महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,92,873

दिवाळीत किल्ला का बांधतात? दृष्टिकोन..दिवाळीतील किल्लेबांधणीचा, उत्तुंग ध्येयासक्तीचा

By Discover Maharashtra Views: 2617 12 Min Read

दिवाळीत किल्ला का बांधतात?

दृष्टिकोन..दिवाळीतील किल्लेबांधणीचा, उत्तुंग ध्येयासक्तीचा –

छत्रपती शिवरायांचा मंतरलेला, भारावलेला असा प्रेरणादायी शिवकाळ संपून आता जवळ जवळ ३५० ते ४०० वर्षे सरत आली आहेत. ते स्वाभिमानी मराठे, ते धर्मांध मोघल, त्या क्रूर सुल्तानशाह्या, ते जुलमी अत्याचार, त्या घनघोर लढाया, त्या तलवारी, ढाली, भाले, तोफा सारं सारं काही इतिहास जमा झालं. जे काही उरलं ते फक्त प्रदर्शनापुरतं आणि पुस्तकातून वाचण्यापुरतं. पण ऊन, वारा, वादळ, पावसासोबत निसर्गाचे सर्व तडाखे सहन करीत आजही एवढ्या वर्षांनंतर आपलं वैभवशाली अस्तित्व टिकवून दिमाखात उभे आहेत ते शिवरायांचे गडदुर्ग.(दिवाळीत किल्ला का बांधतात?)

स्वराज्यासोबत एक अखंड राष्ट्रीय अस्मिता निर्माण करण्याचं महत्कार्य जर कुणी केलं असेल तर ते या गडदुर्गांनी. मोघलांपासून ते चारही पातशाह्या आणि फ्रेंच, डचांपासून ते थेट इंग्रजांसारख्या अनेक बलाढ्य परकीय सत्तांना उलथवून टाकण्याचं बळ छत्रपती शिवरायांना कुणी दिले असेल तर ते अजस्त्र सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर सहज मिरवणाऱ्या याच गडदुर्गांनी. स्वाभिमान, अभिमान, मान, सन्मान यासोबत स्वत्व, तत्व आणि अस्तित्वाच्या पुरुषार्थाचीही ओळख करून दिली ती याच गडदुर्गांनी. हजारो वर्षांनंतर पहिल्यांदाच या स्वतंत्र भूमीचा राजा, त्याचे अनभिषिक्त सुवर्ण सिंहासन, त्याचे छत्रपती म्हणून मस्तकी धरलेले छत्रचामर आणि आपले स्वतःचे स्वराज्य, सुराज्य एक राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करून देणारा, न भूतो न भविष्यती असा शिवराज्याभिषेक सोहळा याच गडदुर्गांच्या उंचच उंच माथ्यावर जयजयकारात संपन्न झाला..

पण याही पुढे जाऊन जर याचं अधिकचं महत्व जाणून घ्यायचं म्हटलं, तर हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या जोखडातून आणि पारतंत्र्याच्या मानसिकतेतून या भूमीच्या रयतेला बाहेर काढून खऱ्या अर्थाने आनंदाची, भरभराटीची, सुखसमृद्धीची दीपावली साजरे करण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याची शक्ती जर कुणी प्रदान केली असेल तर ती म्हणजे याच समस्त दुर्गेश्वरांनी.. ज्यांनी शिवरायांच्या साथीने हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा हर हर महादेवाच्या गर्जात, मंत्रोच्चारांच्या जयघोषात, हजारो लाखो मावळ्यांच्या साक्षीने आणि देवादिकांच्या आशीर्वादाने स्वमस्तकी सार्थकतेने फडफडत ठेवला. [श्री. अनिल नलावडे (९८२१५५६४४८)]

पण मग विचार केला तर, असं काय दिलं या गडदुर्गांनी? काय शिकवलं? मोबाईल, फेसबुक, इन्स्टाग्राम, इंटरनेट अशा या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात आजच्या पिढीला यांचे महत्त्व समजू शकेल का? अभ्यासाच्या दृष्टीने आणि सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने आजची इंग्रजाळलेली मुले या विषयाकडे गांभीर्याने पाहु शकतील का? अखंड राष्ट्रच निर्माण करू शकतील अशी मुलंबाळं कशी घडवायची? याचं बाळकडू आजच्या मुलांसाठी वेळ देऊ न शकणाऱ्या पालकांना मिळू शकेल का? केव्हातरी या साऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू शकतो का?

