खान्देशांतील मंदिरे भाग 2

मृगव्याधेश्वर मंदिर, नांदूरमध्यमेश्वर

खान्देशांतील मंदिरे भाग 2 –

खान्देशांतील मंदिरे भाग 2, या भागात शिल्पशास्त्र, मंदिराचे प्रकार व मंदिर  उभारणीचा संकल्प, कार्यवाही व पथ्ये या विषयी थोडक्यात जाणून घेऊया.

शिल्पशास्त्र –

मंदिर उभारणीसाठी शिल्पशास्त्र समजावून घेतले पाहिजे. शिल्पशास्त्र म्हणजे अत्यंत एकाग्रतेने घडवलेली कृती.मंदिरे आणि समाधी यांच्या संदर्भात शिल्प ही संज्ञा योजिली जाते. वास्तु ही संज्ञा प्राधान्याने इमारतीशी संबंधित आहे. शुक्राचार्य, भृगु यांच्यापासून शिल्पशास्त्र व शिल्पकला भारतात सुप्रसिद्ध आहे. मत्स्यपुराणाप्रमाणे भृगु, अत्रि, वसिष्ठ, विश्वमित्र, मय, नारद, नग्नजित, विशालाक्ष, इंद्र, बह्म, कुमार, नंदी, शौनक, गर्भ, वासुदेव, अनिरुद्ध, शुक्र, बृहस्पति या अठरा महर्षिपासून शिल्पशास्त्र विकसित झाले आहे. अग्नि, मत्स्य, पद्म, विष्णुधर्मोत्तर इत्यादी पुराणे आणि कामिक, कारण, वैखानस, अंजित, अंशुमद्धेद, सुप्रभेद  इत्यादी आगमात देवालये व शिल्पशास्त्राचे अगणित तपशील आलेले आहेत. ‘चक्रव्यूहा’ प्रमाणे स्थापत्यशास्त्र, शिल्पशास्त्र म्हणजे अथर्ववेदचा उपवेदच आहे.

भारतात शिल्पशास्त्राचा अभ्यास वेदाप्रमाणे अत्यंत गांभीर्याने आणि गुरु-शिष्य परंपरेने केला गेला हे उघडच आहे. शिल्पशास्त्रावर बारा लाख श्लोक लिहले गेले आहेत. भृगु, अंगिरस अथर्वण या घराण्यानी शिल्पशास्त्राचा पाया भारतात घातला. त्याना शिल्पगण अशी संज्ञा होती. वैदिक शिल्पज्ञ ‘त्वष्टा’ हा याच ऋषिकुलात जाणता  झाला. नभानेदिष्ठ हा मनुचा पुत्र असला तरी त्याने अंगिरसाकडून शिल्पविद्या आत्मसात केली. विश्वकर्मा याचे नाव सर्वश्रुत आहे, त्यांचा गौरव ‘आचार्य’ या संज्ञेने केला आहे. ‘अपराजितापृच्छा’  या ग्रंथानुसार विश्वकर्माने बारा हजार ग्रंथ(श्लोक?)  शिल्पशास्त्रावर लिहिले. त्यापैकी चार हजार (श्लोक?)  आज उरले आहे. विश्वकर्म्याच्या नावावर विश्वकर्मीय, विश्वकर्मविद्या, विश्वकर्मप्रकाश, विश्वकर्मशिल्प, विश्वकर्मसिद्धांत, विश्वकर्मवस्तु, विश्वकर्मागम, विश्वकर्मसंहिता इत्यादी ग्रंथ आहे. भारतीय परंपरेत शिल्पशास्त्रज्ञाना ‘रथकार’ म्हंटले आहे. मनु, मय, त्वष्टा, विश्वज्ञ आणि शिल्पिन हे पांच रथकार म्हणजे विश्कर्माची पांच मुखे जणू. यांनाच स्कंदपुराणात विश्वकर्माचे  शिष्य म्हंटले आहे ते अनुक्रमे धातुशिल्प, काष्ठशिल्प, तांबेशिल्प, पाषाणशिल्प आणि सुवर्णशिल्पात अत्यंत प्रगत शिल्पशास्त्रज्ञ आहे.

