महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,34,545

मुस्लीम महानुभाव संत शहामुनी

By Discover Maharashtra Views: 3862 5 Min Read

मुस्लीम महानुभाव संत शहामुनी ची दुर्लक्षीत समाधी –

भारतीय संस्कृती ही एक खरेच अजब असे मिश्रण आहे. आपला जन्म कुठे/ कुठल्या धर्मात पंथांत होतो हे आपल्या हातात नसते. पण आपली श्रद्धा अभ्यास यातून काही माणसं वेगळाच मार्ग निवडतात. शाहगड (ता. अंबड जि. जालना) येथील मुस्लीम महानुभाव संत शहामुनी यांची कथा अशीच काहीशी आहे.

औरंगाबाद-सोलापुर या राष्ट्रीय महामार्गावर गोदावरी नदीवर प्रचंड मोठा पुल आहे. हा पुल ज्या गावात आहे ते गाव म्हणजे शहागड. नविन झालेल्या पुलाखालून गावात शिरलो की उजव्या बाजूला एक रस्ता सरळ चिंचोळा होत नदीच्या दिशेने जात राहतो. त्याच्या टोकाशी नदीच्या काठावर जूना प्राचीन किल्ला आहे. किल्ल्याचे अगदीच थोडे अवशेष आता शिल्लक आहेत. एक भव्य पण काहीशी पडझड झालेली कमान आहे. या कमानीतून आत गेलो की भाजलेल्या वीटांच्या कमानी आणि एक दीपमाळ लागते. हे म्हणजे पुराण्या समाधी मंदिराचे अवशेष आहेत. आता नविन बांधलेले एक सभागृह आहे. यातच आहे शाहमुनींची समाधी. यालाच शाह रूस्तूम दर्गा असे पण संबोधले जाते.

शहामुनींनी त्यांच्या सिद्धांतबोध ग्रंथात आपल्या कुळाची माहिती दिली आहे. आपल्या घराण्यात चार पिढ्यांपासून हिंदू देवी देवतांची पुजा अर्चना होत असल्याची माहिती स्वत: शहामुनींनीच लिहून ठेवली आहे. त्यांचे पंणजोबा प्रयाग येथे होते. पत्नी अमिना हीला घेवून ते तेथून उज्जयिनी येथे आले. शहामुनींचे पणजोबा मराठी आणि फारसी भाषेचे तज्ज्ञ होते.  शहामुनींच्या आजोबांचे नाव जनाजी. जनाजी विष्णुभक्त होते. जनाजी हे सिद्धटेक (ता. कर्जत. जि. नगर) येथे स्थलांतरीत झाले. जनाजीच्या मुलाचे नाव मनसिंग. हे मनसिंग म्हणजेच शहामुनींचे वडिल. मनसिंग सिद्धटेकला असल्याने असेल कदाचित पण त्यांना गणेशभक्तीचा छंद लागला. मनसिंगांच्या पत्नीचे नाव अमाई. याच जोडप्याच्या पोटी शके 1670 (इ.स. 1748) मध्ये पेडगांव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथे शहामुनींचा जन्म झाला. काशी येथे  मुनींद्रस्वामी यांच्याकडून त्यांना गुरूमंत्र प्राप्त झाला. सातारा जिल्ह्यात त्यांनी सिद्धांतबोध ग्रंथाची रचना केली. यांनी शके 1730 (इ.स.1808) मध्ये शहागडला त्यांनी समाधी घेतली.

शहाबाबा असे त्यांचे जन्मनाव. त्यांना मुनी ही उपाधी लावली जाते ती संत असल्यामुळे नव्हे. त्यांच्या गुरूंचे नाव मुनींद्रस्वामी होते. म्हणून शहाबाबा यांनी आपल्या नावापुढे मुनी जोडून आपले नाव ‘शाहमुनी’ असे केले. जसे की ‘एकाजनार्दनी’. शहामुनींची गुरूपरंपरा त्यांच्याच पुस्तकांत दिल्याप्रमाणे दत्तात्रेय-मुनींद्रस्वामी-शहामुनी अशी सिद्ध  होते.