छत्रपती शिवरायांना वयाच्या अवघ्या पंधरा, सोळाव्या वर्षी या अभेद्य दुर्गांचे महत्व उमजून आले आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने सुरू झाला स्वातंत्र्याच्या लढ्याचा, कधीही न संपणारा असा एक अखंड रणसोहळा. बालवयात बालसवंगड्यांसोबत मावळ प्रांतातले हे गडदुर्ग हिंडताना शिवरायांचा चौकस बुद्धीने या किल्ल्यांच्या प्रत्येक अंगांचा सूक्ष्म अभ्यास सुरू झाला. याच किल्ल्यांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती राहत्या वाड्याच्या प्रांगणात मातीतून बनवतांना, खेळाखेळांतूनच कळतनकळत किल्ल्यांच्या तटबंदी, खंदक, दारूगोळ्याची तसेच धान्याची कोठारे, जलाशये, विहिरी, माच्या, बुरुज, संरक्षक भिंती, उभे ताशीव कातळ कडे, गुप्त वाटा, खलबतखाने, मुख्य दरवाजे, महत्वाच्या इमारती वेगवेगळ्या पद्धतीने मनात आकार घेऊ लागल्या.

बालमनातुन विचार करताना तोच किल्ला शत्रूंनाही जिंकण्यास कठीण व्हावयास हवा याच हेतूने मग नवनवीन योजना, क्लुप्त्या, गनिमी काव्याच्या भन्नाट संकल्पना त्या छोट्या छोट्या दुर्गांवर राबविल्या जाऊ लागल्या. अभेद्य, अजिंक्य, अजेय असा एकेक गडदुर्ग अनेक दिवस कसा सहजरित्या लढवला जाऊ शकतो? याची गणिते, प्रमेये, मनसुबे त्या अंगणातल्या किल्ल्यांवर रचले जाऊ लागले. सवंगड्यांच्या कल्पनांच्याही उंचच उंच भराऱ्या अस्मान गाठू लागल्या. शक्ती, युक्ती आणि बुद्धीचे सांघिक रित्या एक अनोखे रूप त्यानिमित्ताने दिसू लागले. एकाग्रता, ध्येय, ध्यास, चिकाटी, सहनशीलता, सातत्य, साऱ्यासाऱ्याचा सुंदर मेळ जुळून येऊ लागला.. कोवळ्या वयात पाहिलेली स्वप्ने ओल्या मातीच्या ढिगाऱ्यांमधून हळूहळू अधिकाधिक शास्त्रोक्त पद्धतीने आणि चाणक्य नीतीचा बेमालूम वापर करीत ती पूर्णत्वास नेतांना भविष्यातील एकेक हरहुन्नरी गडकरी (किल्ल्यांचे प्रमुख) जन्मास येऊ लागले आणि त्याचसोबत शिवरायांसहित सहभागी प्रत्येक मावळ्याच्या मनामनातला आत्मविश्वास, बुद्धीचातुर्य, निर्णयक्षमता, कार्यक्षमता, महत्त्वाकांक्षा, लढाऊ वृत्ती, छुप्या हल्ल्याच्या नवनवीन योजना खऱ्या अर्थाने बाळसं धरू लागल्या. जबाबदारीच्या जाणिवेने एकेका दुर्गमोहिमांचे विडे उचलण्याचे धाडस अंगी निर्माण होऊ लागले. [श्री. अनिल नलावडे (९८२१५५६४४८)]