स्थापत्य म्हणजे सिद्धांतासंदर्भात शास्त्र तर कारागिरीत कला आहे. स्थापत्यवरुन स्थपती (आर्किटेक्ट) ही संज्ञा आली आहे. स्थापत्य वा शिल्पशास्त्रावरील बहुतेक ग्रंथ हस्तलिखित स्वरुपातच आहेत. त्यापैकी बृहत्संहिता, प्रतिमालक्षण, चित्रलक्षण, मानसार, काश्याशिल्प, विश्वकर्मशास्त्र, सकलाधिकार, अपराजितपृच्छा, समराङ्गणसूत्रधार, मयमतशिल्पशास्त्र, मयवस्तु, मानसोल्लास, चतुर्वर्गचिंतामणि, रूपमंडन, शिल्परत्न नारदियसंहिता इत्यादी. शिल्पशास्त्रात प्रतिमा संज्ञा देवतामूर्तीशी निगडित आहे तर चित्र म्हणजे प्राकारतील सजावटीशी. शिल्पशास्त्र हे साक्षात शिल्पविद असल्यामुळे शिल्पीला माता तर शस्त्राला पिता मानण्याचा आदर भारतीय परंपरेने प्रकट केला आहे.

मंदिर उभारणीचा संकल्प, कार्यवाही व पथ्ये-

मंदिर वा राजप्रासाद निर्माणविधीला पुराणानी वास्तुशास्त्र म्हंटले आहे. आणि मत्स्य, अग्नि, विष्णुधर्मोत्तर, गरुड़ इत्यादी पुराणात या शास्त्राचे विवेचन आले आहे. वास्तुविद्येचे मूलसिद्धांत, भूमिपरीक्षा व त्यावर मंदिर निर्माण करण्याची रूपरेषा, देवतामूर्ती घडविणे आणि मंदिर रचना अशा चार गोष्टींचे विवरण पुराणात केले आहे. सार्वजानिक मंदिराच्या उभारणीचे टप्पे ‘काश्यपीय’ ग्रंथात असे दिले आहे.

१) भू-परीक्षा (मंदिराच्या उभारणीसाठी सुलक्षण भूमीची निवड करने).
२) प्रवेश-बली (भूमीतील पिशाच्चादिंची शांती करने)
३) भू-परिग्रह (भूमिशुद्धी करने).
४) भू-कर्षण (भूमी नांगरणे).
५) शंकु-स्थापना ( चतु:सीमा स्थापित करने).
६) पदविन्यास वा वास्तुविन्यास (वास्तुनिर्मितीसाठी मर्यादित भूमी मोजणे).
७) प्रासाद-वास्तु (मंदिर निर्मितीची रचना करणे).
८)वास्तु-होम (यागाने- यज्ञाने भूमी संस्कारित करणे).
९)प्रथमेष्टक विधी (पहिल्या विटांचे बांधकाम करणे).
१०)उपपीठ विधी (पायाभरणी करणे).
११)अधिष्ठान विधी (गर्भगृह व अधिष्ठान बांधणीचा प्रारंभ करणे).
१२)पाणी-मजले-कोठी इत्यादींचे व्यवस्थापन करणे).
१३) सकल स्थापना/ प्रतिमा/ मूर्तिप्रतिष्ठा (इष्टदेवतेची समंत्रक स्थापना करणे).
१४) विमान स्थापना (विमान पूर्ण करून कलशारोहण विधी संपन्न करणे).

