महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,64,724

शिवाजी महाराजांचे ५ मास्टरस्ट्रोक

By Discover Maharashtra Views: 232 9 Min Read

शिवाजी महाराजांचे ५ मास्टरस्ट्रोक –

History of the marathas च्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. पूल नेहमी म्हणायचे की ‘शिवाजी महाराजकी’ असं म्हटल्यावर जो ‘आपसूकच ‘जय’ म्हणतो ना तो खरा मराठी माणूस. पण शिवाजी महाराजकीच फक्त जय का? काय वेगळं होत शिवाजी महाराजांमध्ये आणि बाकीच्या राजा किंवा बादशाहांमध्ये? ते मराठी आणि आपणही मराठी फक्त म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल आदर, प्रेम आणि आत्मीयता वाटते का?

१. शिवराजाभिषेक –

शिवराजाभिषेक हा फक्त एक धार्मिक विधी नसून त्याला ऐतिहासिक महत्व खूपच जास्त आहे. शिवरायांच्या काळात राजा म्हणजे मुसलमान बादशहाच, हेच समिकरण सर्वज्ञात होतं. बादशहांनी कायमत पर्यंत राज्य करायचं आणि मराठे, राजपूत, आणि इतर हिंदूंनी सरदाऱ्या करून बादशाहांसाठी जीव द्यायचे. आणि त्या काळचे सरदारसुद्धा आपल्या हिंदू बांधवांवर अगदी दात ओठ खाऊन घणाघाती वार करायचे, कोणासाठी तर बादशाहांसाठी. शिवरायांचा पराभव करण्याची कामगिरी मिर्झा राजा जयसिंगांनी औरंगजेबासाठी अगदी प्रामाणिकपणे पार पडली. पण शिवरायांच्या राजाभिषेकाने ही सगळी समीकरणं बदलली. राजा हिंदू असू शकतो हे जनतेला बादशाहांच्या हाताखाली संस्थानिक म्हणून राबणाऱ्या राजपूत आणि मराठा राजांमुळे माहित होतं पण तो आठ दिवस अगणित पैसा, वेळ खर्च करून, इतर मुसलमान बादशाहांच्या नाकावर टिच्चून हिंदू धार्मिक पद्धतीने राजाभिषेक करून घेऊ शकतो, हे रयतेसाठी नवीन होतं. त्या काळचे मराठे स्वतःला ‘राजे’ हे उपपद लावून घेत असत पण खरा सार्वभौम, संस्थानिक नसणारा राजा रयतेने पहिल्यांदाच पहिला. शिवराजाभिषेकाने रयतेचा आत्मविश्वास, स्वाभिमान, स्वधर्माभिमान या सर्वांना वृद्धिंगत केलं. राजांनी फक्तच ‘छत्रपती’ पद धारण केलं नाही, तर धार्मिक पद्धतीने राजाभिषेक करून त्यांनी स्वतःला डायरेक्ट प्रभू रामचंद्र, भगवान कृष्ण, युधिष्टिर यांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. ज्या राजांनी बादशाहांची सरदारकी पत्करली, जे बादशहाचे संस्थानिक झाले त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ, स्वतःच राज्य, संपत्ती वाचवली, पण शिवरायांनी एक नवं राज्य निर्माण करून रयतेचा स्वाभिमान, आत्मविश्वास आणि हिंदू धर्म वृद्धिंगत केला. यावरून समर्थ रामदास शिवरायांना ‘जाणता राजा’ का म्हणायचे याची प्रचिती येते. शिवराय सोडून अजून कोणालाच असा मास्टरस्ट्रोक याआधी आणि नंतरसुद्धा जमला नाही.

