महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

शिवरायांनी व्यंकोजीराजेंना देऊ केलेली संधी

By Discover Maharashtra Views: 1376 8 Min Read

शिवरायांनी व्यंकोजीराजेंना देऊ केलेली संधी –

History Of The Marathas च्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रदीर्घ चाललेली मोहीम म्हणजे ‘दक्षिणदिग्विजय‘. मुख्य म्हणजे स्वतःच सार्वभौमत्व सिद्ध केल्यानंतर म्हणजे ‘छत्रपती’ झाल्यानंतरची ही महाराजांच्या आयुष्यातली एक खूप महत्वाची मोहीम आहे. या मोहिमेचं महत्व आपण पुढील काही भागात बघणारच आहोत, पण गंमत म्हणजे ही मोहीम फत्ते करण्याची संधी शिवरायांनी त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजांना दिली होती. जर ही सुवर्णसंधी व्यंकोजीराजांनी वापरली असती तर इतिहासात ‘दक्षिणदिग्विजयाची’ मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्याचं श्रेय महाराजांऐवजी व्यंकोजींना मिळालं असतं. पाहुयात आजच्या व्हिडिओत नक्की महाराजांनी ही संधी व्यंकोजींना कशी देऊ केली होती ते?शि.वरायांनी व्यंकोजीराजेंना देऊ केलेली संधी.

पुढच्या काही भागांमध्ये आपण शिवरायांची ‘दक्षिणदिग्विजय’ ही मोहीम अभ्यासणार आहोत. शिवाजी महाराज म्हटलं की बऱ्याच माणसांच्या डोळ्यांसमोर अफझलखान वध, शाहिस्तेखानाची बोट छाटणं, गनिमी काव्याच्या आधाराने केलेल्या लढाया याच गोष्टी येतात. पण दक्षिणदिग्विजय ही मोहीम अभ्यासली की राजकारण धुरंधर आणि मुत्सद्दी असलेल्या छत्रपतींच दर्शन होतं. दक्षिणदिग्विजय करण्याची संधी शिवरायांच्या चतुर मेंदूने आधीच हेरली होती. आदिलशाहीमध्ये चाललेल्या अंतर्गत राजकारणामुळे ही संधी आयती चालून आली होती. हा मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, ही अंतर्गत राजकारणं काय होती ते जरा अभ्यासूया.

अली आदिलशहा हा नोव्हेंबर १६७२ ला अल्लाहला प्यारा झाला. हा तोच अदिलशहा ज्याने महाराजांवर अफझलखान, सिद्दी जोहर वगैरे सरदार पाठवले होते. पुढे त्याचा ४ वर्षांचा मुलगा सिकंदर हा पुढचा अदिलशहा झाला. खवासखानाने सिकंदरला बाहुलं बनवून तख्तावर बसवलं होतं. आदिलशाहीमध्ये नेहमीच ‘परदेशी मुसलमान’ आणि ‘दखनी मुसलमान’ यांच्यात वाद असायचा. यावेळी पठाण आणि दखनी मुसलमान असे दोन तट पडले होते. खवासखान हा दखनी मुसलमानांचा नेता होता, तर बेहेलोलखान हा पठाणांचा. हा बेहेलोलखान म्हणजे तोच ज्याला प्रतापरावांनी उमराणीला कोंडीत पकडून नाक घासायला लावलं होतं. या बेहेलोलखानालाच ‘बुडवून फत्ते करणे’ असा शिवरायांचा आदेश होता. पठाण आणि दखनी मुसलमान यांच्यात चढाओढ सुरु असल्यामुळे अदिलशाहीमध्ये अंतर्गत गोंधळ सुरु होता. शिवाजी महाराजांना या गोंधळाबद्दल त्यांच्या वकिलांकडून माहिती कळत होती. या अंतर्गत गोंधळाचा फायदा करून ‘हिंदवी स्वराज्य’ वाढवावं असा मानस शिवरायांचा होता. पण डिसेंबर १६७५ आणि जानेवारी १६७६ ची इंग्रजांची पत्र पहिली तर कळतं की शिवाजी महाराज यावेळी बरेच आजारी होते. काही कारणामुळे शिवाजी महाराजांच्या मस्तकात प्रचंड कळा येत होत्या आणि हा आजार इतका बळावला होता की इंग्रजांनी तर शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला अशा अफवाही पसरवल्या. या अफवा पुढे बरेच दिवस सुरु होत्या.

