मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग ६

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 10
8 Min Read

मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग ६ –

मराठीशाहीतील शिक्का-मोर्तबाची पद्धत व पत्रव्यवहार – इतिहास संशोधकांनी शिवकालीन पत्रव्यवहाराचे स्वरूप व वर्गीकरण करताना मराठी शाहीतील पत्रव्यवहाराचे प्रामुख्याने दोन प्रकार सांगितले आहेत. एक खाजगी पत्रे (कौटुंबिक पत्रे) व दुसरे सरकारी पत्रे (या सरकारी पत्रांतूनही वतनी व राजकारणी असे पोट भाग होते) इतिहासाचार्य राजवाडे यांनी सरकारी पत्रांचे ७८ प्रकार मानले आहेत. या पत्रांपैकी चिटनीसी व फडणीसी पत्रे कोणती व कोणी लिहायची याची ३२ कलमे शिवकालीन कानूजाबत्यात दिलेली आहेत. राजाच्या आज्ञेवरून चिटणीसांनी लिहिलेली ती आज्ञापत्रे, अष्टप्रधानांपैकी प्रधानाने लिहिलेली पत्रे, देशाधिकारी किंवा सुभेदारांनी लिहिलेली पत्रे, देशमुख व देशपांडे यांच्या विद्यमाने होणारे कागद इत्यादी सरकारी कागदपत्रांवर आपणास मुद्रा उमटवलेल्या आढळतात.
​
शहाजीराजांच्या काळातील पत्रलेखन व मुद्रा पद्धत –
​शहाजीराजे निजामशाहीत सर्वाधिकारी म्हणून व आदिलशाही बादशहांच्या दरबारी मोठमोठ्या हुद्यावर नोकरीस होते. दोन्हीही शाह्यातील दुय्यम प्रतीच्या कागदात शहाजी महाराजांच्या पत्रांवर सुरुवातीला फारसी शिक्का आढळतो, तर पत्रातील मजकुराच्या शेवटी ‘मोर्तब सूद’ हा मोर्तबाचा फारसी शिक्का आढळतो. मात्र शहाजीराजांच्या पत्रात फारसी मजकूर येत नाही. एवढाच काय तो फरक मुसलमानी सरदार व शहाजीराजे यांच्या पत्रात आहे. शहाजीराजांच्या काही पत्रात मानापानाच्या लोकांचा उल्लेख प्रथम येतो व नंतर शहाजीराजांचा येतो. अशा पत्रांवर शिक्का सुरुवातीला मथळ्यावर न करता समोरील व्यक्तीस आदरभाव दर्शवण्यासाठी पत्रातील प्रारंभीच्या ३ ते ४ ओळी सोडून डाव्या बाजूला केलेला असतो. (शिवाजी निबंधावली – शिवकालीन राजपत्रांची लेखन पद्धती, ग. ह. खरे लेख पृ. ७७)
​
उदाहरण: पुरंदर किल्ल्याच्या जवळील चांबळी गावच्या एका प्रकाशित पत्रात प्रथम चांबळीच्या सरनायकाचा उल्लेख असून नंतर शहाजीराजांचा उल्लेख आहे. (श्री संप्रदायाची कागदपत्रे ले. ८७)
‘शिक्का’ आणि ‘मोर्तब’ म्हणजे काय?
​शिवकाळात पत्रे लिहिण्यासाठीचा कागद हा निजामशाही कागदांप्रमाणे भरड व अरुंद असे. पत्राच्या प्रारंभी १/६ किंवा कमीच भाग मोकळा सोडलेला असतो. या पत्रांचे वैशिष्ट्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांचे स्थान फार महत्त्वाचे आहे.  अशा ऐतिहासिक कागदपत्रांवरील मुद्रांना शिक्का व मोर्तब असे फारसी प्रतिशब्द प्रचलित होते.
​
शिक्का: म्हणजे “नाममुद्रा” (पत्राच्या प्रारंभी नाम दर्शवणारी मुद्रा). शिक्का यालाच “मोहोर” हा प्रतिशब्दही आहे. (अर्वाचीन महाराष्ट्रेतिहास काळातील राज्यकारभाराचा अभ्यास – शं. ना. जोशी पृ. ४८)
​
मोर्तब: म्हणजे “मर्यादा मुद्रा” (पत्राच्या आरंभी/शेवटी असणारी पत्राची समाप्ती दर्शवणारी मुद्रा).
​
