मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग २ –
मुद्रांतील चिन्ह व खुणा – हिंदू राज्यकर्त्यांच्या मुद्रांचे परीक्षण केले असता असे लक्षात येते कि, बहुतांश मुद्रांवर “श्री” हे अक्षर कोरलेले असून त्याच्या डाव्या व उजव्या बाजूस सूर्य व चंद्राच्या आकृत्या आढळतात. महाराष्ट्रातील ऐतिहासिक पुरषांच्या मुद्रेत सूर्य व चंद्र यांच्या आकृत्या कोठून आल्या हा प्रश्न स्वाभाविकच आपणास पडतो.
महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक इ. प्रांतात चालुक्य, राष्ट्रकुट, वल्लमी इ. जी राजघराणी झाली, त्यांची याज्ञवल्क्य स्मृतीवचनास अनुसरून झालेली शासनपत्रे व त्या पत्रावरील मुद्रा उपलब्ध झाल्याचा पहिल्या भागात उल्लेख केलाच आहे. या घराण्याच्या ताम्र शासनाच्या मुद्रेमध्ये चंद्र व सूर्याच्या प्रतिमा आढळून येतात. याचे कारण एखादी वस्तू “यावचंद्रदिवाकरौ” एखाद्यास दिली आहे. अश्या प्रकारचे शब्दप्रयोग आपण आजच्या सामान्य बोलीभाषेत ही करत असतो. हा शब्दप्रयोग म्हणजे एखाद्यास दान दिलेल्या वस्तूंचा उपभोग दान घेणाऱ्या व्यक्तीने किती कालावधी पर्यंत करावयाचा हे दर्शवण्याकरीता केलेला असतो.
पुरातन शिल्प शिळेवर कोरलेल्या दानपत्रांच्या मथळ्यावर सूर्य व चंद्रांच्या प्रतिमा कोरलेल्या असतात. ताम्र पत्रावरील शासनातून या प्रतिमा मथळ्यावर न कोरता दान देणाऱ्या राजाची जी मुद्रा असते, त्या मुद्रात कोरलेल्या असतात. दान दिलेली वस्तू आचंद्रार्क दिलेली आहे. हे दर्शवण्याकरिता सूर्य चंद्रांच्या प्रतिमांचा समावेश मुद्रांमध्ये करण्याचा प्रघात झाला असावा असे दिसते.
याचे दुसरे एक कारण म्हणजे बऱ्याचवेळा आपण सूर्य चंद्र साक्षी ठेऊन अमुक अमुक प्रतिज्ञा मी करतो, असा शब्दप्रयोग कित्येकदा करतो. त्यावरून एखादी विशिष्ट प्रकारची जबाबदारीची गोष्ट करतेवेळी सूर्य चंद्र साक्षी ठेवण्याची पध्दत होती असे दिसून येते. या दृष्टीने विचार केला असता दान देणाऱ्याने आपल्या मुद्रेमध्ये सूर्य चंद्राच्या प्रतिमा कोरून दान घेणाऱ्यास हे दर्शवण्यासाठी मुद्रेमधून सूर्य चंद्र कोरण्याचा प्रघात पडला असावा असेही वाटते.
मुद्रांतील या आकृत्या सूर्य व चंद्राच्याच कशावरून असा ही प्रश्न आपणास पडू शकतो. या विधानास एक आधार आहे. तो म्हणजे मराठी भाषेतील एका ताम्रपत्रावरील मथळ्यावर चंद्राची आकृती काढलेली असून त्या आकृतीवर चंद्रमा अशी अक्षरे लिहीलेली आहेत. व लेखाच्या शेवटी सूर्याची आकृती काढलेली असून त्या आकृतीत सुरियो अशी अक्षरे आहेत. या वरून मुद्रामध्ये आढळणाऱ्या आकृत्या ह्या सूर्य चंद्राच्याच आहेत हे स्पष्ट होते. याज्ञवल्क्य स्मृतीतील मुद्रे संबंधी जो श्लोक आहे त्या श्लोकानुसार राजाने स्वकुलाच्या चिन्हांसहित मुद्रा करावी असे सांगितले आहे. पण मराठी रियासतीत ऐतिहासिक पुरषांच्या मुद्रामधून कुळांची चिन्हे कोठे ही आढळत नाहीत. त्याला अपवाद फक्त देशमुखाची मुद्रा आहे. देशमुखाच्या मुद्रेत मात्र नांगराची प्रतिमा काढलेली आढळते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यास प्रारंभ झाला. तेव्हा पासून पूर्व पद्धतीचे पुनुरुज्जीवन करून सूर्य चंद्राच्या प्रतिमा मुद्रेत घालण्याचा प्रघात सुरु करण्यास आला. शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक बहुतांश पुरुषांच्या मुद्रामध्ये पूर्व परंपरेस अनुसरून सूर्य चंद्राच्या प्रतिमा येऊ लागल्या.
संदर्भ – (ऐतिहासिक पुरुषांच्या मुद्रांचे प्रदर्शन पृ. १२४)
(भारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल शके १८३५ इतिवृत्त पृ.१९७)
राम वाघोले