महर्षि अगस्त्याच्या ‘सकलाधिकार’ मध्ये नऊ टप्प्यात मंदिर उभारणीचे दिग्दर्शन आहे-

१) मृद संग्रहण ( माती वा भूमिपरीक्षा), २) अंकुरार्पण (अनिष्ट निवृत्ती), ३) बिम्बशुद्धी (इष्टदेवतामूर्तीशुद्धी), ४) कौतुक-बंधन (मूर्तीच्या कमरेला पवित्र दोरा गुंडाळणे), ५) नयनोन्मीलन (मूर्तीशी नेत्रोन्मीलन) ६) बिम्बशुद्धी (इष्टदेवताची पुन्हा मूर्तीशुद्धी), ७) शयनारोपण (मूर्तिस्थापना उत्सवाची तयारी), ८) बिम्बस्थापना (समंत्रक स्थापना) ९) महाप्रतिष्ठा ( मूर्तीची प्रतिष्ठापना)

मंदिराच्या उभारणीसाठी यजमानाने अर्थात दानशुराने ईश्वरसाक्ष संकल्प करावयचा असतो. त्यानंतर धर्मश्रद्ध, सदाचारसंपन्न, ज्ञानवंत स्थापकाची वा आचार्याची (सत्पात्र ब्राम्हण पुजारी) निवड यजमानाने जाणतेपणाने करावयाची असते.मंदिराच्या उभारणीसाठी स्थपती अपरिहार्य असतो. त्याच्या मदतीला सूत्रग्राहीनम (सर्वेक्षक), तक्षक(शिल्पी-बांधकाम करणारा) आणि वर्धकिन (मोजमापे, उत्तम मालाची निवड व त्याचा टिकाऊपणा जाणणारा) यांची भूमिका महत्त्वाची असते. मंदिराचा संकल्प केला की यजमानसहित वरील सर्वाना पावित्र्याची, सदाचाराची शपथ घ्यावी लागते. वास्तुमंडलाचा आराखडा पूर्ण केल्यावर ‘सोम’ या नवजीवनाच्या देवतेला, मंदिर उभारणी कोणत्याही अडथळा, अरिष्ट, संकट शिवाय पूर्ण व्हावी या साठी सोळा प्रकारचे धान्य अर्पण करून ‘अंकुरार्पण’ हां अत्यंत महत्वाचा धार्मिक विधी केला जातो. त्यानंतरचा महत्वाचा टप्पा म्हणजे ‘शिलान्यास’ होय. मंदिराच्या पायाभरणीसाठी चौकोनी आकाराचा शुभलक्षणी दगड उपयोगात आणला जातो. हा शिलान्यास वायव्य कोपऱ्यात केला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष पायाभरणी केली जाते. पायाभरणी नंतर चौथऱ्याच्या मध्यावर आधारशिला स्थापना केली जाते. त्यावर निधिकुंभ स्थापना केल्यावर योगनाला(तांब्याची नळी) निर्माण करण्यापूर्वी मध्ये अनुक्रमे दगड, चांदी व सोने  यांच्या कासव आणि कमळ यांच्या प्रतिमा मांडल्या जातात.या सर्वांवर ब्रम्हशिला बसवली जाते. त्यावर प्रत्यक्ष देवतामूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते. पृथ्वीची पूजा करण्यासाठी गर्भन्यास हा विधीही अत्यंत महत्वाचा आहे. तांब्याच्या भांड्यात समृद्धीची प्रतिके घालून समारंभपूर्वक आणि धर्मिकविधीनुसार ते भांडे जमिनीत ठेवले जाते. ज्या साधनानी बांधकाम करावयाचे, त्यासर्व साधनांचे, हत्यारांचे विधीवत पूजन होते. मंदिराची पायाभरणी झाल्यावर भिंती आणि स्तंभ यांच्या समन्वयाने मंदिराची उभारणी केली जाते. प्रत्यक्ष देवतामूर्तीची प्रतिष्ठापना हा सर्वश्रेष्ठ समारंभ असतो.

