महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,528

आदिमानवाशी अधुरी भेट

By Discover Maharashtra Views: 181 8 Min Read

आदिमानवाशी अधुरी भेट –

मेळघाटाचा व सातपुडयाचा सेमाडोह परिसरातील पैलू डोळयांद्वारे मनात साठवून परत फिरलो. सेमाडोहचा घाट जढून आल्यानंतर ‘घटांग’ गावात पोहचलो. घटांग गावातील फाटयावरून एक रस्ता सेमाडोहकडे तर दुसरा रस्ता बैतूलकडे जातो. फाटयावरूनच घाटाची सुरवात होते. सेमाडोडसाठी उतरणारा घाट आणि मध्यप्रदेशात प्रवेशासाठी जढत जाणारा घाट यांच्यामध्ये टांग टाकून बसलेले गाव म्हणून त्याचं नाव घटांग असावे. असे तर्कट उगाच मनात येऊन गेले. बैतूलकडे जाणारा हा घाट कसा असेल? याविषयी मनात शंका येत होती. परतवाडयावरून दुसरा रस्ता होता,मात्र त्यासाठी पस्तीस किलोमिटर मागे जावे लागणार होते. त्याचा कंटाळा आणि गाडीचे डिझेल वाचवण्याचा प्रापंचिक विचार यातून घाटाच्या अवघडपणाचा विचार मागे पडला. त्यातच एक लालपरी घाट चढताना दिसली. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी भले सदावर्तेवर विश्वास ठेवत असले,तरी आपला आजही लालपरीवर विश्वास कायम आहे. हातात आलेल्या कारमुळे तो तीळमात्र कमी झालेला नाही. लालपरीचा नाद करून घाट चढण्यास सुरवात केली. काही अंतर गेल्यावर हा नाद खुळा आहे,याची जाणीव होऊ लागली. सातपुडयातील सर्वात मोठी पर्वतरांग चढवून लोकांना ‘वर'(मध्यप्रदेशात) घेऊन जाणारा हा घाट आहे. याची जाणीव आपण कोणता ‘घाट’ घालून ठेवला आहे. याची जाणीव करून देऊ लागला. अवघा आठ फुटाचा रस्ता आणि दरीच्या बाजूनं कोणताही अडसर नसल्यानं पुन्हा थेट सेमाडोहला जाण्याची सोय,अशी घाटाची अवस्था होती.

अधुनमधुन लालपरी घाटातून झोकात जाताना नजरेस पडत होती. माझी अवस्था मात्र झक मारली आणि तिचा नाद केला अशी झाली होती. जागेवर प्रचंड चढ असलेले वळणं चढतांना माझ्या गाडीच्या तोंडाला फेस येत होता आणि माझे तोंड कोरडे पडत होते. घाटातील मैलाचे दगड एका ‘कुकरु’ नावाच्या गावाचा सतत उच्चार करत होते. इकडे माझा कुकरु झालेला होता. एकदाचे कुकरु आले. आपण पठारावर पोहचलो,आता सपाट रस्ता लागेल,ही भावना मनाला सुखावून गेली. कुकरुपासून मध्यप्रदेश सुरु झाला. पठारावर मैलोंमैल हिरवेगार गव्हाचे पीक पवनचक्क्यांच्या तालावर डोलतांना दिसू लागले. शहरी धनदाडग्यांच्या विकासाची सोय असलेल्या पवनचक्क्यांच्या लांबच लांब पसरलेल्या काळया सावलीत या भागातील हिरव्यागार दारिद्रयाला विकासाचे स्वप्नं दाखवण्यात आले असेल. कदाचित वेलाप्रमाणे पवनचक्क्यांवर चढून स्वतःचा विकास शोधता येईल,असेही सांगितले गेले असावे. तुटक्या-फुटक्या खापरांना कशातरी तोलून धरणा-या कुडाच्या भिंती खापरांसोबतच ‘जय श्रीराम’ च्या भगव्या झेंडयाचा भार देखील उचलत असतांना दिसतं होत्या. अठराविश्व दारिद्रयाला चढलेला भगवा रंग खरोखरच मनात ‘गर्वसे कहो..’, ही भावना बळकट करून गेला. निसर्गानी दिलेली जन्मजात श्रीमंती आणि पाचवीला पुजलेली गरीबी या विरोधाभासात अडकलेली छोटी-छोटी गावं मागे टाकत, गाडी म्हैसदेही शहरात पोहचली. परिसरातील हे सर्वात मोठे गाव. पुढे मध्यप्रदेशचा टिपिकल कळकटपणा जपणारे काही गावं पार करत बैतूलला पोहचलो.