राज्यव्यवहार कोश – राजव्यवहार कोशात “शिका नाम तु मुद्रा स्यात् बार स्याल्लेख्यनामम्” असे लिहिले आहे. म्हणजे शिक्का म्हणण्याचा परिपाठ हा छत्रपतींच्या राजकोशातच हा शब्द आलेला आहे. (राजकोश पृ. ९८)
​
यापैकी पत्राच्या प्रारंभी असणारी मुद्रा पत्राची समाप्ती दर्शवणाऱ्या मुद्रेपेक्षा अधिक महत्त्वाची असते. पत्राची समाप्ती दर्शवणाऱ्या मुद्रेमध्ये फक्त वेगवेगळ्या शब्दांनी बनलेले शब्दसमास आढळतात. कागदावर शिक्का-मोर्तब होणे हे फारसी शब्द नंतर इतके रूढ झाले की, आजही एखादी गोष्ट कागदोपत्री पूर्ण झाल्याचे व मान्य झाल्याचे सांगताना “शिक्का मोर्तब झाले” असे म्हटले जाते. शिक्का मोर्तब होणे म्हणजे राजसंमत होणे. (शिवछत्रपतींचे पत्रे – प्र. न. देशपांडे पृ. १८)
​
पत्रलेखनाचे नियम व अस्सल पत्रांची ओळख –
​छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांपैकी अनेक पत्रे नक्कल आहेत, तर काही अस्सल आहेत. अस्सल पत्रे याचा अर्थ त्यांच्या खास नाममुद्रांनी अंकित असलेली पत्रे होय. मध्ययुगीन काळातील पत्रांचे लेखन हे सामान्यतः कचेरीतील लेखनिकांकडूनच लिहून घेतले जात होते. मात्र राजपत्र हे खुद्द चिटणीसांनाच लिहावे लागत असे. तिथे दुसऱ्या कोणाचेही हस्ताक्षर चालत नसे. कानूजाबित्यातच लिहिले आहे की, “खास दस्तक मात्र वरकडाचा दाखल चिन्न नाही चिटणीसांनीच करावे”.
​
राजाप्रमाणे वतनदार, जहागीरदार हेसुद्धा लेखनिकांकडूनच पत्रे लिहून घेत. अशा पत्रावर शिक्का व मोर्तब या दोन मुद्रा उमटवलेल्या असतात. खरंतर या शिक्का-मोर्तबावरूनच पत्राचा अस्सलपणा व अधिकृतपणा सिद्ध होत असतो. शिवाय पत्रकर्त्याचा हुद्दा समजण्यासही महत्त्वाची मदत होत असते.
​
मराठ्यांच्या इतिहासात एकूण १२ छत्रपती होऊन गेले व त्यांच्या त्याहून अधिक मुद्रा आहेत. याचाच अर्थ काही छत्रपतींनी एकापेक्षा अधिक मुद्रा वापरल्या आहेत. त्यात काही मुद्रा स्वतंत्र तर काही अनुकरणी मुद्रा आहेत.
​
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा व तिचे नियम –
​छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा अष्टकोनी, एकवलयी, पाच ओळींची व संस्कृत भाषेत आहे. ती पुढीलप्रमाणे:
​
प्रतिपच्चंद्रलेखेव | वर्धिष्णु र्विश्ववंदिता |
शाहसुनो : शिवस्यैषा | मुद्रा भद्राय राजते ||
​
अर्थ: याचा अर्थ आपणा सर्वांना सर्वश्रुत आहेच, शहाजीराजे यांचा पुत्र शिवाजीराजे यांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रतिपदेची म्हणजे प्रारंभाची ही मुद्रा सूक्ष्म दृष्टीवाचून इतरांना सहज न दिसणारी, पण कलेकलेने दिवसेंदिवस वाढत जाणारी बारीक कोर उगवली असून ती उत्तरोत्तर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण होऊन सकल विश्वाला वंद्य होणार आहे; आणि हिचा अवतार केवळ लोककल्याणार्थ झाला आहे. (मराठी रियासत खंड – १ पृ. १५९)
आदिलाशाहीतील शहाजीराजांसारख्या बड्या हिंदू सरदाराच्या मुलाच्या मुद्रेत संस्कृत श्लोक आहे आणि त्यांची राजसंपदा वाढत जाणारी असल्याने तिच्यात घोषित केले आहे, हे फार महत्त्वाचे व आश्चर्यकारक आहे.
​
राजमुद्रा उमटवण्याचे नियम –
​अजरख्तखाने मायनाची पत्रे: ही मुद्रा पत्राच्या शिरोभागी उमटवण्याची प्रथा होती.