मंदिर उभारताना काही पथ्ये सुद्धा पाळावी लागतात ते असे-भूमिपरीक्षा-पुजारी आणि यजमान या दोघांनीही शुक्ल वा कृष्ण पक्षाच्या  पहिल्या दहा दिवसात भूमिपरीक्षण करावे. त्यासाठी ‘नामराशौ प्रधानत्वं जन्मराशिं न चिंतयेतं’ असा संकेत यजमानांच्या बाबतीत आहे. भुमीचे ‘स्निग्ध’ आणि ‘अस्निग्ध’ असे दोन प्रकार पडतात. जिथे मऊ माती अधिक ती स्निग्ध आणि जिथे दगड जास्त तो अस्निग्ध वा टणक प्रकार होय, दोन्ही प्रकारची भूमि मंदिर उभारणी साठी उपयुक्त आहे, दगड़ात बांधलेली मंदिरे उत्तम ( मुख्यं शिलामयंधाम) विटांची माध्यम (मध्यमिष्टकयाकृतं) लाकडांची कनिष्ठ (अधमं दारुजं धाम) आणि मृत्तिकेचि त्याज्य मानली आहेत (श्री प्रश्नसंहिता). त्या त्या भूमीवर उगणाऱ्या वृक्षवरुन भुमीचे सुपद्म, भद्र, पूर्ण व धूम्र असे चार प्रकार पद्म संहिता ग्रंथात दिले आहेत. भूमी निवडल्यावर चतु;सीमा निश्चित करण्यासाठी चारही कोपऱ्यांवर उत्तम बी पेरावे व ते उगवल्यावर सुलक्षणा गायी खातील असे पहावे, कारण त्यायोगे भूमी शुद्ध होते. भूमिपरीक्षा कोणत्याही ईष्ट महिन्यात  करावी असे मरीचीचे मत आहे. मात्र काश्यापाच्या ‘ज्ञानकांडात’ ‘शुभमास मुहूर्तेषु’ असे पथ्य सांगितले आहे. भूमिपरीक्षेसाठी खलील कसोट्या सर्वमान्य आहेत-

१) मास-आषाढ़, भाद्रपद, माघ हे मास वर्ज्य आहेत. इतर कोणत्याही महिन्यात देवलयासाठी भूमिपरीक्षा करावी.
२) पक्ष -शुल्क वा कृष्ण कोणताही  पक्ष चालेल. पण शेवटचे पांच दिवस (एकादशी ते पौर्णिमा वा अमावस्या) वर्ज्य.
३) नक्षत्र- रेवती, रोहिणी, स्वाती, धनिष्ठा, चित्रा,पुनर्वसु, आश्विनी, मृगशीर्षे ही नक्षत्रे शुभ.
४) दिवस- मंगळवार, शनिवार वर्ज्य.
५) करण- रूद्र, सर्प, इंद्र वर्ज्य. ( चोवीस तासात दिवस आणि रात्र मिळुन एकूण ३० मुहूर्त असतात, प्रत्येकी मुहूर्त हा ४८ मिनीटाचा असतो. त्याना वार-जनित मुहूर्त म्हणतात. यांची गणना सूर्योदय पासून केली जाते. पहिला रूद्र, दूसरा उग्र वा सर्प,  चौथा वा दहावा इंद्र मानला जातो). भूमी निवडल्यावर वास्तुमंडळाचा आराखडा(वास्तुविन्यास) सिद्ध करावा लागतो. त्यासाठी ६४ घरच्या रचनेत वास्तुपुरुषाची स्थापना केली जाते.
६) योग- वैधृती, विष्कंभ, वज्र, परिघ, व्याघात, शूल, अतिगंड आणि व्यतिपात हे योग भूमिपरिक्षेसाठी वर्ज्य.

