मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग ७ –
पत्राचा शेवट आणि ‘मोर्तब’ (मर्यादा मुद्रा) – शिवाजी महाराजांच्या पत्राच्या शेवटी समारोपादाखल एखादे वाक्य लिहून पत्राचा शेवट करण्यात येई. पत्र प्रारंभाप्रमाणेच पत्र समाप्तीचे हे तंत्र ठरलेले असायचे. पत्राच्या शेवटी समाप्ती दर्शवणारे ‘मर्यादा मुद्रा’ किंवा ‘मोर्तब’ हे पत्र ज्या ठिकाणी संपले, त्याच ठिकाणी किंचित एखाद्या अक्षरावर मोर्तब येईल अशा पद्धतीने केले जात होते. कित्येकदा हे हातानेही लिहिले जात होते.
‘मोर्तब सूद’ असा शिक्का आला म्हणजे पत्र लिहिणाऱ्याने स्वहस्ते पत्र समाप्ती केली असा त्याचा अर्थ होत असे. मर्यादा मुद्रांमध्ये मुद्राधारकाचे नाव येत नाही, फक्त वेगवेगळ्या शब्दांनी बनलेले शब्दसमास असतात.
मर्यादा मुद्रांचे शब्द समास –
मराठेशाहीच्या पत्रांवर ‘मोर्तब सूद’, ‘लेखन सीमा’, ‘मर्यादेय विराजते’, ‘मर्यादेय राजते’ याखेरीज ‘पत्रावधिरयं भाति’, ‘भात्येवं लेखनावधि’, ‘राजते लेखनावधि’, ‘इतिमर्यादा’, ‘लेखानालंकार’ व ‘लेखनसीमा’ अशा तऱ्हेच्या मुद्रा आढळून येतात.
यामध्ये शिवरायांची ‘मर्यादेय विराजते’ या मजकुराची मुद्रा तीन ओळीत तयार केलेली होती. ही मुद्रा लंब षटकोनी असून सातारा आणि कोल्हापूर या दोन्हीही शाखांकडे रूढ होती असे दिसून येते.
तसेच पुढील छत्रपतींच्या ‘मर्यादेय विराजते’ या मजकुरातील मर्यादा मुद्रा दोन व तीन ओळींची सुद्धा दिसते. व ‘मर्यादेय राजते’ या मजकुराची मुद्रा मात्र तीन ओळींत तयार केलेली सातारा शाहु छत्रपतींची दिसते. या समाप्तीच्या मुद्रेच्या बाबतीत एक विशेष गोष्ट आढळते ती म्हणजे, सर्वसाधारणपणे प्रारंभीची मुद्रा ज्या कोनांची किंवा आकाराची असेल, तितक्याच कोनांची परंतु लहान आकाराची समाप्ती मुद्रा असते.
दोन कागदांच्या जोडावरील मोर्तब –
काही वेळा कागदपत्रांमध्ये पुष्कळ मजकूर असल्यास कागद अनेक लागत असत. करीने, इनामपत्रे व निवाड्यासंबंधी लिहून दिलेले सारांश, महजरपत्र हे लांबच लांब असत. अशा वेळी एक बंद न पुरल्यास एकाहून जास्त कागद हे एकमेकांना चिकटवून जोडावे लागत असत. या जोडलेल्या बंदावर दोन कागदांच्या पाठीमागे काहीतरी चिन्ह किंवा शिक्का, मोर्तब केला जात असे.
परंतु जोडावरील मोर्तब हा वेगळा असतो. वेगळा म्हणजे नाममुद्रा म्हणजे (शिक्का) आणि पत्र समाप्तीची मर्यादा मुद्रा म्हणजे (मोर्तब) यामधील मोर्तब नाही, तर जोडावर व पत्राच्या थैलीवर उमटावयाचा ‘मोर्तब’ हा वेगळा असतो. त्यातील शब्द समास वेगळा लिहलेला असतो. तसेच पत्राच्या पाठीमागे जर कोरी जागा राहत असेल तर त्या ठिकाणीही पत्र समाप्तीची मोर्तब केला जात होती. पत्र पूर्ण झाल्यावर बंद करून थैली रूपाने पाठवत, तेव्हा त्याच्यावर उमटावयाचा शिक्का तो वेगळा मोर्तबच असे. (नाना फडणवीस शकावली पृ. २०)
जोडांवरील वेगळ्या मोर्तबाची काही उदाहरणे –
उदाहरण १: छत्रपती संभाजी महाराज यांच्या राजशक ७ चे देशाधिकाऱ्याला लिहिलेले पत्र हे दोन कागद जोडून लिहिलेले आहे. त्याच्या जोडावर पाठीमागे असणाऱ्या मुद्रेत “ळेखन सीमा समुल्लसति” असा मजकूर आहे. (श्री संप्रदायाची कागदपत्रे ले. ३२)
उदाहरण २: छत्रपती राजाराम महाराजांचे राजशक २३ चे पत्रही दोन कागद जोडून लिहिलेले आहे. त्याच्याही जोडावर पाठीमागे असणाऱ्या मुद्रेत “ळेखनावधि मुद्रा” असा मजकूर आहे. (श्री संप्रदायाची कागदपत्रे ले. ८०)
उदाहरण ३: कोल्हापूरकर शिवाजी महाराज २ रे यांचेही राजशक २९ च्या जोडाच्या पत्रावर जोडलेल्या बंदावर “श्री नारो नरसिंह” असा निराळ्या मोर्तबाचा मजकूर आहे. (श्री संप्रदायाची कागदपत्रे ले. १३८)
अशा प्रकारे शिक्का-मोर्तब मधील मोर्तब व जोडावरील मोर्तब यांच्यातील हा फरक आहे.
महजर पत्रांच्या जोडांवरील देशमुखांचा शिक्का –
परगण्याच्या ठिकाणी झालेल्या निवाड्यासंबंधी महजर पत्रांच्या बंदाच्या जोडांवर देशमुखाचा शिक्का असतो. अशा जोडावर दोन मोर्तब केले जात असत.
उदाहरण – ३० सप्टेंबर १६८९ रोजीच्या होनप देशपांडे यांच्या वादाच्या परगणेच्या ठिकाणी झालेल्या महजर पत्रावर (अप्रकाशित )पायगुडे देशमुख कार्यात मावळ व करंजावणे देशमुख कार्यात मावळ यांचे शिक्के पाठीमागे महजर पत्राच्या जोडावर आहेत.
राम वाघोले
