महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,64,897

सरसेनापती संताजी घोरपडे | याद ढाण्या वाघाची…

By Discover Maharashtra Views: 162 7 Min Read

सरसेनापती संताजी घोरपडे | याद ढाण्या वाघाची…

…शंभू महादेवाच्या डोंगर पठारावरून उगम पावलेली माण नदी घळा घळा वाहत दहिवडी म्हसवड गावांना स्पर्शून जाते. हाच तो मानदेश, ज्याने मराठ्यांच्या इतिहासातील चढउतार पाहिले. आणखीन एक उताराचा प्रसंग अगदी खाईतच नेणारा होता. याच शंभू महादेवाच्या डोंगर आसऱ्यात जंगेबहाद्दर वीरश्रेष्ठ भूतपूर्व सरसेनापती संताजी घोरपडे यांचा मुक्काम पडला होता! त्यांच्या येण्याने आकाशातील चिटपाखरूही अरण्यात वाघ शिरावा तसा टरकून गेला होता. वाराही विचारमग्न होऊन मंद झाला होता.! कारण जिथे संताजी तिथे साक्षात काळच अवतरत होता हा इतिहास होता..!!

…डोंगराच्या गुहेत मशालीचा उजेड पसरत होता. मधूनच येणाऱ्या थंड वार्‍याने घोड्याचा अंग थरथरत होता. समोरून वाहणाऱ्या ओढ्याचा खळखळाट संताजींच्या कानात गतकाळातील शौर्य-जंगीच्या गोष्टी सांगत होता. मशालीच्या उजेडात चमकणाऱ्या तलवारीच्या धारेवर बोट फिरवत संताजींच्या चेहऱ्यावर करारीपणा झळकत होता. मिशांच्या तलवारीचा बाक गुहेत पडणाऱ्या सावलीतहि दिसत होता.!!
..सूर्य उगवतीला लागला, समोरील डोंगराला लाली येऊ लागली. डोंगरा आड दडलेल्या सूर्य नारायणाचे दर्शन घेण्यासाठी संताजी गुहेतून स्वार होऊन निघाले. नदीकाठी पायउतार होऊन त्यांनी सूर्यस्नान आरंभिले. विस्तव वाऱ्याप्रमाणे चाणाक्ष संताजी दिलेर योद्ध्या प्रमाणे बेफिकीर झाले. आणि अचानक सळसळत्या तलवारीने त्यांचे डोके धडा वेगळे होऊन खाली पडले.!!!
तारीख १८ जून !

मित्रांनो वरील कथानक कल्पित आहे, संताजीच्या करारी आठवणीने काळजातून हे कथानक निर्माण झाले आहे.

खाफीखान म्हणतो-
संताजीचे शीर फडक्यात बांधून घोड्याला अडकवण्यात आले. सुसाट दौडणाऱ्या घोड्यापासून तोबरा सुटला ते शीर जमिनीवर पडले. संताजीच्या पाठलागावर डोंगरात फिरणाऱ्या फिरोजजंगाच्या स्वराला वाटेत शीर दिसले. त्याने ते ओळखून फिरोजंंगाकडे दिले. फिरोजजंगाने ते बादशहाकडे पाठविले. बादशहाने त्या काफराचे डोके नजरेखाली घातले. परमेश्वराकडून ही देणगी मिळाल्याबद्दल बादशहाने त्याचे आभार मानले. नगारे नौबती वाजवण्याची त्याने आज्ञा केली. संताजीचे शीर लष्करातून आणि दक्षिणेच्या शहरातून मिरवण्याची आज्ञा केली.!
संताजीचा वध झाला.! मागील मार्च महिन्यात ते स्वराज्यात परत आले होते. त्यांचे सेनापतीपद आणि सरंजाम जप्त झाल्यामुळे त्यांचे अनेक सरदार धनाजी जाधवांच्या पक्षाला मिळाले होते. त्यात प्रमुख म्हणजे हणमंतराव निंबाळकर हा होता. दहीगाव च्या लढाईत संताजीचा मोड झाल्यावर ते दुर्दशेच्या अवस्थेत भटकू लागले. मोगलही त्यांच्या पाठलागावर होतेच. नदीकाठी स्नानासाठी थांबले असता नागोजी माने यांच्या माणसांनी संताजीवर हल्ला करून त्यांचा वध केला.!

मान्यांचा मेव्हणा अमृतराव निंबाळकर हा संताजीच्या हाताने आदल्या वर्षी मारला गेला होता. त्याचा सूड अशा रीतीने घेण्यात आला.
मराठ्यांच्या इतिहासात संताजी सारखा तडफदार सेनापती दुसरा झालाच नाही असे म्हणावे लागेल.
सन १६८९ मध्ये संभाजीराजांच्या क्रूर हत्येनंतर मराठी रयत हवालदिल होऊन गेली. राज्यातील किल्ले भराभरा मोगलांच्या हाती पडत होते. शाहू आणि येसूबाई हे मोगलांच्या कैदेत अडकले होते. राजाराम महाराज जिंजीच्या वाटेवर होते. मोगल अजिंक्य आहेत व त्यांच्यासमोर आपला निभाव लागणे कठीण आहे, अशी भावना यावेळी जनमानसात निर्माण होऊ लागली होती. अशा आणीबाणीच्या प्रसंगी सुदैवाने संताजी घोरपड्या सारखा सेनापती लाभवा हे मराठी मातीच भाग्य. निराशा हा शब्दच संताजीला ठाऊक नव्हता. गनिमी काव्याच्या युद्धात तर संताजी हे अद्वितीय असेच सेनापती !
खरेतर साम्राज्यवादी शक्तींचा चारीमुंड्या चीत निपटारा करणारी संताजींची गनिमी कावा नीती म्हणजे लष्करी कौशल्याचा अप्रतिम नमुना!