भूमिचा आकर कसा असावा याचा तपशील अनेक ग्रंथांमध्ये आला आहे. भूमी ‘आयतास्त्र’ वा चौकोनी म्हणजे ‘दीर्घ -चतुरस्त्र’ असावी. आयाम म्हणजे विस्तार होय. ‘विस्तार: पूर्वपश्चिमायाम:’ म्हणजे रुंदी हे पूर्व -पश्चिम असावी. तसेच दैर्घ्यं म्हणजे लांबी उत्तर-दक्षिण असावी ‘दैर्घ्यं दक्षिणोत्तरायाम:’ असे शास्त्र सुचवितात. वर्तुळाकार, त्रिकोणी, दंडकृति, शकटाकृति, पंखाकृती, कासवाकृती, धनुष्याकृती, घटाकृती, विषमाकृती ५-६-७-८-९ कोणांची अशी भूमी मंदिर उभारण्यासाठी नसावी. समरांगण-सूत्रधार’या ग्रंथात भुमीचे (देशाचे) जांगल, अनूप आणि साधारण असे तीन विभाग आणि सोळा प्रकार सांगितले आहेत, ते सोळा प्रकार असे- बालिश-स्वामिनी, भोग्या, सीता, गोचर-रक्षिणी, अपाश्रयवती, कान्ता, खनिमती,आत्मधारिणी, वणिकप्रसाधिता, द्रव्यवती, अमित्रघातिनी, आश्रेणीपपुरुषा, शाक्यसामंता, देवमातृका, धन्या, हस्तीवनोपेतो, आणि सुरक्षा.’विश्वकर्मवास्तुशास्त्र’ ग्रंथात मंदिराच्या उभारणीसाठी आवश्यक अशा ‘वास्तुभूमीचे’ वर्णन आले आहे. लांबी-रुंदीचे परिमाण ४:८ , ४:७, ४:६ वा ४:५ असावे असा हा ग्रंथ सांगतो. अशा भूमीवरील पाणी पावसाळ्यात पूर्व वा उत्तरेला वाहून जावे. भूमी ‘सर्वत: सुसमं’ असावी. पूर्व वा उत्तरेकडे सखल असलेली भूमी या पद्मसंहिता ग्रंथाने सर्वोत्तम मानली आहे. काश्यापाच्या ज्ञानकांडात वैष्णव, ब्राम्ह, रौद्र, इंद्र, गारुड़, भौतिक, असुर आणि पैशाच अश्या नऊ प्रकारची भुमि सांगितली आहे. यापैकी पाहिले पांच शुभलक्षणी तर शेवटचे चार त्याज्य मानले गेले आहे. त्यात वैष्णव हा सर्वोत्तम प्रकार होय. शुभ भूमीत न्यग्रोध(वटवृक्ष), औदुंबर, अश्वत्थ, मधुक या वृक्षासंमवेत तुसली, कृश, दर्भ, , विश्वामित्र, विष्णुक्रांत, स्थलारविन्द, दूर्वा यांची विपुलता सर्व ग्रंथानी साग्रह सांगितली आहे.

निवडलेल्या शुभलक्षणा भूमीवर ३२ प्रकारांची  मंदिररचना ‘मयमत’ ग्रंथात दिली आहे. यापैकी माण्डूक वा चंडित (६४ चौरस), परमसायिक(८१ चौरस) आणि त्रियुत (२५६ चौरस) या रचना सर्वोत्तम असल्याचे मानले जाते. मत्स्यपुराणात या ३२ रचनांचे विस्तृत वर्णन आहे. या नंतर मंदिराची रुंदी आणि उंची यांच्या प्रमाणात पांच प्रकारे मंदिर उभारणी होते ते असे- १) शान्तिक (१*१),  २) पौष्टिक (१*१ १/४), ३) जयद ( १* १ १/२), ४) अद्भुत ( १*१ ३/४), ५) सार्वकामिक (१* २ आणि  १* २ १/२). मंदिर बांधताना अधिष्ठाण, पाद, प्रस्तर, पञ्जर, कर्णकुट, वेदिका, गल, हार, शिखर, महापद्म अशी दहा पदरी उभी रचना अनेक स्थळी केली जाते.