अवघ्या ११५ किलोमिटरचा प्रवास पूर्ण करण्यास साडेचार तास लागले. बैतुलला रात्र काढण्याची सोय झाली. नकळतपणे दक्षिण भारतातील अत्यंत स्वच्छ-निटनेटक्या लॉजची आठवण मनाला कुरतडत होती. त्यातल्या त्यात उदया ‘भीमबेटका’ पाहायचे हा विचार मनाला आनंद देत होता. सकाळी उठून इतरांची तयारी होईपर्यर्त जमेल तेवढा बैतूलचा फेरफटका मारला. कळकटपणशिवाय विशेष काही आढळले नाही. बैतूलवरून इटारसी रस्ता धरला आणि भीमबेटक्याकडे कूच केली. इटारसीप्रमाणे पूर्वीचे हौशंगाबाद आणि नव्या भारतातील ‘नर्मदापुरम’ देखील बायपास झाले. इतिहास जसा बायपास केला जात आहे,तसेच त्याच्याशी निगडित गावं देखील बायपासमुळे केवळ रंगीत पाटयांपुरती उरलेली आहेत की काय?, अशी जाणीव मनाला होत होती. आपण आता भोपाळकडे जात आहोत,याची जाणीव पाटयांवरून होत होती. भोपाळ ४५ किलोमिटर राहिले आणि भीमबेटक्याचा फाटा आला. फाटयावरच भुसावळ-इटारसी रेल्वे लाईनचे क्रॉसिंग होते. गाडयांची प्रचंड वर्दळ हया लाईनवर असल्याने आम्हाला देखील दोन गाडयानां ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन तिला क्रॉस करावे लागले. तेथून पुढे अर्ध्या किलोमिटरवर पुरातत्त्व विभागाचे दांडके आडवे आलेले होते,तेथे टिकिट काढले. त्यामुळे दांडक्या खालुन गाडी घालू देण्याची परवानगी मिळाली. काही मिटर पुढे गेलो आणि आपण एका वेगळया भौगोलिक वैशिष्ट असलेल्या भूप्रदेशात प्रवेश केला आहे,याची जाणीव होऊ लागली. ‘हम्पी-बदामी’ परिसरात ज्याप्रमाणे मोठे-मोठे दगड आहेत. तसाच हा परिसर जाणवू लागला. त्याचबरोबर आपण आपल्या आदिम पूर्वजांच्या अवशेषांजवळ जात आहोत,ही भावना मनात एक वेगळीच भावना निर्माण करत होती. अखेर आदिमानवांच्या ज्या गुहा आधुनिक माणसांना पाहण्यासाठी पुरातत्त्व विभागानं उपलब्ध करून दिल्या आहेत,त्यांच्या प्रवेशद्वारावर पोहचला. या परिसरातील आदिवासींना माहित असलेल्या मात्र नागर माणसांना अज्ञात असलेल्या या गुहांविषयी पहिले संशोधन किंकेड नावाच्या इंग्रज अधिका-यानं सर्वप्रथम ई.स.१८८८ मध्ये केले. त्याने आपल्या शोधनिबंधात हे बौद्ध स्थळ आहे, हे आवर्जुन नमूद केले होते. त्यानंतर ई.स.१९५७ मध्ये श्रीधर विष्णू वाकणकर या मराठी पुरातत्त्व संशोधकांनी हया गुहांचा अत्यंत परिश्रमपूर्वक अभ्यास केला. त्यांच्या शोधानुसार हया गुहा एक लक्ष वर्षांपूर्वीच्या असाव्यात आणि या गुहांमध्ये असलेली चित्रं ईसवी सन पंधरा हजार वर्षांपूर्वीचे (आजपासून सतरा ते अठरा हजार वर्षे) असावेत.

