प्रतापगडाचे युद्ध!!

प्रतापगडाचे युद्ध!!

प्रतापगडाचे युद्ध!!

पुस्तक लेखमाला क्रमांक -१९.

किल्ले प्रतापगड!! नुसते नाव उच्चारले तरी आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते जावळीतील दुर्गम भागातील प्रतापगडाचे युद्ध आणि आदिलशाही सरदार अफझल खान याचा बाहेर काढलेला कोथळा! आजही हा जाजवल्य पराक्रम अनेक शाहीर , चित्रपट या माध्यमातून आपणासमोर मांडला जातो!

तसे पहावयास गेले तर नुकत्याच उभारू पाहणाऱ्या स्वराज्याची ही जेमतेम दुसरी मोठी आणि कठीण लढाई. पण या लढाईतही छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी गाजविलेल्या मर्दुमकी मुळे,विजापूरवरून स्वराज्याचा घास घेण्यासाठी निघालेल्या अफझलखान रुपी अजगराला याच किल्ले प्रतापगडच्या मातीत कायमस्वरूपी दफन व्हावे लागले.

या प्रतापगड लढाई चा अभ्यास करण्यासाठी आधी आपणास १६५६ या वर्षी शिवरायांनी मोऱ्यांच्या  ताब्यात असलेली “जावळी” जेंव्हा स्वराज्यात आणली त्याची आधी माहिती घ्यावी लागते.कारण तसा हा प्रचंड दुर्गम भाग. घनदाट जंगल,हिंस्र श्वापदे यांनी व्यापलेला प्रदेश! अशा या दुर्गम भागातील “भोरप्याचा” डोंगर हेरून शिवरायांनी वसविला, किल्ले प्रतापगड!! जावळी जिंकल्याने स्वराज्याची सीमा दुपटीने विस्तारला गेला.उत्तर कोंकण आणि सातारा यामधील डोंगराळ भागावर भगवे निशाण फडकू लागले. ही काही सामान्य गोष्ट नव्हती!

यामुळेच मुघल आणि आदिलशाही दरबारात हे नव्याने बाळसे घेतलेले स्वराज्य अक्षरशः खुपु लागले होते.तसेच अफझल खान हा वाईचा सुभेदार असल्याने, त्या भागातील जावळी मुलुखाचा बंदोबस्त करणे. तसेच भिवंडी, कोकण हा प्रदेश स्वतः कडे राखण्यासाठी आदिलशाहीत शिवाजी महाराजांवर चढाई करण्यासाठी अफजल खानाची नियुक्ती केली गेली.

एप्रिल १९५९ ला अफझल खानाने विजापूर सोडले.त्यावेळेस शिवराय किल्ले राजगडी होते.तेथून अफझल खानाने थेट तुळजापूर गाठून तिथे त्याने उपद्रव केला.तेथून मग खान निघाला तो पंढरपूर ला.इथे छावणी मांडून या भागात दहशत माजविली.त्यानंतर तेथून तो माळशिरस ला पोहचला आणि याच वेळेस शिवरायांनी किल्ले राजगड सोडून किल्ले प्रतापगडावर गेले.

अफझलखान मग माळशिरस-म्हसवड-दहिवडी-फलटण मार्गे जुलै १६५९ वाईला पोहचला.त्यावेळेस अनेक छोटे मोठे वतनदार अफझलखान ला भीतीने आणि प्रलोभनाने सामील झाले.विजापूर ते वाई या मार्गाने येताना खान सैन्य जमवतच आला.

त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने शिवराय किल्ले प्रतापगडी, खान वाईला ला होता. मध्ये महाबळेश्वर चे पठार असल्याने आणि पावसाचे घुमशान चालू झाल्याने ३ ते ४ महिने युद्ध अशक्यच होते.

