प्रतापगडची दुसरी लढाई (१६८९)

प्रतापगडची दुसरी लढाई (१६८९)

प्रतापगडची दुसरी लढाई (१६८९) –

प्रतापगड म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येतं अफजलखान भेट, वध आणि प्रतापगडचा अद्वितीय रणसंग्राम. प्रतापगडचे युद्ध हे केवळ मराठ्यांच्याच इतिहासात नव्हे तर जगाच्या इतिहासात एक उल्लेखनीय युद्ध म्हणता येईल; आणि यात कसलीही अतिशयोक्ती नाही. १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी झालेली ही लढाई इतिहासप्रेमी मराठी जनांच्या मनात रुजलेली आहे; मात्र याच प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवकाळातच अजून एक लढाई झालेली आहे आणि ती लढाई शिवछत्रपतिंच्याच सुपुत्राने लढलेली आहे हे अत्यंत कमी लोकांना माहिती आहे. प्रतापगडच्या पहिल्या लढाईच्या तुलनेत प्रचंड अल्पपरिचित असलेली प्रतापगडची दुसरी लढाई झालेली आहे राजाराम महाराज आणि मोगलांमध्ये; १० जून १६८९ या दिवशी.

११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांची क्रूर हत्या केल्यानंतर औरंगजेबाने स्वराज्य समूळ नष्ट करण्यासाठी जुल्फिकारखानाला मोठे सैन्य देऊन मराठ्यांची राजधानी रायगड काबीज करण्यासाठी पाठविले. मराठ्यांच्या अनेक हल्ल्यांना तोंड देत जुल्फिकारखान रायगडला आला आणि २५ मार्च १६८९ रोजी त्याने रायगडाला वेढा घातला. तेव्हा रायगडावर राजपरिवार आणि दौलतीच्या महत्त्वाच्या कारभाऱ्यांची मसलत झाली आणि येसूबाईसाहेबांनी कमालीची दूरदृष्टी दाखवत स्वराज्याचे भावी वारसदार राजाराम महाराजांना रायगड सोडायला सांगितले. ही मसलत म्हणजे एक महत्त्वाचा आणि स्वतंत्र लेखाचा विषय आहे, तूर्तास प्रतापगडच्या लढाईचा विषय असल्यामुळे थोडक्यात उल्लेख केला. त्याप्रमाणे राजाराम महाराज ५ एप्रिल १६८९ रोजी रायगडावरून निसटले आणि जावळीच्या खोऱ्यातून प्रतापगडावर आले.

प्रतापगडावर येताच राजाराम महाराजांनी सर्व सूत्रे हाती घेतली. औरंगजेबाशी चालू असलेल्या लढ्याला बळकटी आणण्यासाठी त्यांनी अनेक सरदारांना पत्रे पाठविलीत. इकडे मोगलांना राजाराम महाराजांच्या हालचालींची बातमी कळली आणि औरंगजेब बादशहासह झुल्फिकारखान, फतेजंगखान, खानबहादूर, बहादूरखान या मोगल सरदारांनी राजाराम महाराजांना पकडण्यासाठी खटपटी सुरू केल्या. तेव्हा काकरखान नावाचा मोगल सरदार मोठी फौज घेऊन प्रतापगडावर चालून आला. आंबाजी चंद्रराव, लोधीखान देशमुख तुडीलकर, हिरोजीराव दरेकर हे सरदार या काकरखानाला सामील झालेत. काकरखानाने आपल्या सैन्यानिशी प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या पार या गावाजवळ येऊन ठाण मांडली. तो प्रतापगडाला वेढा घालणार याआधीच राजाराम महाराज त्यांच्याजवळ जी थोडीशी फौज होती ती व प्रतापगडची थोडीफार शिबंदी होती ती घेऊन गडाखाली उतरले आणि त्यांनी खानाच्या फौजेवर थेट हल्ला चढवला.

राजाराम महाराजांबरोबर तेव्हा सरनौबत पिलाजी गोळे, रूमाजीराव येरूणकर, जावजी पराटे हे शूर मराठा सरदार होते. जोरात लढाई झाली. राजाराम महाराज हत्तीवर आरूढ होते. त्यांच्या हत्तीच्या राणू नामक माहुताने हत्ती ऐन रणधुमाळीत घातला. तेव्हा हिरोजी दरेकराने हत्तीवर वार करून हत्तीची सोंड कापली. शत्रूचे वाढते सैन्यबळ आणि जखमी हत्ती या बिकट परिस्थितीत राजाराम महाराजांनी प्रसंगावधान दाखवत गडाचा आश्रय घेतला. या लढाईत दोन्ही बाजूंची अनेक माणसे मारली गेली. काहीजण शेजारच्या कोयना नदीत बुडून मरण पावली. ही लढाई अनिर्णित होती.