​ज्येष्ठ सहकारी व साधू-संत: स्वराज्यकार्य करणाऱ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना आणि आदरणीय साधू-संतांना पत्रे लिहिताना ही मुद्रा पत्राच्या पाठीमागे खालील बाजूस उमटवली जात असे (उदा. कान्होजी जेधे यांच्यासारख्या वडीलधारी स्नेहांकितांना पत्र लिहिताना).
​
सुभेदार/हवालदार यांना पाठवलेली पत्रे (‘मशरूल हजरत’ / ‘मशरूल अनाम’): या मायन्याच्या पत्रांवर राजमुद्रा उमटवण्याची प्रथा नव्हती. अशा पत्रांवर प्रधानाचा शिक्का असे. पत्र लिहिताना पत्राच्या मायन्यात राजाचे नाव शक्यतो दुसऱ्या ओळीत येत असल्याने, राजपत्रावर प्रधानाचा शिक्का हा त्या दुसऱ्या ओळीच्या खाली डाव्या बाजूस २-३ ओळी सोडून उमटवलेला असतो. पत्र लेखन कचेरीतून लेखकाने केल्यावर त्यावर शिक्का करण्यासाठी ‘शिकेनवीस’ असे; त्याने आवश्यक त्या जागी पत्रावर जरूर तो शिक्का करूनच पत्र पुरे केले जात होते. (शिवाजी निबंधावली – शिवकालीन राजपत्रांची लेखन पद्धती, ग. ह. खरे लेख पृ. ७७)
​
खाजगी पत्रे (उदा. व्यंकोजीराजे इत्यादी) – यांच्या खाजगी स्वरूपाच्या पत्रांवर शिवाजी महाराजांची मुद्रा उमटवण्याची प्रथा दिसत नाही. ही खाजगी पत्रे म्हणजे घरोब्याची, वैयक्तिक कौटुंबिक नात्याची आप्त पत्रे असतात. खाजगी पत्रांची लक्षणे अशी की, ज्या पत्रांवर कचेरी मायना (अजरख्तखाने, मशरूल हजरत किंवा मशरूल अनाम) नाही आणि छत्रपतींची किंवा प्रधानाची नाममुद्राही नाही; तसेच ज्यावर ‘श्रीकार’ आहे व जी कौटुंबिक व गुरुजनांना लिहिलेली आहेत, त्यासाठी त्या पत्रांचा विशेष असा मायना आहे. पत्राच्या शेवटी आशीर्वाद, बहुत लिहिणे, कळले पाहिजे इत्यादी समाप्तीची वाक्ये आहेत व मर्यादेची अशी पत्र समाप्तीची मुद्रा उठवलेली आहे, ते खाजगी पत्र होय.
​
राजमुद्रेचा प्रथमोल्लेख व वय –
​शिवरायांच्या या मुद्रेचा वापर कागदपत्रांवर शके १५६१ पासून सुरू झाला असे एका पत्रातून स्पष्ट होते. अश्विन शुद्ध ८ शके १५६१ रोजी वेधशास्त्रसंपन्न कृष्णभट बिन मुरारभट ब्रह्मे (कसबे चाकण) यांना मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नाच्या संदर्भाने शिवाजी महाराजांचे हे आज्ञापत्र आहे. या पत्रावरील ही मुद्रा शके १५६१ म्हणजेच इ.स. १६३९ रोजीची आहे. (राजवाडे खंड – १५ ले. ४३७)
​
याचाच अर्थ, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मवर्ष इ.स. १६३० धरल्यास शिवरायांचे वय या पत्रलेखनावेळी केवळ ९ वर्षांचे होते असे मानावे लागेल; किंवा इ.स. १६२७ हे जन्मवर्ष मान्य केल्यास त्यांचे वय १२ वर्षांचे होते असे गृहीत धरावे लागेल. जन्मतिथीचा वाद बाजूला ठेवला तरी कुमारवयात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा मनोरथ रचलेला होता, असा निष्कर्ष यातून व्यक्त होत आहे. शिवाजी महाराज १२ वर्षांचे असताना त्यांना शहाजीराजांनी पेशवे, सुरनीस वगैरे ४-५ अधिकारी बरोबर देऊन पुणे प्रांती पाठविले, असा उल्लेख विश्वसनीय असणाऱ्या सभासद बखरीत आलेला आहे. म्हणजेच शिवरायांच्या वयाच्या १२ व्या वर्षापासून ही संस्कृत मुद्रा आढळते, जी त्यांनी कधीही बदललेली दिसत नाही.

राम वाघोले

Leave a Comment