अफजलखान

अफजलखानाचा वध | अफजलखान | अफझलखानाचा वध

अफजलखान –

आपला शत्रू किती आपल्यापेक्षा किती वरचढ आहे, त्याचे प्राबल्य आणि कमतरता काय आहेत. शत्रू किती पराक्रमी आणि बुद्धिमान आहे यावरून त्याच्यावर मिळालेला विजय हा आणखी द्विगुणित होत असतो, खलनायक देखील नायकाच्या तोडीचा असावा लागतो. आपल्याला फक्त आपल्या इतिहासाचे ज्ञान असणे गरजेचे नसून शत्रूबद्दल ही माहिती असायला हवी. १० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अशाच एका कपटी, खुनशी आणि क्रूर आदिलशाही सरदार असलेल्या अफजलखान याचा वध केला, हा अफजलखान नेमका कोण होता आणि त्याचे नेमके व्यक्तिमत्व कसे होते हे आपण पाहू..

पर्वतासारखा धिप्पाड भासणारा अफजलखान हा मुळात एका भटारणीपासून झालेला मुलगा, त्याला अब्दुल भटारी म्हणून देखील ओळखले जात असावे. अफजलखान याने प्रामुख्याने पराक्रम गाजवला तो रणदुल्लाखान याच्या हाताखाली, कर्नाटकातील या मोहिमेत त्याने श्रीरंगपट्टण, कर्णपुरम, मदुरा, कांची, बेदनूर येथील मांडलीलांवर विजय मिळवला होता. रणदुल्लाखान याच्या एका पत्रात अफजलखानाचा ‘ परवानगी अफझलखान ‘ असा शेरा आहे.

सिद्दी अंबर नावाच्या एक हबशीने रणदुल्लाखानाच्या मोहिमेत सामील व्हायचे नाकारले होते, तेंव्हा त्या सिद्दी अंबरवर रणदुल्लाखान याने अफजलखानाची रवानगी केली होती. अफजलखान आपल्यावर चालून येत आहे हे कळताच सिद्दी अंबर याने स्वतःच आपल्या पायात बेड्या अडकून खानासमोर हजर झाला होता. एका मोहिमेत तर अफजलखान याने खुद्द औरंगजेब बादशाहाला देखील कैद करण्याचा प्रयत्न केलेला होता पण त्याला खानमहमद याने अडवले होते. अफजलखान जेवढा पराक्रमी तेवढाच कपटीही होता, १६३९ मध्ये शिरेपट्टणचा राजा कस्तुरजंग याला खानाने अभय देऊन त्याला भेटीस बोलावून त्याचा खुन केला होता.

अफजलखानाच्या एका पत्रात त्याने फर्मावलेल्या शिक्षेची नोंद आहे, त्यात तो घाण्यात घालून पिळण्याची शिक्षा द्यावी असा उल्लेख करत आहे. एका शिलालेखात अफजलखान हा स्वतःला धर्माचा सेवक, मूर्तीचा विध्वंसक आणि काफीरांचा विध्वंसक असे संबोधित करतो. अफजलखायाचा एक फारसी शिक्का देखील होता, त्या शिक्याचा मराठी अर्थ ” जर श्रेष्ठ स्वर्गाला इच्छा झाली की, उत्तम माणसांची उत्तमता व अफजलखानाची उत्तमता यांची तुलना करून दाखवावी, तर प्रत्येक ठिकाणाहून जपमाळेतील अल्ला अल्ला या ध्वनीच्या जागी अफजल हाच सर्वात उत्तम पुरुष आहे असा ध्वनी उमटू लागेल ”

वरील काही नोंदीवरून आदिलशाही सरदार अफजलखानयाच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा आपण नेमका अंदाज बांधू शकतो. अफजलखान म्हणजे क्रूर, कपटी, धर्मांध तितकाच धाडसी, अशा या अफजलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रसंगावधानता, राजकीय मुस्तद्दीपणा, कुशाग्र बुद्धिमत्ता, अचूक नियोजन आणि धाडसाच्या जोरावर हत्तीसारख्या अफजलखानाला लोळावले आणि त्याचा वध केला, हि घटना साधी नव्हे. अफजलखानाचा वध म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी, आत्मविश्वास वाढवणारी अभिमानास्पद घटना आहे..

– राज जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here