मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग १७ –
धर्मसंवर्धन करणाऱ्या छत्रपतींच्या मुद्रा आणि ‘पंडितराय’ पदाची स्थापना – महाराष्ट्रावर परकीय आक्रमणे झाली आणि यादव घराण्याची सत्ता लयाला गेली. त्याकाळानंतर महाराष्ट्रात धर्माचा ऱ्हास होऊ लागला, परकीय आक्रमकांच्या जुलुमामुळे हिंदू धर्माचे आचार-विचार आणि परंपरा धोक्यात आल्या होत्या. अशा अंधकारमय काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला आणि त्यांनी या लोप पावलेल्या धर्माचे पुनरुज्जीवन केले!
समर्थ रामदास स्वामी म्हणूनच छत्रपतींचे वर्णन करताना म्हणतात –
“धर्म रक्षी यैसा नाही |महाराष्ट्रधर्म राहिला तुम्हा करिता |”
अष्टप्रधानातील ‘पंडितराय’ पदाचे महत्त्व
महाराष्ट्रीय समाजाची बिघडलेली धार्मिक घडी पुन्हा बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात ‘पंडितराय’ हे महत्त्वाचे पद निर्माण केले.
कानूजाबित्यानुसार पंडितरायांची कामे – धर्म आणि अधर्माचा निवाडा करणे. शिष्टांचा सन्मान करणे आणि आचार-व्यवहार ठरवणे. धार्मिक प्रायश्चित्त पत्रांवर आपली संमती (स्वाक्षरी/चिन्ह) देणे.
छत्रपती शाहू महाराजांच्या काळात राजेश्री मुद्गलभट बिन मल्हारभट राजपुरोहित हे पंडितराय या पदावर अधिष्ठित होते.
छत्रपती राजाराम महाराजांची मुद्रा आणि धर्मरक्षक
संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर औरंगजेब संपूर्ण महाराष्ट्र गिळंकृत करण्यासाठी आणि मंदिरे-धार्मिक स्थळे उध्वस्त करण्यासाठी दक्षिणेत उतरला. महाराष्ट्रावर आलेल्या या अभूतपूर्व संकटाच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली.
छत्रपती राजाराम महाराजांची मुद्रा –
“श्री धर्मप्रद्योतिता शेषवर्णा दशरथेरिव राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते”
अर्थ – ज्याप्रमाणे रामराज्यात सर्व वर्णांचे लोक धर्माला प्रकाशित करत होते, त्याचप्रमाणे ज्यांच्या राज्यात सर्व लोक धर्माचा प्रकाश पसरवत आहेत, अशा दशरथपुत्र रामासारख्या छत्रपती राजाराम महाराजांची ही मुद्रा सर्व विश्वाला वंदनीय आहे.
त्या काळात संपूर्ण मराठी समाजात छत्रपती राजाराम महाराज हे प्रभू श्रीरामांचाच अवतार आहेत अशी श्रद्धा निर्माण झाली होती.
सन १६९४ मध्ये मोरो रायाजी पारपत्यगार या अधिकाऱ्याने छत्रपती राजाराम महाराजांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते:
“स्वामी अवतारी त्या अवतरे बिबीशनाची स्थापना जाहली तो चिरंजीव जाहला तोच हा अवतार दुष्टांचा संहार धर्माची स्थापना होत आहे.”
यावरून स्पष्ट होते की, औरंगजेबाविरुद्ध मराठ्यांनी पुकारलेला संघर्ष हा केवळ सत्तेचा नव्हता, तर तो ‘धर्मस्थापना आणि धर्मरक्षणाचा’ एक महान लढा होता!
संदर्भ –
१) ऐतिहासिक पुरुषांच्या मुद्रांचे प्रदर्शन(पृ.१४६ ते १४९)
२) अर्वाचीन महाराष्ट्रेतिहास काळातील राज्यकारभाराचा अभ्यास (पृ. २१५ ते २१८.)
राम वाघोले
