पुरातन गोपाल कृष्ण मूर्ती, अंजी

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 1
3 Min Read

पुरातन गोपाल कृष्ण मूर्ती, अंजी, यवतमाळ –

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील अंजी हे गाव प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. गावातील नरसिंह मंदिरामुळे अंजीची विशेष ओळख आहे. याच गावात सुमारे आठशे वर्षांपूर्वीची श्री गोपाल कृष्णाची एक अप्रतिम पुरातन मूर्ती आढळून आली असून, या मूर्तीमुळे अंजीच्या प्राचीन इतिहासातील एक महत्त्वाचे पान आता उजेडात येत आहे. काळ्या बेसाल्ट दगडात कोरण्यात आलेली ही मूर्ती अत्यंत देखणी आणि कलात्मक आहे. मूर्तीवर बारकाईने केलेले शिल्पकाम तत्कालीन शिल्पकारांचे कौशल्य आणि वैष्णव परंपरेतील समृद्ध कलावैभवाची साक्ष देते.

मूर्तीच्या मध्यभागी वेणुगोपाल रूपातील श्रीकृष्ण असून, त्यांच्या हातात बासरी धारण केलेली दिसते. मुकुट, हार, केयूर आदी अलंकारांनी सजलेले कृष्णाचे रूप अत्यंत आकर्षक आहे. त्यांच्या सभोवती शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूची आयुधे दर्शविण्यात आली आहेत. मूर्तीच्या विविध भागांमध्ये बलराम, गरुड, चौरीधारिणी, लक्ष्मी-नारायण, श्रीदेवी, गाय, तपस्वी आणि भक्तांच्या प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत. कृष्णाचे चरण कालिया नागाच्या मस्तकावर ठेवलेले दाखविण्यात आले असून, या शिल्पातून श्रीकृष्णाच्या विविध धार्मिक स्वरूपांचे सुंदर दर्शन घडते.

शिल्पशैलीच्या दृष्टीने अंजी येथील ही कृष्णमूर्ती अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावातील कृष्णमूर्तीशी साधर्म्य दाखवते. त्यामुळे विदर्भातील यादवकालीन वैष्णव शिल्पपरंपरेच्या अभ्यासासाठीही या मूर्तीला विशेष महत्त्व आहे. इतिहासाचा हा अनमोल ठेवा श्री. भास्कर चोपडे यांच्या घरी अनेक वर्षांपासून जतन करून ठेवण्यात आला होता. काळाच्या ओघात फारशी प्रसिद्धी न मिळालेला हा वारसा आता इतिहास संशोधक आणि अभ्यासक श्री सचिन दिक्षित सर यांच्या माध्यमातून प्रकाशझोतात आला आहे.

मूर्तीच्या पायथ्याशी असलेल्या शिलालेखामुळे या मूर्तीचा इतिहास अधिक स्पष्ट होतो. संस्कृत भाषेतील आणि देवनागरी लिपीतील या शिलालेखाचा काळ शक ११६६, अर्थात इ.स. १२४४ असा निश्चित करण्यात आला आहे. त्या काळात हा प्रदेश देवगिरीच्या यादवांच्या अधिपत्याखाली होता.
म्हणजेच आजपासून जवळपास ८०० वर्षांपूर्वी अंजी परिसरात श्रीकृष्णाची उपासना आणि धार्मिक परंपरा अस्तित्वात होती, याचा महत्त्वपूर्ण पुरावा या मूर्तीच्या माध्यमातून समोर आला आहे.

गोपाल कृष्णासाठी साकारत आहे सुंदर मंदिर
वर्षानुवर्षे जपलेल्या या ऐतिहासिक मूर्तीला योग्य स्थान मिळावे आणि तिचे धार्मिक-सांस्कृतिक महत्त्व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी आता श्री गोपाल कृष्णाचे सुंदर मंदिर बांधण्यात येत आहे. मंदिराचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर असून, लवकरच या पुरातन मूर्तीला तिच्या वैभवाला साजेसे स्थान मिळणार आहे. एकीकडे सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आपल्या अंगी बाळगणारी ही पुरातन कृष्णमूर्ती, तिच्यावरील ऐतिहासिक शिलालेख आणि दुसरीकडे तिच्यासाठी उभे राहत असलेले नवे मंदिर—यामुळे अंजीचा जवळपास आठशे वर्षांचा धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास नव्याने उजेडात येणार आहे.

विदर्भाच्या मातीत आजही अशा अनेक ऐतिहासिक ठेव्यांची जपणूक होत आहे. अंजी येथील गोपाल कृष्णाची ही पुरातन मूर्ती त्यापैकीच एक अनमोल वारसा आहे. शेकडो वर्षांचा इतिहास आपल्या कुशीत जपणाऱ्या या मूर्तीला आता नव्या मंदिराचे रूपाने नवे स्थान मिळत आहे.
आठशे वर्षांचा इतिहास सांगणारी ही गोपाल कृष्णाची मूर्ती… अंजीच्या प्राचीन वैभवाची आणि विदर्भाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची अनमोल साक्ष!

माहिती साभार – डाॅ. सचिन दिक्षित
छायाचित्र – श्री अमोल चोपडै

Written By: Vidarbha Darshan

Leave a Comment