मात्र याच वेळेस खानाने जावळीस भेटीस यावे यासाठी किल्ले प्रतापगडावर मसलत चालू झाली. कारण खानाच्या १५ हजाराच्या अफाट सैन्याला मैदानातील युद्धात हरवणे केवळ अशक्यच होते हे शिवराय जाणून होते.त्यांना खानाचे पूर्वचरित्र माहीत होतेच.शिवाय खान किती कपटी आहे याचीही त्यांना पुरेपूर जाणीव होतीच.या सर्वांची युव्हरचना करून ऑक्टोबर १६५९ अखेरीस खानाने वाई सोडली आणि जावळीला भेट घेण्याची तयारी केली. अखेर दिवस ठरला. मार्गशीर्ष षष्ठी(चंपाषष्ठी) गुरुवार १० नोव्हेंबर १६५९.

शिवरायांनीही पारघाट, आंबेनळी घाट आणि संपूर्ण जावळीच्या भागात आपले सैन्य सज्ज ठेवले होतेच. आणि जनींच्या टेम्ब्यावर जिथे अफझल खानासाठी शामियाना उभारला होता तिथे दोघांची भेट झाली. यात शिवरायांनी अफझल खानाला यमसदनी धाडून किल्ले प्रतापगडावरून इशारत केली.त्यानंतर धुमश्चक्री होऊन जावळीच्या खोऱ्यात हलकल्लोळ माजला. खानाच्या सैन्याला मारीत कापाकापी चालू झाली. तासाभराच्या या लढतीत खानाचे अंदाजे ५ हजार तर स्वराज्याचे २००० च्या आसपास सैन्य मारले गेले.

पण या लढाई नंतर राजांना प्रचंड लूट भेटली. हा  शिवप्रताप त्यावेळस मुघल साम्राज्यासोबत अगदी विदेहशतही यथार्थ गाजला!जावळीच्या खोऱ्याच्या दुर्गमतेचा सुयोग्यपणे वापर करून शिवरायांनी अफझलखानाला या सापळ्यात आणून नष्ट केला.

तर अशा या किल्ले प्रतापगड युद्धावर शाहीर अज्ञानदासने पोवाडा रचून तो अजरामर केलाच.पण हा शिवप्रताप आजही या मराठी भूमीत यथार्थ पणे आणि या अभिमानाने सांगितला जातो!!

या प्रतापगड लढाईचे  सुरुवातीला एक उपयुक्त असा ग्रंथ आहे तो म्हणजे कॅप्टन मोडक यांचा “प्रतापगडाचे युद्ध” या नावाचा. पण तो ग्रंथ आता सहजासहजी उपलब्ध होत नाही.

आताच्या काळातील या विषयावर उपलब्ध महत्वाचा  संदर्भ ग्रंथ म्हणजे मेजर मुकुंद जोशी यांनी लिहिलेला “युद्ध प्रतापगडाचे”हा होय. स्वतः सरंक्षण दलात असल्याने युद्धाचे अनेक बारकावे आणि नकाशे त्यांनी या ग्रंथातून आपल्या समोर मांडलेले आहेत.जावळीच्या या युद्धचातुर्यावर अतिशय सखोल या अभ्यास या ग्रंथातून होतो.

याच विषयावर अजून एक पुस्तक आहे ते म्हणजे प्रभाकर भावे यांचे “प्रतापगड युद्ध” . यातही लेखकाने योग्य दिनांक ,पूर्वमांडणी उत्तमरीत्या केलेली आहेच.

छत्रपतींच्या प्रत्येक लढाईत अनेक वैविध्यपूर्ण युद्ध रचना, सह्याद्रीचा केलेला योग्य वापर, गनिमी कावा या सर्वांची अतिशय नियोजकता दिसते.यातून प्रत्येक लढाईवर कित्येक प्रबंध तयार होऊ शकतात इतके अफाट कर्तृत्व शिवप्रभूंनी केलेले आहे.फक्त आपणास ते योग्य रीतीने अभ्यासणे गरजेचे आहे.

पुढील लेखमालेत आपण शिवछत्रपतींच्या दक्षिण दिगविजयासंदर्भात असलेल्या महत्वाच्या साधनांचा धांडोळा घेणार आहोत.आपणही योग्य संदर्भ ग्रंथ वाचन करीत राहावे आणि योग्य माहितीचे आकलन करीत राहावे हाच या लेखामागील एकमेव उद्देश!!

बहुत काय लिहिणे?अगत्य असू द्यावे.

किरण शेलार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here