या लढाईनंतर राजाराम महाराज तब्बल दोन महिने प्रतापगडावर होते व प्रतापगडाला वेढाही पडलेला नव्हता. पण नंतर जावळीच्या परिसरात मोगली फौजा जमा होऊ लागल्यामुळे राजाराम महाराजांनी १० ऑगस्ट रोजी प्रतापगड सोडून वासोटा किल्ल्यावर गेले. मोगली फौजांचा पाठलाग सुरू झाला. तेव्हा वासोट्यातून अजिंक्यतारा, तिथून सज्जनगड, सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊन ऑगस्ट १६८९ मध्ये ते पन्हाळ्यावर आले. तिथून २६ सप्टेंबरला ते मोगलांना चुकवत, प्रसंगी झुंजत जिंजीकडे निघाले. राजाराम महाराजांच्या या जिंजीच्या अतिशय रोमांचक, थरारक प्रवासावर समकालीन केशव पंडित यांनी ‘राजारामचरितम्’ हा संस्कृत काव्यग्रंथ लिहिलेला आहे. तो सगळा वृत्तांत केवळ अद्भुत आहे.

राजाराम महाराजांची ही पहिली लढाई. राजाराम महाराज त्यावेळी १९ वर्षांचे होते. त्यांना संभाजी महाराजांसारखे लष्करी शिक्षण, राज्यकारभाराचे धडे बिलकुल मिळालेले नव्हते. गेली नऊ वर्षे ते फक्त रायगडावरच होते. परिस्थिती अत्यंत बिकट होती. छत्रपति संभाजीराजांची हत्या झालेली होती, स्वराज्यातले अनेक महत्त्वाचे किल्ले मोगलांच्या ताब्यात गेलेले होते, मराठ्यांचे अनेक मातब्बर, मोठमोठे सरदार मोगलांना मिळालेले होते, प्रत्यक्ष राजधानीला वेढा पडलेला होता आणि अवघे राजकुटुंब संकटात सापडलेले होते (पुढे तर राजधानी आणि राजकुटुंब दोन्हीही मोगलांच्या ताब्यात आले) अशा परिस्थितीत राजाराम महाराजांनी धैर्याने, स्थिरबुद्धिने आणि दराऱ्यानेही स्वामिनिष्ठ, इमानी, शूर मराठे मंडळींना एकत्र करून त्यांच्या साहाय्याने स्वराज्याचे रक्षण केले.

मला राजाराम महाराजांचे चरित्र हे इतर छत्रपतींच्या तुलनेत या प्रतापगडच्या दुसऱ्या लढाईसारखेच काहीसे दुर्लक्षित वाटते. राजाराम महाराजांच्या चरित्राविषयी आणि कर्तृत्वाविषयी अनेकांना नीट, योग्य माहिती नाही. असो. ‘गड आला पण सिंह गेला’ – तानाजी मालुसरेंची सिंहगडची लढाई सगळ्यांना माहीत असते पण राजाराम महाराजांच्या काळात नावजी बलकवडेंनी स्वतःचे प्राण न गमवता सिंहगड मोगलांकडून परत स्वराज्यात आणला ती १६९३ सालची सिंहगडची लढाई तितकी प्रसिद्ध नाही. अगदी तसेच प्रतापगडच्या या दुसऱ्या लढाईच्या बाबतीत आहे. प्रतापगडच्या या दोन्ही लढाया स्वराज्याच्या छत्रपतिंच्या जीवावर बेतलेल्या होत्या. राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतली ही पहिली लढाई म्हणजे पुढच्या मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची नांदीच होती.

संदर्भ :
‘ऐतिहासिक साधने’, संपादक शां.वि.आवळसकर.
शिवपुत्र छत्रपती राजाराम, जयसिंगराव पवार.
मुन्तखबुललुबाब ए महमंदशाही, खाफीखान.
मोगल मराठा संघर्ष, सेतू माधवराव पगडी.
थोरले राजाराम महाराज यांचे चरित्र, मल्हार रामराव चिटणीस.

– प्रणव कुलकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here