नागलोक –
प्राचीन भारतीय इतिहासातील नागलोक हे एक न सुटलेलं कोडं आहे. विशेषतः डाव्या आणि Subaltern इतिहास संशोधकांचा ‘नाग’ हा आवडीचा विषय राहिला आहे. काही गोष्टीत Subaltern इतिहासकार नागलोकांचे कौतुक करता करता संपूर्ण भारतीय इतिहासच ‘नागमय’ बनवून टाकतात. अतिशयोक्ती सोडली तर पुढील गोष्टी नागांसंबंधिच्या अगदी खऱ्या आहेत. आदिवासी आणि अंशत: क्षत्रिय जातीत ज्या प्रकारे नागपुजेचे प्राबल्य दिसते तसे अन्यत्र क्वचित दिसते. क्षत्रिय जातीत ‘नाग’ हे पुजेपुरतेच नाही तर नाग हे त्यांचे कुळाचेसुद्धा प्रतीक आहे. साहित्याचा आधार घेतला असता पुराणे अथवा प्राचीन साहित्यात ‘नाग’ हे आपले स्थान धडपडत बळकट करताना दिसतात. कुठे ते सत्ता स्थापन करण्यासाठी उच्चकुलीन सत्ताधाऱ्यांशी नातेसंबंध प्रस्थापित करताना सुद्धा दिसतात.
भारतात सूर्यवंश आणि चंद्रवंश आहे. तसाच नागवंश सुद्धा प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ दख्खनेतील न्हावी, छोटा नागपूरमधील कुर लोक व म्हैसूरकडील काही राजघराण्यांचे लोक आपले पुर्वज नाग होते असे सांगतात. नाग ही प्राचीन काळातील महत्वाची जमात होती. कालिया, शेष, वासुकी, तक्षक, पुंडरीक, कर्कोटक इ. सुप्रसिद्ध नागांची नावे सगळ्यांच्या परिचयाची आहेत. शतपथ ब्राह्मणात सर्प जमात असल्याचा उल्लेख आढळतो. त्यांच्याकडे सर्पविद्या असल्याचे शतपथ ब्राम्हणात म्हटले आहे. गोपथ ब्राम्हण यात तर सर्पवेद असल्याचा उल्लेख आहे. अनेक स्थळांना नागांच्या वस्तीवरुन नावे पडलेली आढळतात.
गुप्त-वाकाटक काळाचा विचार करता गंगा दुआबात कुशाणांची सत्ता कमकुवत करण्यात हे नागवंशीय राजे कारणीभूत होते असे काही विद्वानांचे मत आहे. या नागवंशीय राजांची नाणी मध्यभारत आणि मथुरा भागात मोठ्या प्रमाणात मिळतात. इ.स.च्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकांत पश्चिम उत्तर प्रदेश आणि मध्य भारतातील ग्वाल्हेर प्रांत यांवर या नागराजांचा अंमल होता.
पद्मावती आणि आसपास सापडलेल्या भारशिव राजांच्या नाण्यांच्या अभ्यासावरून दहा राजांची नावे लक्षात आली आहेत. ती पुढीलप्रमाणे – भीमनाग, विभुनाग, प्रभाकरनाग, स्कन्दनाग, बृहस्पतिनाग, व्याघ्रनाग, वसुनाग, देवनाग, भवनाग आणि गणपतिनाग. हे नाग राजे सुरुवातीच्या काळात जरी कुशाणांचे सामंत असले तरी यौधेयांनी कुशाणांचे साम्राज्य खिळखिळे केल्यानंतर मथुरा आणि पद्मावती येथील नागवंशीय राजांनी आपले स्वातंत्र्य उद्घोषित केले असावे(प्रस्तुत मत डॉ. अरविंद जामखेडकर यांचे आहे).
पुढे याच नागराजांचा समुद्रगुप्ताने पराभव केला. परंतु पुढे द्वितीय चंद्रगुप्ताने नागकन्या कुबेरनागा हिच्याशी विवाह केला. कुबेरनागा आणि चंद्रगुप्त(द्वितीय) पासून झालेली मुलगी म्हणजे प्रभावतीगुप्ता. प्रभावतीगुप्ताचा विवाह वाकाटकराजा रुद्रसेन(द्वितीय) सोबत झाला.
इ. स. च्या ५-६ व्या शतका पर्यंत अशा प्रकारे या नागांचे अस्तित्व प्रबळ असलेले दिसते. पुढे महाराष्ट्रात यादव काळात असलेले सेंद्रकांचे घराणे हे सुद्धा नागवंशीच. हेच सेंद्रक/सेन्द्रक पुढे जाऊन शिंदे म्हणून मध्ययुगात नावारूपास आले. मराठा काळात शिंदे घराण्याचे कर्तृत्व किती अफाट होते हे वेगळे सांगायचे कारण पडू नये. अर्थात हे शिंदे स्वतःला अभिमानाने नागवंशी म्हणवून घेत असत…!
©पृथ्वीराज धवड