किल्ला घडवतांनाच त्यातील यशस्वितेचे बारकावे हेरून चोरट्या नजरेने एकमेकांकडे पाहतांना त्या बालवीरांच्या ओठांवर विजयाच्या हास्याची लकेर सहजच उमटू लागली. ओल्या मातीत बरबटलेले ते हात आता शस्त्र हाती घेण्यासाठी शिवशिवू लागले. त्याच खेळातल्या छोट्या छोट्या किल्ल्यांनी मग खऱ्या अर्थाने सह्याद्रीतीलच नव्हे तर जगाच्या पाठीवरील कोणत्याही अभेद्य दुर्गांना भिडण्याचे, जिंकण्याचे, लढण्याचे, सर करण्याचे बळ तर दिलेच, शिवाय जिंकलेल्या गडदुर्गांना येणाऱ्या कोणत्याही अस्मानी संकटांना प्रदीर्घ सामोरे जाण्याचे प्रशिक्षणही दिले. बालवयातल्या या कृष्णलीला भविष्यात होऊ घातलेल्या महाभारताचे खुले आव्हान स्वीकारण्यासाठीच जणू काही रचल्या जात होत्या.

लहानपणीची हीच दूरदृष्टी आणि किल्ल्यांचा बौद्धिक अभ्यास पुढे मोठेपणी शिवरायांना सर्वार्थाने स्वराज्यकामी उपयोगात आणता आला. जिंकलेले गड, त्यांची अभेद्यता, त्यांची योग्य राखण, त्या प्रत्येक किल्ल्याच्या परिसरातील गावांची, खेड्यांची, रयतेची घ्यावयाची काळजी आणि शत्रुसैन्य येताच त्याच किल्ल्यांच्या मदतीने दिलेला यशस्वी लढा. त्याहीपुढे जाऊन नवनवीन गड उभारणे, त्यासाठी परिसर धुंडाळणे, योग्य जागा हेरणे, वेळेत दुर्ग बांधून घेणे, त्यासाठी लागणारे साहित्य, त्यावरील महत्वाच्या इमारती, जलाशयाची उभारणी, अवतीभवती उपयोगी पडणाऱ्या झाडांची, वनऔषधींची लागवड सारं सारं काही लहानपणी घडवलेल्या प्रतिकृतींना मूर्त रुपात आणण्याचे मोठे काम शिवरायांनी केले आणि मग याच गडदुर्गांच्या साहाय्याने स्वराज्य विस्ताराचे देवकार्य त्यांनी हाती घेतले.

“संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग” हा आज्ञापत्रातील उल्लेख, “तख्तास हाच गड करावा” ही राजांची दूरदृष्टी, भर समुद्रातील कुरट्या बेटावर भव्य सिंधुदुर्ग उभारावा हे त्यांचे स्वप्न, जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड सजवावा हा मोरोपंतांना दिलेला नेमका आदेश, राजगड, रायगडसारख्या नव्याने बांधून घेतलेल्या स्वराज्याच्या राजधान्या, उद्या औरंगजेब दक्षिणेत उतरलाच तर आपला एकेक किल्ला किमान वर्षभर तरी लढावयास हवा म्हणजे स्वराज्याचे साडेतीनशे किल्ले जिंकण्यास शत्रूस तेवढीच वर्षे लागतील हा महाराजांचा विश्वास, दक्षिण दिग्विजयात जिंजीचे केलेले भलेभक्कम बांधकाम, वेल्लोर जवळ नव्याने बांधलेले साजिरा गोजिरा असे दोन किल्ले आणि असं बरंच काही ज्याची नाळ ही लहानपणीच्या त्याच चिमुकल्या किल्ल्यांशी जोडलेली नव्हती का? याचा जरूर तो विचार व्हावा..(दिवाळीत किल्ला का बांधतात?)