भारतीय पुरातत्त्व विभागानं देखील वाकरणकरांच्या परिश्रमाचे मोल जाणून हया गुहांचा परिसर अत्यंत नियोजनबद्ध व स्वच्छ ठेवलेला दिसतो. प्रत्येक गुहेच्या बाहेर त्याच्यातील चित्राचे वर्णन आणि त्यासंदर्भातील अधिक माहिती देण्यात आलेली आहे. हया परिसरातील रस्ता पहिल्या गुहेपासून सुरवात करून शेवटच्या गुहेपर्यंत आपल्याला बाहेर आणून सोडतो,अशा पद्धतीतेनं तयार करण्यात आला आहे. उत्तर भारतातील युटयुबर आणि भाडोत्री गाईड यांनी भीमबेटका प्रसिद्ध होऊ लागले तसे त्याच्या संबंध नेहमीप्रमाणे महाभारत व पांडव यांच्याशी जोडणारी भाकड कथा पसरवण्यास सुरवात केली आहे. वनवासात असतांना पांडव येथे वास्तव्याला होते. प्रवेशद्बाराजवळ असणा-या सर्वात मोठया गुहेत भीम त्यावेळी स्वतःची बैठक अथवा दरबार भरवत होता. त्यामुळे संस्कृतमध्ये या ठिकाणाला ‘भीमबैठिका’ म्हणजे ‘भीमाची बैठक’ असे संबोधले जाते. त्यावरून भीमबेटका हा अपभ्रंश तयार झाला. अशी कथा तयार करण्यात आली आहे. आता या कथेचा आधार घेतल्यास पांडव हे निश्चितच आदिमानवानंतर हया गुहांमध्ये वास्तव्याला असणार. प्राचीन भारतीय ज्ञानानुसार त्यांचाकडे आजच्यापेक्षा प्रगत तंत्रज्ञान होते. अशावेळी त्यांनी देखील काही चित्र काढली असती. या चित्रांमध्ये सर्व वस्त्र-आभुषणं ल्यालेली माणसं,राजवाडे,रथ,विविध अस्त्रं इत्यादी चित्रांचा समावेश असता. येथे मात्र अत्यंत प्राथमिक अवस्थेतील हरण-काळविट,माणसं,पक्षी,मासे,ससे,उंदिर,हत्ती,गेंडा,कुत्रा,मुंगीखाऊ(Anteater) यांची वारली चित्रकलेची जाणीव देणारी अत्यंत प्राथमिक अवेस्थेतील चित्रं पाहायला मिळतात.

खरे तर एका रात्रीत प्रचंड कोरिव काम करून मंदिर शिल्प उभे करणा-या पांडवांसाठी हा ‘टास्क’ अत्यंत किरकोळ असाच म्हणावा लागेल. यावरून एकच सिद्ध होते की रात्रीतून भाकड कथा तयार करून बौद्ध-जैन ठिकाणांची कर्तबगारी व इतिहास पांडवांच्या नावावर करता येतो,मात्र तो तर्क व तथ्यांच्या आधारावर सिद्ध करता येत नाही. हे सर्व पाहत असतांना भाषेच्या निर्मितीपूर्वी आदिमानवाच्या मनात रंग-रेषा यांच्या माध्यमातून आपली प्रतिभा व अस्तित्व कायमचे कोरून ठेवण्याचा विचार कसा आला असावा? हा विचार गेली २४ वर्षे भाषाविज्ञान शिकवत असलेल्या मला सहज पडून गेला. आज आपल्याला साधा हात देखील हालवायाचा असल्यास आपण आपल्या भाषेत विचार करूनच ती कृती करत असतो. असो ! भीमबेटक्याच्या सर्वात मोठया गुहेत एका लहान मुलाचा पंजाचा ठसा उमटवलेला आहे. हया पंज्यावर मी जाणीवपूर्वक माझा पंजा टेकवला. त्यावेळी वर्ण,जात,धर्म,लिंग,भाषा,संस्कृती अशा कोणत्याच कृत्रिम भेदात स्वतःचे माणूसपण हरवून न बसलेल्या माणसाच्या पूर्वजाशी आपली भेट होत आहे,ही भावना रोमांचित करून गेली. आपण आपल्या पूर्वजाच्या हातात हात देत आहोत,तो मला पुन्हा निर्मळ होण्यासाठी त्याच्यासोबत मागे येण्यासाठी खेचत आहे. तू पुढे जाऊन आपले माणूसपण हरवून बसला आहेस,वेळ पडली तर मागे फिर;परंतु आपण माणूस,माणूस आणि माणूसच आहोत याची जाणीव तुला होऊ दे ! अशी आदिम जाणीव गुहेच्या दगडावरील त्या पंजातून माझ्या मनापर्यंत पोहचत होती. आदिम मानव माझ्याशी भाषारहीत असा संवाद साधण्याचा प्रयत्न करत असताना भोवतालच्या फोटोटाजीवी सुरमा भोपाली कोलाहल त्यात व्यत्यय आणत होता. गायपट्टयातील बजबज नट्टापट्टा केलेल्या चेह-यांच्या गर्दीत माझा आदिम पूर्वज आणि मी एकमेकांचा चेहरा पाहू शकलो नाही. गर्दीमुळे एकमेकांना स्पर्श करत असलेले पंजे देखील एकमेकांपासून दुरावत गेले. अखेर गर्दीच्या लोंढ्यात वाहत-वाहत मी शेवटच्या गुहेसमोरून त्या परिसराच्या बाहेर पडलेलो आहे,याचे भान मला आले. माझ्या आदिम पूर्वजाची आणि माझी भेट अधुरी राहिली,ही खंत मनात घेऊन गाडीत बसलो.

राहुल हांडे,
[email protected]

Leave a Comment