सज्जनगड

सज्जनगड

सज्जनगड

सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे. प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. परळी हे गाव किल्ल्याच्या पायथ्याला असल्यामुळे हा किल्ला परळीचा किल्ला किंवा परळीगड म्हणून सुध्दा ओळखला जातो.

या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली. २ एप्रिल इ.स. १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगङ झाले.

परळी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळाने अंदाजे ७५० पायऱ्या बांधलेल्या आहेत. ह्या वाटेने एका तासात आपण किल्ल्यावर जातो. त्याचबरोबर सातारा-परळी रस्त्यावर गजवडी गावातून किल्ल्यावर जाणारा डांबरी रस्ता आहे. ह्या मार्गाने गेल्यास १०० पायऱ्या चढाव्या लागतात.

स्वतःच्या गाडीने आल्यानंतर आपल्याला समोरच किल्ला आणि किल्ल्यावर जाणारी पायऱ्यांची वाट नजरेस पडते. ह्या वाटेवर समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतीची प्रतिकृती स्वरूपातील छोटी मंदिरे आहेत. साधारणपणे अर्ध्या पायऱ्या चढून गेल्यानंतर गायीचे व मारुतीचे मंदिर आहे. ह्या मंदिराजवळच परळी गावातून येणारी वाट आपल्या वाटेला येऊन मिळते. मंदिराच्या थोडे पुढे गेल्यानंतर मुख्यवाटेपासून उजवीकडे जाणारी छोटी पायवाट. ही पायवाट आपल्याला रामघळीकडे घेऊन जाते.

गडावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला ‘छत्रपती शिवाजी महाराज द्वार’ असे म्हणतात. हे द्वार आग्नेय दिशेस आहे. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला ‘समर्थद्वार’ असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री नऊ नंतर बंद होतात. दुसऱ्या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो.

प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे. अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात समर्थ रामदासांना रामाची मूर्ती व अंगलाईची मूर्ती सापडली होती.

अंग्लाई देवीच्या मंदिराकडून परत येवून समाधी मंदिराकडे जात असताना वाटेवर संस्थानाचे कार्यालय, श्री समर्थ संस्थान कार्यालय आणि काही छोटी साहित्य भांडार वस्तूंची दुकाने आहेत. मंदिर परिसर विस्तीर्ण आणि भव्य असा आहे. परिसरातच समर्थ महाप्रसाद गृह आहे. समोरच श्रीरामाचे मंदिर, समर्थ रामदासांचा मठ आणि शेजघर आहे. या ठिकाणी समर्थ रामदासांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत. जीर्णोद्धार केलेल्या मठात शेजघर नावाची खोली आहे. त्यामधे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला पितळी खुरांचा पलंग, तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे दोन मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिकदाणी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कले व प्रताप मारुतीची मूर्ती आहे. या गुप्तीमध्ये एक लांबच लांब धारदार तलवार आहे.

सज्जनगड गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदिर. समर्थ रामदासांच्या निर्वाणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामाचे मंदिर उभारले गेले. श्रीराम मंदिराच्याखाली तळ मजल्यावर समर्थ रामदासांचे समाधी मंदिर आहे. राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे. मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत.जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे. भुयारात समर्थांचे समाधिस्थान आहे. समाधीमागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहेत. मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे. दुसऱ्या कोपऱ्यात समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन आहे. मंदिरापुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या आक्काबाई हिचे वृंदावन आहे. माघ वद्य प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी साजरी करतात.

श्रीराममंदिर व मठ यांच्या दरम्यान असलेल्या दरवाज्याने पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हातास एक चौथरा व त्यावर शेंदूर फासलेला गोटा आहे. त्यास ब्रम्हपिसा म्हणतात. गडाच्या पश्चिमे टोकावर एक मारुती मंदिर आहे त्यास धाब्याचा मारुती असे म्हणतात.

पावसाळा संपल्यानंतर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला निसर्गाची विविध रूप तुम्हाला बघायला मिळतात. इथून दिसणारा सूर्यास्त म्हणजे अप्रतिम.

माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here