विदर्भातील पारंपरिक भुलाबाई उत्सव –
आपल्या विदर्भात भुलाबाई बसवण्याची एक सुंदर आणि पारंपरिक प्रथा आहे. भाद्रपद पौर्णिमेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भुलाबाई पाहुणी बनून विदर्भातील अनेक घरांमध्ये येते. मात्र, आजच्या काळात हा उत्सव दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत साधारण पाच दिवस भुलाबाई उत्सव साजरा केला जातो. मातीपासून तयार केलेल्या आणि सुंदर रंगवलेल्या भुलाबाई (माता पार्वती) व भुलोजी (भगवान शंकर) यांच्या मूर्ती साध्या पद्धतीने सजवून घरात स्थापन केल्या जातात.
घरातील लहान मुली आणि महिला मोठ्या उत्साहाने हा भुलाबाई उत्सव साजरा करतात. भुलाबाईला नऊवारी साडी नेसवली जाते, तर भुलोजीला धोतर नेसवून फेटा बांधला जातो. या लोकपरंपरेतून आपल्या कृषी संस्कृतीचे प्रतिबिंब दिसून येते. रोज सकाळी आणि संध्याकाळी परिसरातील मुली भुलाबाईसमोर एकत्र येतात. टाळ्या किंवा टिपऱ्या वाजवत पारंपरिक भुलाबाईची गाणी म्हणतात. गाणी झाल्यानंतर सर्वांना खिरापत (खाऊ) वाटली जाते. बंद डब्यात ठेवलेली खिरापत ओळखण्याची मजा तर काही वेगळीच असते. दररोज वेगवेगळ्या पदार्थांची खिरापत तयार केली जाते.
या उत्सवाच्या निमित्ताने मुलींना आपल्या संस्कृतीची, परंपरांची आणि नातेसंबंधांची ओळख होते. सामूहिक सहभागातून आनंद, आपुलकी आणि एकोपा वाढतो.
कोजागिरी पौर्णिमेच्या शेवटच्या दिवशी ज्वारीच्या धांड्यांनी किंवा उसाच्या खोंडांनी खोपडी सजवून त्यामध्ये भुलाबाईला बसवले जाते. यावेळी ३२ प्रकारचे पदार्थ आणि खाऊ तयार करून वाटला जातो आणि त्यानंतर भुलाबाईचे विसर्जन केले जाते. या काळात खरीप हंगामातील पिके कापणीला आलेली असतात. त्यामुळे नवीन आलेल्या धान्याचे पूजन आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतूनही भुलाबाईचा उत्सव साजरा केला जातो, अशी या परंपरेमागील सांस्कृतिक धारणा आहे.
काळाच्या ओघात हा सुंदर पारंपरिक उत्सव लोप पावत चालला आहे. मात्र, आपल्या संस्कृतीची आणि लोकपरंपरांची ओळख पुढील पिढीला व्हावी, यासाठी अशा उत्सवांचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे.
Written By: Vidarbha Darshan