मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग ५

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 15
4 Min Read

मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग ५ –

शिक्का व मोर्तब करण्याची मुसलमानी राज्यकर्त्यांची पद्धती – छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत दक्षिणेत निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही आणि शिवशाही अशा चार प्रमुख शाह्या अस्तित्वात होत्या. यातील मुस्लीम राज्यकर्त्यांच्या फर्मानांवर असणारे शिक्के प्रामुख्याने फारसी भाषेतील असत. या शाह्यांच्या राजपत्र आणि फर्मानांच्या लेखन व शिक्के उमटवण्याच्या पद्धतींमध्ये पुढीलप्रमाणे विशिष्ट फरक आढळतो:

१. निजामशाही पद्धत – निजामशाही फर्मानाच्या कागदाचे स्वरूप धुरसर-पिवळ्या रंगाचा आणि हलक्या प्रतीचा असे.
​या कागदाला चार घड्या पाडलेल्या असत.
​उजव्या बाजूची पहिली घडी समास (Margin) म्हणून मोकळी सोडलेली असे.सुरुवातीचा (एकतृतीयांश) भाग कोरा सोडलेला असे.
​बादशहाचा लहान शिक्का: सुरुवातीला कोणतेही शीर्षक न घालता अंदाजे पाऊण बाय दिड इंचाचा बादशहाचा लहान शिक्का उमटवलेला असे.
​यानंतर पत्राचा प्रास्ताविक भाग फारसीमध्ये लिहिला जाई.

​प्रधानाचा शिक्का: शेवटच्या एक-दोन ओळी राहिल्यावर उजव्या बाजूस प्रधानाचा शिक्का असे.
​मराठी (मोडी) अनुवाद – डाव्या किंवा उजव्या बाजूस समास न सोडता मोडी लिपीत मराठी मजकूर लिहिला जाई. हा मजकूर फारसी मजकुराचाच अनुवाद असे.
शेवट (मोर्तब): पत्र जिथे संपते, तिथे शेवटी फारसीत ‘मोर्तब सूद’ असा शिक्का उमटवला जात असे.

२. आदिलशाही पद्धत – विजापुरी बादशहांचे कागदाचे स्वरुप पारवे किंवा गडद पारवे (किंचित पांढरे) रंगाचे असत. निजामशाहीच्या तुलनेत हे कागद जास्त गुळगुळीत, पातळ आणि मोठे असत. कागदाची लांबी साधारणपणे १.५ ते २ फूट आणि रुंदी ७.५ ते १०.५ इंच असे. सुरुवातीचा आणि उजव्या बाजूचा एक तृतीयांश पेक्षा जरा जास्त भाग समास म्हणून मोकळा सोडला जाई. राजकीय पत्रे व शिक्क्यांची रचना पाहीली तर सुरुवातीच्या एक तृतीयांश भागात एखादे शीर्षक लिहून त्याखाली बादशहाचा शिक्का उमटवलेला असे.
आदिलशाही शिक्क्यांचा व्यास १ इंचापासून ते २.५ इंचापर्यंत आढळतो.

महमद आदिलशहाच्या शिक्क्याचे वैशिष्ट्य –
​महमद आदिलशहाच्या शिक्क्यात एकाच्या आत एक अशी तीन वर्तुळे असत
आतले वर्तुळ: कुराणमंत्राचा मोनोग्राम.
​मधले वर्तुळ: “शाहनशाह दिन महमद इब्राहीम दर जेरे नगीने शाह सूद हफ्त इ क्लिम” हा मजकूर.
​बाहेरचे वर्तुळ: आकर्षक नक्षीकाम.

मजकूर व पाठीवरील शेरे –
​मुख्य मजकुरात विशिष्ट हुकूम दिलेला असे. इब्राहीम, महमद व अली आदिलशहा यांच्या काळात मुख्य मजकुराखाली शिक्के उमटवलेले दिसतात.
​काही फर्मानांवर फारसीचा सारांश मोडी लिपीत मराठीत दिलेला असे, तर काही फर्माने फक्त फारसीत असत.
पाठीवरील शिक्के – अशा फर्मानांच्या पाठीवर सुरुवातीला ओळीने ५ ते ७ शिक्के आणि क्रमाने ५ ते ७ शेरे असत. हे शिक्के संबंधित अधिकाऱ्यांचे असत.

प्रधानांचे शिक्के –
​इख्लासखान – ११ कोनांचा (१.५ इंच लांबी-रुंदीचा) शिक्का.
​मुस्तफा खान – वाटोळ्या (गोल) आकाराचा शिक्का.

३. मोगल पद्धत –
​मोगली पत्रांच्या कागदांचे स्वरुप मोठे, पिवळसर, जाड आणि घोटल्यामुळे अत्यंत गुळगुळीत असत.
शिक्याची रचना –
​सुरुवातीचा काही भाग कोरा सोडून पुढच्या भागात बादशहाच्या नावाचा चौकोनी (3 इंच) तुपा असे.
​त्याच्या उजव्या बाजूला ३ इंच व्यासाचा वर्तुळाकार शिक्का असे.
​वर्तुळाची रचना मध्यभागी एक लहान वर्तुळ (ज्यात बादशहा व प्रधानाचा उल्लेख असे) आणि त्याच्याभोवती इतर ८ ते १० वर्तुळे असत. या प्रत्येक वर्तुळात बादशहाच्या पूर्वजांची नावे कोरलेली असत.

पंजाची फर्माने –
​कित्येक मोगली फर्मानांवर फर्मान देणाऱ्याच्या हाताचा केशरी रंगाचा पंजाचा ठसा उमटवलेला असे.
​हेतू हाच की, पत्र ज्याला पाठवले आहे, त्याला पत्राच्या अस्सलतेबद्दल पूर्ण विश्वास बसावा.

मराठेशाहीत अशी ‘पंजाची फर्माने’ आढळत नाहीत. मात्र, मोगल बादशहा औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना पंजाची फर्माने पाठवल्याचा उल्लेख इतिहास संशोधनात आढळतो.

संदर्भ: –
​- ग. ह. खरे – ‘शिवकालीन राजपत्रांची लेखन पद्धती’, शिवाजी – निबंधावली (पृ. ६६ ते ६८).
​- शिवकालीन पत्रसार संग्रह (लेख क्र. १०८३)

राम वाघोले

Leave a Comment