पोटसुळ्या मारुती, पुणे

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 1
2 Min Read

पोटसुळ्या मारुती, पुणे –

पुण्यातील जुन्या पेठांमध्ये फिरताना अनेक देवस्थानांची नावे प्रथमदर्शनीच कुतूहल निर्माण करतात. विसावा मारुती, डुल्या मारुती,  जिलब्या मारुती, बटाट्या मारुती,  दुध्या मारुती,  भांग्या मारुती… अशाच या वैशिष्ट्यपूर्ण नावांच्या परंपरेतील एक मंदिर म्हणजे पोटसुळ्या मारुती.

लक्ष्मी रस्त्यावर डुल्या मारुतीच्या अगदी जवळ असलेले हे छोटेसे पण श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर आजही अनेक भाविकांचे आकर्षण आहे. या मंदिराच्या नावामागे स्थानिक लोकपरंपरेत एक रंजक समज प्रचलित आहे. या मारुतीरायाला वाहिलेले तेल पोटाला लावल्यास पोटदुखी किंवा पोटशूळ कमी होतो, भाविकांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून या देवस्थानाला पोटसुळ्या मारुती हे नाव प्राप्त झाले. हे मंदिर पूर्वी पिंपळाच्या पारावर होते. शहराचा विस्तार आणि रस्ता रुंदीकरणाच्या कामांमुळे मंदिर मागे सरकविण्यात आले. आज दिसणाऱ्या मंदिराचा जीर्णोद्धार दि. १ एप्रिल १९६१ रोजी करण्यात आला, याची नोंद मंदिरातील शिलालेखावर आजही पाहायला मिळते. मूळ मंदिर कोणी आणि कधी बांधले याबद्दल सध्या तरी माहिती उपलब्ध नाही.

मंदिरातील मारुतीची मूर्तीही लक्षवेधी आहे. मूर्ती वीरमुद्रेमध्ये उभी आहे. तिच्या एका हातात गदा असून दुसरा हात मुठ बंद ठेवून वर उगारला आहे. प्रभावळीसह कोरलेले शिल्प आणि साधे पण प्रभावी रूप यामुळे मूर्ती प्राचीन परंपरेची आठवण करून देते.

पुण्यातील मारुती मंदिरांची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे त्यांची स्थानिक ओळख. अनेक मंदिरांची नावे त्यांच्या परिसरावर, एखाद्या वैशिष्ट्यावर, स्थानिक आख्यायिकेवर किंवा लोकविश्वासावरून पडलेली आहेत. पोटसुळ्या मारुती हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. अशा नावांमधून तत्कालीन पुणेकरांचे दैनंदिन जीवन, श्रद्धा आणि लोकसंस्कृती यांचे प्रतिबिंब दिसून येते. आजही अनेक भाविक श्रद्धेने येथे दर्शनासाठी येतात. हनुमान जयंती तसेच प्रत्येक शनिवार या दिवशी मंदिरात विशेष गर्दी असते.
॥ श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥

आठवणी इतिहासाच्या

Written By: आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment