अफजलखानाचा वध

अफजलखानाचा वध | अफजलखान | अफझलखानाचा वध

अफजलखानाचा वध…

राजमाता जिजाऊ साहेब चरित्रमाला भाग १८…

अफजलखानाचा वध – शहाजीराजांची दिल्लीच्या बादशहाच्या पत्रामुळे आदिलशहाने सुटका केली. शहाजीराजे विजापूरच्या बादशहाच्या तावडीतून निसटले याचे सर्वात जास्त दुःख अफजल खानास झाले होते .अफजल खान नेहमी शहाजीराजांची तुलना स्वतःशीच  करत असे .शहाजीराजांचा भयंकर द्वेष अफजल खान करत होता. अफझलखान हा अत्यंत क्रूर कपटी आणि तितकाच शूर होता. शिवाजीराजांची बंडाळी मोडण्यासाठी, त्यांना जिवंत वा मारून पकडून आणण्याचा अफजलखानाने आदिलशहापुढे विडा उचलला होता. विजापूर दरबाराने अफजलखानास मोठे सैन्य देऊन शिवाजीराजांवर स्वारी करण्यास पाठवले. सरळ सामन्यात शिवाजीराजांचा पराभव होणे कठीण ,हे जाणून अफजलखानाने मनात कपट योजले.

जिजामातेला ज्या देवव्देष्ट्या अफजल खाना विषयी एवढा  तिरस्कार वाटत होता तो खान खुद्द  शिवाजीराजांच्या- त्यांच्या प्राणप्रिय पुत्राच्या-जीवावरच उठला होता.

औरंगजेब उत्तरेस निघून जाताच शिवाजीराजांच्या पारिपत्याचा  विचार विजापूरच्या दरबारात सुरू झाला होता .खानमहंमद मरण पावल्यावर खवासखान वजीरीवर आला आणि अफजलखान हा एकच विश्वासू हिमतीचा सरदार आदिलशहाच्या पदरी राहिला. त्यास  सन १६५९ च्या उन्हाळ्यात शिवाजीराजांच्या वर रवाना करण्याचा विचार विजापुरास झाला .

खानाच्या बातमीने आईसाहेब बेचैन झाल्या होत्या. त्यांचा जीव तगमग करू लागला . कारण या याच खानाने कनकगिरीच्या लढाईत विश्वासघाताने संभाजी राजांना ठार मारले होते. शहाजी महाराजांना हातीपायी बेड्या घालून कर्नाटकातून मिरवत नेले होते. अफजलखानावर आदिलशहाची खूप मर्जी होती. कारण कर्नाटकातील युद्धात त्याने चांगलेच नाव कमावले होते. शिवाजीराजांचा पाडाव नाही केला तर आपले राज्य संपेल अशीच स्थिती विजापूरात उत्पन्न झाली होती. कर्नाटकाचा प्रदेश  शहाजीराजांनी आक्रमिला, आणि  जावळी ,सिंहगड ,पुरंदर ही नाक्याची ठिकाणे हस्तगत करून शिवाजी राजे स्वतंत्र झाले होते .तेव्हा लढून किंवा कपटाने त्यांचा पाडाव करणे विजापूर दरबारात अपरिहार्य झाले .

औरंगजेबाचे आक्रमण व दरबारातील व्यवस्था यामुळे शिवाजीराजांशी समोर लढून त्याना जिंकण्याइतकी फौज विजापुरात नव्हती. अफझलखान हा एकच इसम हिमतीचा होता .त्याला बाराहजार फौज मोठ्या शिकस्तीने देऊन बडे साहेबिणीने आणखी असा कानमंत्र सांगितला की, दोस्तीचे आमिष दाखवून कपटाने किंवा कशाही तऱ्हेने शिवाजीस मारावे किंवा जिवंत पकडून आणावे. कपटविद्येत खानाचा लौकिक मोठा होता.अफजलखानाने ही कामगिरी मोठ्या उत्साहाने स्वीकारली आणि प्रतिज्ञा केली की,’ या डोंगरातील उंदरास जिवंत किंवा मेलेला पकडून मी येथे आणून रूजू करितो.या संबंधीची सर्व तयारी पूर्ण करून बारा हजार  निवडक फौज बरोबर घेऊन ,सन १६५९ च्या सप्टेंबर महिन्यात अफजलखानाने विजापुराहून प्रयाण केले .

शिवाजीराजांचे अधिष्ठान पुणे असल्यामुळे तिकडेच जाण्याचा रोख धरून अफजल खान  सुरुवातीपासूनच विजापुरी दरबारात नोकरी करत होता.अफजलखान  अतिशय कडक स्वभावाचा होता. अफजल खान धर्मवेडा ,महत्वकांक्षी शूर , खुनशी व आदिलशहाशी एकनिष्ठ होता .भोसले कुटुंबाचा तो अत्यंत द्वेष करत होता. अंगावर एखादी कामगिरी घेतली तर जीवाची बाजी लावून भल्याबुऱ्याचा अवलंब करून तो ते काम पूर्ण करत होता. त्याच्या जहागिरीत , फौजेत त्याचा अत्यंत दरारा होता.अत्यंत कडक शिस्तीचा उत्तम प्रशासक म्हणून त्याचा नावलौकिक होता. रयतेच्या कल्याणा साठी अतिशय कडवी व कडक शिस्त तो लावत असे.

खानाच्या कर्तबगारीबद्दल, उत्तम कारभाराबद्दल आणि शौर्याबद्दल कोणालाच शंका नव्हती ; पण खानाच्या धर्मव्देष्ट्या, क्रूर ,कपटी स्वभावाबद्दल सर्वांनाच कल्पना होती.अफजल खान शिवाजी महाराजांना जिवंत व मृत पकडण्यासाठी निघाला होता.सैरावैरा धावत ,मूर्ती तोडत – फोडत सबंध तुळजापूर उध्वस्त करत खान निघाला होता. पंढरपुरावर चालून आला तर भीमा चंद्रभागा खानाच्या स्वारीने भयभयीत होऊन गेल्या होत्या. पंढरपुरात तर खानाने नंगा नाचच घातला होता .हिंदूची देवस्थाने मुद्दाम उध्वस्त करून त्याने आपल्या धर्माची प्रौढी मिरवली होती.पंढरपूरच्या विठोबाची दुर्दशा करून त्याने  तुळजापूरला जाऊन तेथील भवानी देवीच्या मंदिराचे नुकसान केले.

खानाच्या स्वारीने लोक घाबरून गेले .खुद्द शिवाजीराजे सुद्धा काळजीत पडले. कारण अगडबंब शरीरयष्टीचा व कपटी स्वभावाचा अफजल खान हाती घेतलेले कार्य फत्ते करायचाच! शक्तीने अथवा कपटाने .जसेही साधता येईल तसे साधून अफजलखान आपले कार्य पुर्ण  करायचाच.

अफजल खान सर्वच बाबतीत वरचढ होता .अशा बिकट प्रसंगी जिजाऊंनी कच न खाता शिवरायांचा उत्साह वाढवला .अफजल खान येत आहे हे ऐकताच खुद्द शिवाजीराजांच्या दरबारातील मोठ्या मोठ्या आणि जाणत्या सरदारांनी देखील राजांच्या जीविताबद्दल चिंता प्रकट केली होती. खानाच्या भेटीत जर यदाकदाचित भयंकर असे काही घडले तर पुत्र  संभाजी यांचे नावे राज्यकारभार चालवावा इतपत निर्वाणीचे शिवाजीराजे बोलून गेले होते. जिजाऊंचे मन चिंताक्रांत झाले होते ,पण आपला पराक्रमी पुत्र शिवबा याचा बदला घेतल्यावाचून राहणार नाही याची त्यांना खात्री होती.

खानाचा एक मोठा डाव होता. तुळजापूर ,पंढरपूर उध्वस्त केले की शिवाजीराजे चिडून डोंगरी किल्ल्यातून बाहेर येतील.बाहेर येऊन ते आपल्यावर चाल करतील. मोकळ्या मैदानात शिवाजीराजांच्या चिमुटभर सैन्याचा साफ चुराडा उडवणे अगदी सोपे होईल .परंतु शिवाजी महाराज अत्यंत हुशार होते. चिडून ते कोणतेही कृत्य करणार नव्हते. जिजाऊंचा सल्ला क्रांती विचारी होता .आईसाहेबांच्या सल्ल्याने महाराज निघाले होते.

आई साहेबांचा निरोप घेणे सर्वात अवघड गोष्ट होती. जिजाऊंचे मन भीतीने काळजीने, कळवळत होते. परंतु जिजाऊ मोठ्या धीराच्या होत्या .राजकारणात त्या सावध बुद्धीने वागत होत्या. शिवाजीराजांना कायमच हुरूप व प्रोत्साहन देणाऱ्या होत्या ,हे सर्व जरी खरे असले तरी शेवटी त्या एक आई होत्या.शिवबाच्या जन्मदात्री होत्या. निघताना मातेच्या चरणी मस्तक ठेवून व तिचा  ‘ विजयीभव ‘असा आशीर्वाद घेऊनच राजे रायगडाहून प्रतापगडी आले.