२. राज्यव्यवहारकोश –

राजाभिषेक करून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य म्हणून एक नवं राज्य जन्माला घातलं, पण त्यापूर्वी ३०० वर्ष महाराष्ट्रावर परचक्र होतं. मुसलमान राजे राज्य करत होते. या राज्यकर्त्यांनी रयतेवर त्यांची संस्कृती आणि धर्म तर लादलाच पण त्याचबरोबर त्यांची ‘भाषा’सुद्धा लादली. या सर्व बादशहाची व्यावहारिक भाषा ‘फार्सी’ असल्यामुळे दरबारी कामकाज, पत्रव्यवहार, सरकारी कागदपत्र सर्वांचीच भाषा फार्सी झाली. या फर्मानांची मुख्य भाषा फार्सी असून ही फर्मान स्थानिक भाषेतसुद्धा भाषांतरित होत पण मुख्य भाषा फारसीच. दुसरा मास्टरस्ट्रोक म्हणजे शिवरायांनी त्यांची राज्यभाषा म्हणून मराठी निवडली. जर राज्य आपलं ‘स्वराज्य’ आहे, तर ते स्वराज्य परक्या भाषेत का चालवावं? यासाठीच शिवरायांनी रघुनाथपंत हणमंतेंना ‘राज्यव्यवहारकोश’ तयार करण्याची आज्ञा दिली. या ग्रंथात सुमारे १५०० शब्दांचं भाषांतर फारसीतून संस्कृतमध्ये करण्यात आलं. ‘किल्ला’ यासारखे शब्द तर आपल्या इतक्या अंगवळणी पडले आहेत कितो फार्सी शब्द असून संस्कृत प्रतिशब्द दुर्ग आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. पेशवा म्हणजे प्रधान, सबनीस म्हणजे लेखक, शाहजादा म्हणजे राजपुत्र, तख्त म्हणजे सिंहासन हे अगदी राजाचे शब्द मराठी, हिंदीमध्ये मिसळले गेले होते.
स्वराज्य तर शिवरायांनी तयार केलंच पण त्याला स्वभाषेची जोड देऊन रयतेचा स्वाभिमान दुणावला. अन्न, वस्त्र, निवारा याने माणूस जिवंत राहू शकतो पण स्वाभिमान या जगण्याला नवे पैलू पडतो. अन्न, वस्त्र, निवारा हे कसं जगायचं हे शिकवतात तर स्वाभिमान कश्यासाठी जगावं आणि वेळ आली तर कश्यासाठी जीव द्यावा हे.

३. लेखनप्रशस्ती –

आजकाल रेज्युमे बनवायचा असेल तर वर्ड मध्ये टेम्प्लेट मिळते, कोणत्या ऑफिसमध्ये अर्ज द्यायचा असेल, सरकारी हुकूम काढायचा असेल तर या सगळ्या कागदांचा एक नमुना म्हणजे टेम्प्लेट असते. शिवाजी महाराजांच्या काळात या फर्मानांची, कागदपत्रांची टेम्प्लेट फार्सी अर्थात मुसलमानी पद्धतीने होती. शिवराजाभिषेकानंतर शिवरायांनी मराठी भाषा दरबारी भाषा केल्यानंतर बाळाजी आवजी चिटणिसांकडून या भाषेत दरबारी कागदपत्रांच्या टेम्प्लेट्स बनवून घेतल्या. इतिहासाचार्य वि का राजवाडेंनी ‘लेखनप्रशस्तीमधून’ याचे काही नमुने दिले. डॉ. अनुराधा कुलकर्णींनी ‘लेखनप्रशस्ती’ या त्यांच्या पुस्तकात सांगितले आहे की या टेम्प्लेट्स काही बाडांमध्ये मिळाल्या आहेत पण संपूर्ण लेखनप्रशस्ती मिळालेली नाही. ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन करून मराठी राज्यभाषा करून आपले राजे थांबले नाहीत तर याही पुढे जाऊन त्यांनी दरबारी कागदांचे नमुनेसुद्धा नवे तयार करून घेतले. आज यातले ७८ नमुने उपलब्ध आहेत.

४. गुलामगिरीवर बंदी –

शिवाजी महाराजांच्या वेळी औरंगजेब, आदिलशाह आणि कुत्बशहा असे तीन ताकदवान आणि मुरब्बी बादशहा राज्य करत होते. त्यांच्याविरुद्ध बंड पुकारून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आणि महाराष्ट्रीयन रयतेला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढलं. हे सर्व झालं असलं तरी मुघल, आदिलशहा, कुत्बशहा हे आपल्या राज्यातून गुलामांच्या खरेदी विक्रीचा व्यापार करत असत. जंजिऱ्याचे सिद्दी जेव्हाही कोकणावर हल्ला करायचे तेव्हा ते पुरुष, स्त्रिया आणि मुलांना कैद करून इतर देशांमध्ये गुलाम म्हणून विकत असत. १६७६ ला शिवरायांनी दक्षिण दिग्विजयासाठी दक्षिण प्रांतात कूच केलं. राजे जिंजीला पोहोचले असताना दोन डच अधिकारी व्यापारात सूट मिळावी म्हणून शिवरायांची भेट घ्यायला आले. यावेळी कोणत्याही इतर राजाने स्वतःचा फायदा पहिला असता, पण Xenophobia in 17th Century India या पुस्तकानुसार शिवरायांनी या अधिकाऱ्यांना गुलामांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालायला सांगितली. शिवराय म्हणाले की यापूर्वी आदिलशहाच्या काळात तुम्ही गुलामांची खरेदी विक्री करायचात पण आता इथे माझं राज्य आलं आहे. माझ्या राज्यात गुलामांची खरेदी विक्रीच काय गुलामांना माझ्या राज्यातून तुम्ही दुसरीकडे प्रवास करूनही नेऊ शकत नाही. तुम्ही असं करायचा प्रयत्न केलात तर तुमच्या घरातसुद्धा माझे सरदार गुलाम ठेऊ देणार नाहीत. ज्या काळात भारतातच काय युरोप आणि अमेरिकेतसुद्धा अगदी उघडपणे गुलामांचा व्यापार चालायचा अश्या वेळी आपल्या शकाकर्त्या शिवाजी महाराजांनी ‘गुलामांच्या खरेदी विक्रीवरच’ बंदी घातली. असा मास्टरस्ट्रोक अजून कोणत्याच राजाने या काळात मारला नव्हता.