शहामुनींचे मोठेपण हे की त्यांनी आपल्या मुस्लीम धर्मातील विद्धंसकारी शक्तींची कडक निंदा आपल्या ग्रंथात करून ठेवली आहे. त्याकाळी हे मोठेच धाडस म्हणावे लागेल. आजही सुधारणावादी मुसलमान व्यक्तींना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागते. इतकेच नव्हे तर त्याला मारूनही टाकले जाते. अशा वेळी शाहमुनी लिहीतात

नव्हे यातीचा ब्राह्मण । क्षत्रिय वैश्य नोहे जाण ।
शुद्रापरीस हीन वर्ण । अविंधवंशी जन्मलो ॥
ज्यांचा शास्त्रमार्ग उफराटा । म्हणती महाराष्ट्रधर्म खोटा ।
शिवालये मूर्ति भंगिती हटा । देवद्रोही हिंसाचारी ॥
जयांच्या सणाच्या दिवशी । वधिता गो उल्हास मानसी ।
वेदशास्त्र पुराणांसी । हेळसिती उद्धट ॥
ऐसे खाणींत जन्मलो । श्रीकृष्णभक्तीसी लागलो ।
तुम्हां संतांचे पदरी पडलो । अंगीकारावे उचित ॥

शहामुनींची समाधी आज दुर्लक्षीत आहे. खरं तर समाधीचा परिसर हा नदीकाठी अतिशय रम्य असा आहे. प्राचीन किल्ल्याचे अवशेष इथे आहेत. हा सगळा परिसर विकसित झाला पाहिजे. किमान येथील झाडी झुडपे काढून स्वच्छता झाली पाहिजे. प्राचीन सुंदर कमानीची दुरूस्ती झाली पाहिजे.

शहामुनींचे वंशज असलेली 5 घराणी आजही या परिसरांत नांदत आहेत. या समाधीची देखभाल हीच मंडळी करतात. मुसलमान असूनही हे शहामुनींच्या उपदेशाप्रमाणे मांसाहार न करणे पाळतात. चैत्री पौर्णिमेला इथे मोठी जत्रा भरते (जयंतीची तिथी चैत्र वद्य अष्टमी आहे). तो उत्सव ही मंडळी साजरा करतात. एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

केवळ ही समाधीच नव्हे तर शहागड परिसरात जून्या मुर्ती आजही सापडतात. जून्या वाड्यांमधून अप्रतिम असे नक्षीकाम केलेले सागवानी खांब आहेत. याच परिसरांत सापडलेली विष्णुची प्राचीन मुर्ती एका साध्या खोलीत ठेवलेली आहे. ओंकारेश्वर मंदिर परिसरांत तर बर्‍याच मुर्ती मांडून ठेवलेल्या आहेत. दोन मुर्ती तर परिसरांत मातीत पडलेल्या आमच्या सोबतच्या फ्रेंच मित्राच्या दृष्टीस पडल्या. दोन जणांनी मिळून त्या उचलून मंदिराच्या भिंतीला लावून ठेवल्या. पाण्याने स्वच्छ धुतल्या. त्यावर रंगांचे डाग पडले आहेत. इतकी आपली अनास्था आहे प्राचीन ठेव्यांबाबत.

स्थानिक लोकांनी आता पुढाकार घेतला आहे. मुर्तींची स्वच्छता करून मंदिरात आणून ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. शिवाय अजून काही अवशेष सापडले तर नोंद करण्याचे मनावर घेतले आहे.

शहामुनींचे समाधी स्थळ एक धार्मिक सलोख्याचे विशेष ठिकाण म्हणून विकसित केल्या गेल्या पाहिजे. मंत्री राजेश टोपे यांच्या मतदार संघातील हे गाव आहे. त्यांनी या प्रकरणांत लक्ष घालावे असे सर्वसामान्य इतिहाप्रेमींच्या वतीने विनंती आम्ही करत आहोत.

(शहामुनींच्या बाबतीत सविस्तर माहिती रा.चिं.ढेरे यांच्या ‘मुसलमान मराठी संतकवी’ या पुस्तकांत दिली आहे. प्रकाशक पद्मगंधा प्रकाशन पुणे.)  (छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)

श्रीकांत उमरीकर

Leave a comment