१० नोव्हेंबर १६५९ भेटीचा दिवस ठरला .शिवाजीराजांनी  प्रतापगडावरच खानाच्या भेटीस जावे हीच खरी जिजाऊंची इच्छा होती.

पुढे भेटीच्या वेळी खानाने विश्वासघाताने शिवरायांवर हल्ला केला. शिवरायांनी प्रसंगावधान दाखवून खानाच्या पोटात वाघनखे खुपसली व खानाचा कोथळाच बाहेर काढला .नंतर सय्यद बंडाने शिवाजीराजांवर हल्ला केला. जिवा महाला त्वरेने पुढे आला. सय्यद बंडाला प्रतिकार करून त्याने खानाचा हात वरच्यावर तोडला व शिवाजी राजांना वाचवले .म्हणून म्हणतात, “होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी ” खानाचा सपशेल पराभव झाला. अफजलखानाचा मोठा मुलगा फाजल खान पळून गेला. दोन लहान मुले व काही सरदार शिवरायांच्या कैदेत सापडले. शिवरायांनी पुढे त्यांना प्रेमाची वागणूक देऊन स्वराज्यात सामील करून घेतले .

अफजलखानाच्या वधाची बातमी जिजाऊंना कळली तेव्हा त्यांना अत्यंत आनंद झाला. जिजाऊंचे मन आनंदाने भरून आले. अफजलखानाचा वध वधानंतर मायलेकरांची भेट झाली. जिजाऊंनी शिवबांना पोटाशी धरून , संभाजीचा सूड घेतलास , माझ्या डोळ्यांचे पारणे फेडले.

अफजलखानाला मारल्यानंतर   खानाचे शीर धडावेगळे करून राजगडावर जिजाऊंच्या भेटीसाठी पाठवले गेले.नंतर ते शीर प्रतापगडाच्या एका बुरुजाखाली दफन करण्यात आले. आजही ते ठिकाण ‘अफजलखान बुरुज ‘ म्हणून प्रसिद्ध आहे .या जिजाऊंच्या कृतीमुळे मानवतेचा सन्मान करण्याची त्यांची वृत्ती दिसून येते. महाराजांनी आपल्या या वृत्तीची उत्तम प्रकारे जपणूक केली व’ मरणानंतर वैर संपते ‘ही म्हण सार्थ केली.

जिजाऊंसारखा पुत्र  आपल्याला मिळेल काहो ? अफजलखानाला मारून संभाजीचे उसने फेडले व आईची हौस- इच्छा पुरी केली .खानाचे मुंडके राजगडावर आणले गेले. ते मुंडके पाहून जिजाऊंच्या मनात काय भावना जाग्या झाल्रा असतील. आपल्या  मुलाची आठवण त्यांना नक्कीच झाली  असणार ? आनंद आणि दुःख दोन्हीचे  भाव त्यांच्या हृदयात कालवाकालव करत असतील. खानाच्या मुंडक्यांचा पिंजरा करून तो लगेच राजगडावर आणण्यात आला.खानाचे शीर  राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या दरवाज्यावर असलेल्या कोनाड्यात बसवून त्यांची पूजाअर्चा व नैवेद्य नित्य करण्याची सूचना आईसाहेबांनी सर्वांना दिली होती. खानाच्या देहाची व शिराची विटंबना यत्किंचीतही केली गेली नाही. अफजलखानाचा वध एक प्रचंड मोठा विजय महाराजांनी हस्तगत केला होता. बळापेक्षा बुद्धीचा वापर महाराजांनी केला होता.

राजांच्या येण्याने सारा गड दिवाळी उत्सव साजरा करत होता. जिजाऊंच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले होते.त्यांनी राजांना मिठीत घेतले. तेव्हा राजे म्हणाले ” माँसाहेब हा काही फारसा मोठा विजय नाही. हे चढाईच्या धोरणात जिंकलेले एक प्यादे आहे .अफजल म्हणजे गोमेचा पाय आहे .हा मोडल्याने काशी सुरक्षित होत नाही. आमच्या विजयाचे नाते औरंगजेबाच्या पराजयात गुंतले आहे.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here