मोगलांशी लढताना आपल्या शेकडो मैलांच्या धावपळीत संताजीने वजीर असदखानाचा पुत्र जुल्फिकारखान, बहादूर खानाचा मुलगा हिम्मतखान, शहजादा बेदारबख्त या मोगल सेनापतींना परास्त केले. विजेच्या गतीने संताजीच्या हालचाली चालू असत. सन १६८९ मध्ये त्यांनी मुकर्रबखानाचा कोल्हापूर जवळ पाडाव केला, जाननिसारखान आणि तहब्बूरखान हे सन १६९० च्या सुरुवातीला त्याच्या हातून पराभूत होऊन जीव बचावून कसेबसे निसटले. सर्जाखानाला सन १६९० मध्ये साताऱ्याजवळ उघड्या मैदानावर युद्ध करून पकडले. सन १६९२ च्या डिसेंबरमध्ये कांचीचा फौजदार अलिमर्दाखान हा त्यांच्या तावडीत सापडला. (जो पुढे वर्हाडच्या सुभेदारीवर होता) सन१६९३ मध्ये त्यांच्यामुळे जुल्फिकारखानास फजित होऊन जिंजीचा वेढा उठवावा लागला.
सन १६९५ सालाच्या सुरुवातीस संताजींनी सुप्रसिद्ध बुऱ्हानपुर शहराच्या सुभेदाराला पराभूत करून मोगलांची दाणादाण उडवली. हे ऐकून औरंगजेब बादशहा सुभेदारावर एवढा चिडला की, त्याने सुभेदाराला ‘बांगड्यांचा आहेर’ पाठवून त्याची जाहीर बेइज्जती केली.!

सन १६९५ नोव्हेंबर मध्ये कर्नाटकात दोड्डेरी येथे त्यांनी मोगल सैन्य अक्षरशः गारद करून मोगलांचे नामांकित उमराव पकडले. मोगली इतिहासकारांनी वर्णन केलेली त्यांची ही लाजिरवाणी माघार म्हणजे मोगलांच्या अकबरापासून तर औरंगजेबा पर्यंतच्या इतिहासात एकमेव उदाहरण. हा विजय संताजीच्या पराक्रमाचा कळसच!
सन १६९६ मध्ये मोगल सेनापती हिम्मतखान हा त्यांच्याशी लढताना मारला गेला. असे एक, दोन, तीन, चार, पाच किती तरी संताजींचे पराक्रम म्हणावे !

सन १६८९ मध्ये तुळापुर, रायगड, कोल्हापूर तर १६९० मध्ये सातारा, वर्धनगड, खटाव; १६९१ मध्ये सातारा प्रांत, १६९२ आणि ९३ मध्ये जिंजी व तामिळनाडू, १६९३-९४ मध्ये गोवळकोंड्याच्या सरहद्दीपासून पश्चिमेला म्हैसूरपर्यंत, सन १६९५ -९६ मध्ये बुरानपुर, दोड्डेरी कर्नाटक, मैसूर आणि तामिळनाडू या त्यांच्या तेजतर्रार हालचाली सतत चालू होत्या. संताजी विषयी मोगल इतिहासकार खाफीखान म्हणतो-
“मराठी सरदारात प्रमुख म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे होते त्यांच्यापाशी पंधरा वीस हजारांच्या जंगी फौजा होत्या. इतर फौजबंद मराठे सरदार त्यांच्या हाताखाली काम करीत. या दोघा सरदारांच्या मुळे बादशाही सेनापतीवर कमालीचे आणि भयंकर आघात झाले यात संताजी प्रमुख होता. समृद्ध शहरांवर हल्ला करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनापतींवर तुटून पडण्यात त्याची खूपच प्रसिद्धी झाली. म्हणून जगण्याचा आणि लढण्याचा प्रसंग झाला तर त्याच्या त्याच्या नशिबी खालील तीन पैकी एक परिणाम ठेवलेला असे. एक तर तो मारला जाईल किंवा जखमी होऊन कैदेत सापडे किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य आणि बाजारबुणगे गारद होत. आपण जीवानीशी निसटलो हाच आपला पुनर्जन्म झाला असे त्याला वाटे.

यावर कुणालाच उपाय सुचेना. युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून संताची जाई त्याचा मुकाबला करण्यास बादशहाच्या प्रतिष्ठित सरदारांपैकी एकही तयार होत नसे. जगात धडकी भरवून सोडणारी फौज घेऊन तो कुठेही पोचला की नर व्याघ्राप्रमाणे असलेल्या अनुभवी योद्ध्यांची हदये कंपायमान होत.”

अशा या तेजस्वी सेनापतीचा मृत्यू अंतः कलहामुळे घडून यावा ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट होय. मात्र आणीबाणीच्या प्रसंगी दाखविलेल्या उत्कट शौर्यामुळे स्वराज्य तरले आणि संताजी हे नाव मराठ्यांच्याच नाही तर भारताच्या इतिहासात अमर झाले !
“शौर्याची जाणिव माझ्या मना तुज सदैव राहावी म्हणून..
रणभूमीची रक्त धुळ तू कधी न विसरावी म्हणून..
म्हणून याद ही ढाण्या वाघाची…!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।

Leave a comment