विचार याही गोष्टीचा व्हावा, जसे की या अभेद्य गडदुर्गांची ताकद जशी शिवरायांनी ओळखली तशीच ती सर्वतोपरी ओळखली ती विशेष करून दोन शत्रूंनी. एक म्हणजे औरंगजेब आणि दुसरे इंग्रज. त्यामुळेच त्यांनी शिवरायांच्या नंतर प्रथम कोणते उदात्त कार्य केले असेल तर ते म्हणजे जसं जमेल तसे या किल्ल्यांच्या तटबंदीना तोफा चढवून आणि तोफगोळे डागुन त्यांना उध्वस्त करण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न. कारण हे बिलंदर शत्रू नक्कीच जाणून होते की, या शूरवीर मराठ्यांची ताकद ही याच गडदुर्गांमध्ये आहे. याच किल्ल्यांतून पुनःश्च स्फूर्ती घेऊन जर दुसरे शिवराय जन्माला आले तर ते या सर्वच शत्रूंना कधीही परवडण्यासारखे नव्हते. ही होती ताकद आमच्या किल्ल्यांची. [श्री. अनिल नलावडे (९८२१५५६४४८)]

ज्या गडकिल्ल्यांमुळे आपली संस्कृती टिकवता आली, आपले देव देश आणि धर्म यांचे रक्षण करता आले, मायलेकींची अब्रू वाचवता आली, आबालवृद्धांची काळजी घेता आली, घराघरांतुन दिवाळी साजरी करीत खऱ्या अर्थाने या भुवरी रामराज्य अवतीर्ण झाले त्यांची आठवण कधीही, केव्हाही, कुठेही अगदी सदैव नक्कीच असावी. पण दीपावलीच्या निमित्ताने आजही बालगोपाळांकडून या किल्ल्यांच्या प्रतिकृति बनवून घेतांना वरील सर्वच बाबींचा विचार होणे गरजेचे, त्यांना हे किल्ले बनवण्यामागचा उद्देश कळणे, त्या अनुषंगाने आपला सुवर्ण इतिहास जो पुस्तकात कमी पण ठरवलं तर आचरणात त्याचे महत्व काय? हे उमजणे आवश्यक वाटते, म्हणूनच या प्रदीर्घ लेखाचे नियोजन.

नदीचं मुळ, ऋषीचं कुळ आणि दिवाळीत किल्ले का? या प्रश्नाचं खुळ डोक्यातून काढून त्यापेक्षा किल्ल्यांच्या या वैचारिक खेळात चौसष्ट घरांच्या बुद्धिबळात जसा बुद्धीच्या डावपेचांचा कस लागतो, चार निर्जीव भिंतींच्या घरात एका सुंदर कुटुंबाचा निवास वसतो तद्वत या छोटेखानी दुर्गांची उभारणी करतांनाही हेच अपेक्षित आहे की तो काही पोरखेळ नव्हे, फक्त मातीच्या, रेतीच्या, विटांच्या त्या कमानी नाहीत तर तो एका उज्वल भवितव्याचा श्रीगणेशा आहे. याच कार्यकुशलेतून मुलांना प्रात्यक्षिक, प्रायोगिक, नैसर्गिक, सांघिक, आर्थिक, परमार्थिक, तात्त्विक, सात्विक अगदी साऱ्या साऱ्या बाबींचे चौफेर प्रशिक्षण मिळत असते. फक्त ते बांधतांना मनातले शुद्ध भाव आणि स्वतःवरील ठाम विश्वास पक्का असावा, कोणतीही स्पर्धा नसावी, म्हणजे जे घडेल ते परिपक्व असेल, समाधान देणारं असेल, ‘स्व’ची ओळख निर्माण करून देणारं असेल. कारण याच ‘स्व’त्वातून न जाणो, या देशीचे शिवरायांसारखे उद्याचे यशस्वी नवनिर्माते निर्माण होऊ शकतील. जे या समाजाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलतील.

