मरगळनाथ मंदिर, गुंडेगाव, ता. नगर

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 1639
2 Min Read

मरगळनाथ मंदिर, गुंडेगाव, ता. नगर –

अहमदनगर जिल्ह्यातील नगर शहरापासून ३० किमी अंतरावर असणारे गुंडेगाव हे एक ऐतिहासिक गाव. गुंड ऋषींची तपोभूमी असल्याने गावाला गुंडेगाव नाव पडल्याची आख्यायिका गावकरी सांगतात. गावात गेल्या गेल्या उजव्या बाजूला पुरातन असे मरगळ नाथ महादेवाचे मंदिर आपल्या नजरेस पडते. मंदिराला रंगरंगोटी केलेली असल्याने त्याचे मूळ पण लोप पावले आहे. मंदिरा समोर नंदी असून एक वीरगळ व भैरव मूर्ती उभी करून ठेवलेली दिसून येते.(मरगळनाथ मंदिर गुंडेगाव)

मंदिर पूर्वाभिमुख असून सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपातील स्तंभांवर विविध पशु व पक्षी यांचे शिल्पांकन आहे. सभामंडपात दोन देवकोष्टके असून त्यात गणेश व विष्णू मूर्ती आपापल्या दिसून येते. मंदिराचा मागील भाग बराचसा ढासळळा असून गावकऱ्यांकडून त्याची डागडुजी हाती घेण्यात आली आहे.

मरगळ नाथ मंदिरा पासून काही अंतरावर असणाऱ्या गावाच्या वेशी जवळ दुर्मिळ अशी गद्धेगळ, वीरगळ, स्मृतीशिळा, अनेक शिल्पं व भग्नावस्थेतील मुर्त्या विखुरलेल्या आपल्याला दिसून येतात. वेशीच्या आत मध्ये गेल्यावर रामेश्वराचे जीर्णोद्धार केलेले पुरातन मंदिर आहे, रामाने स्थापित केलेले शिवलिंग येथे पूर्वी होते परंतु यवनांच्या आक्रमणात ते भंग करण्यात आले आता स्थापित केलेले शिवलिंग नवीन आहे, या मंदिराच्या परिसरात असंख्य वीरगळी आणि देव देवतांची शिल्पे विखुरलेली आहेत. गावात अनेको ऐतिहासिक आणि पौराणिक खाणाखुणा जागोजागी दिसतात, ज्या जतन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.गावात अनेको ऐतिहासिक आणि पौराणिक खाणाखुणा जागोजागी दिसतात, ज्या जतन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Rohan Gadekar

Written By: Rohan Gadekar

Leave a Comment