इतकी सोन्यासारखी संधी चालून आली असतानाही आपल्याला त्याचा फायदा करून घेता येत नाहीये हे कळल्यावर शिवाजी महाराजांनी आपल्या धाकट्या सावत्र भावाला व्यंकोजी राजांना ही संधी देऊ केली. शिवाजी महाराजांनी हे पत्र डिसेंबर १६७५ किंवा जानेवारी १६७६ च्या आधी लिहिलेलं आहे. हे पत्र जुन्या मराठीत आहे त्यामुळे मी ते आजच्या मराठीत द्यायचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात

‘….येकोजीबाबा, तुम्ही स्वतःला महाराजा म्हणवीता तर हिंमत बांधा, आम्ही एक वेडे आहोत (म्हणजे वेडे यासाठी कारण कोणत्याही बादशहाच्या विरुद्ध जाणं म्हणजे वेडेपणाच म्हणायचे त्यावेळी) की आम्ही बेहेलोलखानाशी झगडा लावला आहे, म्हणजे युद्ध करत आहोत. याचा म्हणजे बेहेलोलची सगळी जमती म्हणजे सगळा जमाव म्हणजे फौज आमच्याशी झगडण्यात गुंतलेली आहे. यावर तुम्ही महंमद नासिरखानासोबत शेरखानावर हल्ला करावा असं आम्ही सांगणार नाही.

एक मिनिट एक मिनिट हा शेरखान कोण आणि नासिर महंमद कोण? आता बघा हा, मगाशी सांगितल्याप्रमाणे आदिलशाहीत दोन गट पडले होते, एक पठाणांचा म्हणजे बेहेलोलखानाचा तर दुसरा दखनी मुसलमानांचा म्हणजे खवासखानाचा. शेरखान हा बेहेलोलखानाच्या पक्षातला होता म्हणजे पठाणांच्या पक्षातला, तर नासिर महंमद हा खवासखानाचा भाऊ होता म्हणजे तो दखनी मुसलमानांच्या पक्षातला होता. हा शेरखान मॅपवर दिसतंय त्या वालीगंडापूरमला होता तर नासिर महंमद जिंजीला. म्हणजे विजापुरात लागलेली आग इथे वालीगंडापूरम आणि जिंजी यांच्यातही लागलेली होती. तेही आपापसात भांडत होते. आणि याचाच फायदा महाराज घ्यायला सांगत आहेत.

तर शिवाजी महाराज पुढे म्हणतात की

‘…नासिरखान वेडा आहे त्याला राजकारण कळत नाही. तरी बेहेलोलखानाने तुम्हाला लिहिले असेल की किल्ला शेरखानाचे हवाली करणे. तरी तुम्ही तयारी करा, पैश्याकडे पाहू नका. शेरखान त्याच्या लष्कराला २ होन देत असेल तर तुम्ही ३ होन द्या. जमेती म्हणजे जमाव वाढवा (फौज वाढवा). लोक बाकी कोणाकडे जाऊन चाकरी करून न राहता एकोजीराजा पैसे फार देतो म्हणून तुमच्याकडे आले पाहिजेत. लष्कर बळकट करा.

याच्यापुढे महाराज व्यंकोजींना मुत्सद्दी उपदेश करतात. ते म्हणतात

‘…शेरखानाला बोलावून तुम्ही दोघांनी मिळून नासिर महंमदास गर्दीस मिळवाव (म्हणजे मारून किंवा हरवून) आणि शेरखान सहजच कमजोर झालेला असेल त्याला भेटीस म्हणून बोलावून आणून तिथेच जबे करावा. जबे करावा म्हणजे मारून टाकावं. महाराजांनी अफझलखानास भेटीस बोलावून जसे मारले होते तसेच काहीसे इथे व्यंकोजीराजांनी करावे असे महाराजांना अपेक्षित होते. त्याची जमेत म्हणजे फौज असेल तिच्यावरही हल्ला करावा (महाराजांनी अफझलखानाला मारल्यानंतरही त्याच्या फौजेवर असाच हल्ला केला होता), म्हणजे जिंजी आपणास मिळेल. म्हणजेच नासिरकडून जिंजी मिळेल तर शेरखानला संपवून वालीगंडापूरम.’

याच पत्राच्या सुरुवातीला शिवाजी महाराज व्यंकोजींना तिकडच्या हिंदू संस्थानिकांशीपण कसं वागावं याचा उपदेश करतात.