दिवाळीतील या किल्ले बांधणी उपक्रमास खरोखर एक व्यापक स्वरूप यावयास हवे. गांभीर्याने त्याकडे पहावयास हवे. दृष्टिकोन बदलावयास हवा. छोटयांसहीत मोठ्यांनीही त्यात उत्स्फूर्त सहभाग दाखवावयास हवा. भारताचे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि त्यांची टीम आठवा. अगदी सुरवातीस जेव्हा कोणतीही साधनसामग्री वा आर्थिक सोर्स नव्हता तेव्हा भारताचे सॅटेलाईट बैलगाडी आणि सायकलवरूनचं त्यांना वाहून न्यावे लागले. पण जिद्द आणि ध्यास किंचितही कमी झाला नाही. आज त्याचीच फलश्रुती म्हणजे सारे ब्रम्हांड कवेत घेऊन आपण स्वबळावर चांद्रयान 3 आणि थेट मंगळावरील झेप यादृष्टीने पाहू शकतो. याचप्रमाणे बाल्यावस्थेत सुरवातीस जरी सार्‍याच गोष्टी खेळकर वाटल्या तरी पण जिद्दीने आणि कल्पकतेने साकारलेल्या दिवाळीतील किल्ल्यांच्या याचं बाल मोहिमांतून उद्या सिव्हिल इंजिनियर, सायण्टिस्ट, आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर, मॅथेमॅटेशीयन, मिलिटरी ऑफिसर्स, क्रिएटिव्ह हेड, नेटवर्क हेड, मॅन मॅनेजमेंट हेड, प्रोग्रामिंग हेड, सॉईल टेस्टिंग हेड, स्पाय इंटेलिजन्स, टीमलीडर आणि अशा बऱ्याच अंशी वेगवेगळ्या क्षेत्रात आमची मुलं आभाळाएवढं यश नक्कीच मिळवतील. घडून गेलेला सुवर्ण इतिहास अशाच पद्धतीने पुढील पिढ्यांना बरेच काही शिकवुन जात असतो. फक्त आपल्याला त्यातील योग्य ते उचलावे लागेल, अभ्यासावे लागेल, सिद्ध करावे लागेल.. अन्यथा दिवाळी सण येतील आणि जातीलही, मात्र या नियोजन शून्य खेळात माती, दगड, धोंडे आणि चिखल यातच सारे अगाध ज्ञान वाहून जाईल.(दिवाळीत किल्ला का बांधतात?)

यानिमित्ताने सर्वच इतिहास प्रेमींना, या गडदुर्गांच्या बांधणीत मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांना, दुर्ग संवर्धन शिलेदारांना, दिवाळीच्या निमित्ताने अशा स्पर्धा आयोजित करणाऱ्या संस्थांना, बालगोपाळांच्या पालकांना आणि मुख्यत्वे करून शासनाला सुचवावेसे वाटते की दर दिवाळीत पार मेहनतीने, अथक प्रयत्नांती आणि अपार कष्टांनी बनविल्या गेलेल्या या गड दुर्गांना दिवाळीनंतर वाया जाऊ न देता या सर्वच प्रतिकृती महाराष्ट्रातील शाळांमधून प्रथमदर्शनी प्रवेश भागात शाळांच्या मुख्य प्रांगणात मानाने सन्मानाने स्थानापन्न करावे, जेणेकरून येताजाता विद्यार्थ्यांवर योग्य ते संस्कार घडवून आणता येतील. निमित्ते कुतूहलाने इतिहासाची पाने चाळली जातील, चौकस बुद्धीने सर्जनशीलतेला अधिक वाव मिळेल. त्यातून पुढील प्रत्येक दिवाळीत अधिकाधिक बालगोपाळांना दुर्गबांधणीची आवड तर निर्माण होईलचं शिवाय खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या शूर मावळ्यांचा इतिहास हा नसानसांत झिरपून त्यातूनच उद्याच्या भारताचे सुजाण नागरिक सर्वांगाने घडविण्यास नक्कीच मदत होईल….अधिक काय मागणे..

दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा..

लेखन: श्री. अनिल नलावडे (९८२१५५६४४८)
लेखक, गीतकार, संगीतकार – संगीत शिवस्वराज्यगाथा

लेखनासाठी संदर्भ साहित्य:
१. शिवभारत – कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर
२. राजा शिवछत्रपती – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

1 Comment