार कामरगावकर’
११.मराठा राज्याचे एक अधिकारी आणि प्रसिद्ध सेनानी पानिपतवीर अंताजीचा मृत्यू १७ जानेवारी १७६१ रोजी स्वराज्याची सेवा करत असताना झाला
संदर्भ
१.(IE VI -३१८ )
२.महाराष्ट्रातील वाडे व गढी –भाग १ – डाॕ सदाशिव शिवदे सर
३.सेनापती अंताजी माणकेश्वर गंधे – कौस्तुभ कस्तुरे पुष्ठ १४९-५०
©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
Written By: Anil Dudhane