मंदिराचे प्रकार –

स्थूल मानाने मंदिराचे दोन प्रकार पडतात पहिला सिद्धायतन व दूसरा असिद्धायतन. नदीपात्रात, नदीकिनारी, समुद्रकिनारी, वनात साधू- ऋषिनी पवित्र केलेल्या परिसरात उभरलेली मंदिरे हे सिद्धायतन प्रकारत येतात. तर राजा-महाराजांनी, भक्तांनी बांधलेली मंदिरे दुसऱ्या प्रकारात येतात. पहिला प्रकार है वैश्विक आहे, तर दूसरा प्रकार ग्रामनगरापूरती आहे. ‘प्रकीर्णधिकारा’ त सिद्धायतनाविषयी अश्या प्रकारे सांगितले आहे- ‘मूले मूर्ध्नि शैलानां नदीतीरे च संगमे I समुद्रतीरे पुलिने हृदे तीर्थे च कानने l एतेषु निर्मितिम स्थानं सिद्धाख्यं विश्कर्माणा ll ‘ तात्पर्य सिद्धायतनची निर्मिति विश्वकर्मा वा त्याच्या परंपरेत होते. असिद्धायतनाविषयी श्री विष्णुतिलक संहितेत  असे म्हंटले आहे -‘देवादिभिहरं तत्र स्थापितश्वेद्यथाविधि l मनुष्यनिर्मितं ग्रामनगरादौ गृहं मम l असिद्धायतनं विद्धि ग्रामादि स्थिति हेतुकमं ll ‘. त्याचप्रमाणे  शिल्पसंग्रह ग्रंथाच्या दहाव्या अध्यायात पर्वतवरील मंदिर उत्तम, वनातील मध्यम, नदीवरचे कनिष्ठ आणि ग्रामातील सामान्य म्हंटले आहे. (उत्तमं पर्वताग्रेषु मध्यमं वनराजिषु l अधमं तु नदीतीरे ग्रामेलीष्वधमाधममं ll ‘.

तथापि ज्या मंदिरात समाजाकडून इष्टदेवतेचे पूजन होते त्याचे पांच प्रकार आहेत. १) स्वयंव्यक्तं – मानवाने न घडवलेल्या व ईश्वरी प्रसादाने मूर्त झालेल्या शिवलिंगादी प्रतिमा. २) दैविक-प्रत्यक्ष विश्वकर्माने निर्मलेली मंदिरे व देवमूर्ती. ३) आर्ष- प्राचीनकाळी ऋषिमुनीनी, तापसजनानी उभारलेली. ४) पौराण- पुराणकाळात उभारली गेलेली आणि ५) मानुष – मानव वा महाराजांनी निर्मलेली). अग्निपुराणात मंदिराचे हेच पांच प्रकार वेगळ्या नावाने आले आहेत. १) वैराज , २) पुष्पक , ३) कैलाश, ४) मणिक आणि ५) त्रिविष्टप यापैकी पहिल्या दोन प्रकारची मंदिरांची रचना चौकोनी वा चौरस असते. तीसरा प्रकार ( कैलास) गोलाकार रचनेचा चौथा वृत्ताकार आणि पांचवा अष्टभुजाकार वा अष्टकोणी असतो. या पाचही प्रकारचे पुन्हा नऊ उपप्रकार आहेत.

१) वैराज -मरू, मंदर, विमानभद्र, सर्वतोभद्र, चरुक, नन्दिक, नन्दि, वर्धमान, श्रीवत्स.
२) पुष्पक- वलभी, गृहराज, शालागृह, मंदिर, विशाल, ब्रम्हमंदिर, भुवन, प्रभव, शिविकावेश.
३) कैलास- वलय, दुदुंभी, पद्म, महापद्म , वर्धिनी, उष्णव, शङ्ग, कलश,  ख़वृक्ष.
४) मणिक- गज, वृषभ, हंस, गरुत्मान, वृक्षनायक, भूषण, भूधर, श्रीजय, पृथ्वीधर
५) त्रिविष्टप- वज्र, चक्र, स्वस्तिक, वज्रस्वस्तिक, चित्र, स्वस्तिकखड्ग, गदा, श्रीकंठ, विजय.

पुढील भागात मंदिर  वास्तूचे प्रमुख घटक विस्ताराने बघूया.

धन्यवाद
टीम एक्सप्लोर खान्देश (Team Explore Khandesh)
आम्हना वारसा, आम्हना अभिमान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here