‘…मदुरेचा राजा आपलं तंजावर खाऊन सुखी आहे, त्याला आपला मित्र करून, वेल्लोरचा कोट आणि विजयनगरच्या रायलंच म्हणजे पूर्वीच्या विजयनगरच्या राजाच तख्त आपल्या (म्हणजे व्यंकोजी राजांच्या) हाताखाली घ्यावं. पुढे जाऊन श्रीरंगपट्टणकरांना आपले मित्र करून, बंगळूरचा मोठा कोट बेहेलोलच्या लोकांपासून जिंकून घ्यावा.’

म्हणजे महाराज या पत्रातून सांगतायत की:

१. लागतील तेव्हढे पैसे खर्च करून बळकट लष्कर उभं करावं

२. नासिर महंमद आणि शेरखान यांच्यातल्या वादाचा फायदा घेऊन जिंजी आणि वालीगंडापूरम जिंकून घ्यावं

३. कर्नाटकातल्या हिंदूसंस्थानिकांशी एकतर मैत्री करून अथवा हल्ला करून कर्नाटकातल्या इतर मोक्याच्या जागाही जिंकून घ्याव्यात मॅपवर बघितलं तर कळेल

हे सगळं सांगून महाराज म्हणतात ‘म्हणजे येकोजीबाबा तुम्हाऐसा कर्नाटकामध्ये जोरावर म्हणजे बलवान कोण्ही राहणार नाही…’

शिवाजी महाराजांचं हे पत्र त्यांच्या अंतरंगातल्या राजकारणावर प्रकाश टाकून जात. महाराज हिंदवी स्वराज्य महाराष्ट्रात उभं करत असले तरी परक्या देशातल्या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं किती बारीक लक्ष असायचं हे या एका पात्रातून दिसून येतं. सैन्य कस उभं करावं, कोणाला आपल्या बाजूने वळवून घ्यावं, कोणाला दगा करावा, शिवाजी महाराजांनी जवळ जवळ सगळं प्लॅनच व्यंकोजी राजांना आखून दिला होता. व्यंकोजींनी दक्षिण काबीज करावी आणि स्वतःचे ‘हिंदवी स्वराज्य’ आपले वडीलांच्या आणि मोठ्या भावाच्या म्हणजेच शिवरायांच्या पायावर पाय ठेवून चालावं हे अगदी मनापासून शिवरायांना वाटत होतं. व्यंकोजींबद्दलची आणि या आपल्या पायाने चालून आलेल्या संधीच सोनं करावं यासाठीची शिवाजी महाराजांची तळमळ या पात्रातून दिसून येते. पण दुर्दैवाने शककर्ता राजा कैक शकातून एकदाच जन्माला येतो.शिवरायांनी व्यंकोजीराजेंना देऊ केलेली संधी

व्यंकोजी राजांनी केवळ तंजावर बळकावून स्वतःला ‘महाराजा’ म्हणून अभिषेक करवून घेतला आणि त्यावरच ते समाधानी राहिले. त्यांनी विजापूरकरांशी असलेली त्यांची बांधिलकी सोडली नाही ते विजापूरकरांचे सरदारच राहिले. इकडे शिवाजी महाराजांची तब्येत बरी नसल्याने त्यांना या अंतर्गत परिस्थितीचा फायदा घेऊन लगेच या मोहिमेवर निघता आले नाही. देव प्रत्येकाला आपलं नाव इतिहासात अजरामर करण्याची संधी देतो इथे तर शिवाजी महाराजांनी ही संधी व्यंकोजी राजांना देऊन पहिली. मोठ्या मनाने आपल्या भावालाही पराक्रम गाजवण्याची संधी महाराजांनी दिली. काही काळ वाट पाहील्यावर अखेर ऑक्टोबर १६७६ ला शिवाजी महाराज ‘दक्षिणदिग्विजयाला’ निघाले. यानंतर जे घडलं तो इतिहास सर्वांना माहीतच आहे. काही माणसं भरलेल्या ताटावरूनसुद्धा उपाशीच उठतात, तर काही लोक संधी निर्माण करून त्याच सोनं करतात. शिवाजी महाराज यांनीही ‘दक्षिणदिग्विजयाचं’ सोनं केलं. पाहुयात पुढच्या काही भागात दक्षिणदिग्विजयाचा हा सोनेरी इतिहास. धन्यवाद.

संदर्भ:
१. शककर्ते शिवराय
२. पत्रसारसंग्रह १८०५, १८११, १८१३ आणि १८३७
३. ऐतिहासिक साधने: आवळसकर

Suyog Sadanand Shembekar

Leave a comment