५. मित्रांशी मैत्री आणि शत्रूंचा विश्वासघात –

लहानपणी पृथ्वीराज चौहानची गोष्ट ऐकताना मला त्याची दया येत असे. पुन्हा पुन्हा ज्या मोहम्मद घोरीला पृथ्वीराजने हरवलं त्या पृथ्वीराजाशी मोहम्मद घोरी रडीचा डाव खेळला असं मला वाटायचं. पण पुढे गीता आणि महाभारत वाचलं तसंच चाणक्यनीतीचा काही भाग वाचायला सुरुवात केली आणि मला पृथ्वीराजची दया येण्याऐवजी कीव यायला लागली. भगवान कृष्णांनी गीतेच्या रूपाने जे ज्ञान समस्त भारताला दिलं त्याच्याकडे दुर्लक्ष करून आज भगवान कृष्णांना आपण फक्त मंदिरात बसवलं आहे. चाणक्याची नीती वापरण्याऐवजी त्यांना आपण ग्रंथालयात एका खणावर ठेवलं आहे. हीच कृष्णनीती आणि चाणक्यनीती शिवरायांनी वापरली. जर आपण जेधे शकावली नीट वाचली तर कळतं की अफझलखानाच्या वधानंतर आपल्या सैन्याने काय हालचाली करायच्या हे शिवरायांनी आधीच ठरवलेलं होतं. शिवभारतातला अध्याय २३ वाचला कीं कळतं कि अफझलच्या वधानंतर त्याच्या सैन्याची शिवाजी महाराजांच्या सैन्याने पार वाताहत केली. अर्थातच अफझलला मारायचं हे शिवाजी महाराजांचं आधीच ठरलेलं होतं. काहीजण म्हणतात त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी अफझलला मारायचा निर्णय अचानक घेतला असता तर त्याच्या फौजेची वाताहत करण्यासाठी प्रतापगडावर, प्रतापगडाच्या आजूबाजूच्या जंगलात, महाबळेश्वरच्या जंगलात एकदम एव्हढी फौज शिवरायांना जमा करता आलीच नसती आणि अफझलच्या सैन्याला निसटून जायला वेळ मिळाला असता. शत्रूचा विश्वासघात करणं म्हणजे पाप असल्या बालिश संकल्पना शिवरायांनी न बाळगता, जेव्हा जमेल तेव्हा अफझलखान, औरंगजेबाचा भाऊ, स्वतः औरंगजेब अश्या कित्येकांचा ठरवून विश्वासघात केला. शत्रूंचा विश्वासघात केला पण कधीच कोणत्या मित्राचा, नातेवाईकाचा विश्वासघात शिवरायांनी केला नाही. बाकी हे शत्रूसुद्धा काही साधे भोळे आणि धुतल्या तांदळासारखे नव्हते हे अफझलखान आणि औरंगजेबाच्या चरित्रावरून सहज लक्षात येतं. युद्धात पराभूत होऊन किंवा धारातीर्थी पडून जनमानसाची सहानुभूती मिळवण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी अश्या शत्रूंचा सपशेल विश्वासघात करून नेहमीच विजयश्री आपल्या पदरात पडून घेतली. ज्या भारतात राजपूत किंवा अन्य योद्धे कितीही वेळा विश्वासघात होऊन, मुसलमान बादशाहांसमोर लाचारी पत्करून, पुन्हा पुन्हा आपल्या संस्कृतीचा आणि धर्माचा अपमान होऊनही कलियुगात सत्ययुगातल्या नीतीने वागण्याचा प्रयत्न करत होते त्या काळात शिवाजी महाराजांनी या असल्या शत्रूंना त्यांच्याच भाषेत उत्तरं देऊन ‘भलेतरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या संत तुकाराम महाराजांच्या श्लोकानुसार वागून दाखवलं.

विडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

संदर्भ:
१. शिवभारत
२. जेधे शकावली
३. लेखनप्रशस्ती लेखिका डॉ. अनुराधा कुलकर्णी
४. Xenophobia in Seventeenth Century India

Suyog Sadanand Shembekar

Leave a comment