शाहशरीफ दर्गा | दर्गा दायरा, अहमदनगर

शाहशरीफ दर्गा

शाहशरीफ दर्गा –

घुमटाच्या टोकावर तळपता सूर्य असणारा भारतातील एकमेव दर्गा म्हणजे अहमदनगर चा ‘दर्गा दायरा’  किंवा ‘शाहशरीफ दर्गा’. अहमदनगर मधील मुकुंद नगर भागात बुऱ्हाननगर जवळ हा दर्गा आहे . शाह शरीफ जी जलाली होते. जलाली म्हणजे ते जे बोलत ते खरे होई.

इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. मालोजीराजांना मुलबाळ नव्हते. मोहीमेवर असताना ते शाह शरीफ बाबांची महती ऐकून त्यांच्या दर्शनाला आले. त्यांच्या आशीर्वादाने आणि प्रसादाने त्यांना दोन पुत्र झाले. पुत्र झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी म्हणून मालोजीराजे मुलांना आणि राणी सरकारांना घेऊन दर्ग्यात दर्शनाला आले, तेव्हा त्यांनी शाह शरीफ बाबांना त्यांच्या नावावरून मुलांची नावं ठेवण्याची परवानगी मागितली. त्यांच्या नावावरूनच एका मुलाचं नाव शहाजी आणि दुसऱ्याचं नाव शरीफजी ठेवण्यात आलं. अजूनही भोसले घराण्यातले वारस तिथे दर्शनाला येत असतात.

शाह शरीफ बाबांचा दर्गा म्हणजे गंगाजमनी परंपरेतलं एक महत्त्वाचं ठिकाण. दर्ग्यावर सूर्य आहे म्हणजे ती व्यक्ती अल्लाच्या खुप जवळ असते किंवा सूर्यासारखी तेजस्वी असते. आणि पूर्ण भारतामध्ये हा दर्जा फक्त दर्गा दायरा ला मिळालेला आहे. बाबा शाह शरीफ गुजरात मधून दौलताबादला आले होते. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी खुलताबादला दीक्षा प्राप्त केली त्यानंतर ते अहमदनगरला आले. जिल्ह्याच्या उत्तरेला नदी किनारी जुन्या चिंचेच्या झाडाखाली एका तीन खणांच्या घरात ते राहू लागले आणि तिथेच त्यांनी त्यांच्या साधनेला प्रारंभ केला. त्यांच्यासोबत त्यांची बहीण होती. आता त्या ठिकाणाला हुजरा म्हणतात तिथे त्यांचा पलंग, त्यांची साधनेची खोली अजुनही सुस्थितीमध्ये आहे.

समोरच्याच बाजूला त्यांची कब्र म्हणजे दर्गा बनवला आहे. पर्शियन शैलीतलं हे अतिशय उत्कृष्ट, मोठा घुमट असलेलं ठिकाण आहे. बालब्रह्मचारी असल्यामुळे दर्ग्याच्या आत स्त्रियांना प्रवेश नाही. मात्र दारातून आपल्याला दर्शन घेता येतं. पूर्वीच्या काळी दर्ग्याच्या पाठीमागे एक मोठा कारंजा होता. खापरी नळ योजनेतुन त्यात पाणी आणलं होतं. कारंज्यापासून, दर्ग्याच्या बाजूने जमिनीच्या आतून, वजू करण्यासाठी समोरच्या बाजूला एक छोटासा धबधबा केलेला होता आणि तिथे वजू करून भाविक दर्ग्यात दर्शन करायला जायचे. दर्ग्यावर युनानी प्रक्रिया केलेली शहामृगाची अंडी बांधलेली आहेत. तिथेच शेजारी प्रार्थनेसाठी जागा आहे जिथे बसून आपण प्रार्थना करू शकतो. प्रसन्न आणि भारावलेलं वातावरण तिथे आहे.

या परिसरात एक सुस्थितीत असणारी आणि अजूनही पाणी पुरवणारी बारव आहे. दर्ग्याच्या आवारात असल्यामुळे तिची स्वछता राखली गेली आहे. आजपर्यंत नगर मध्ये जेव्हा जेव्हा दुष्काळ आला तेव्हा तेव्हा या बारवेने नगरकरांची तहान भागवली आहे.

दर्ग्याच्या बाजूला एक छोटा इदगाह (ईदच्या प्रार्थनेचे जागा) आहे. तिथे भिंतीला तीन पायर्‍या होत्या, चौकशी केली असता कळलं की प्रत्येक ईदगाह मध्ये अशा तीन पायऱ्या असतात तिथे बसून ईदच्या दिवशी खुदबा अर्थात प्रवचन देतात. जे खुदबा वाचतात त्यांना मिंबर असं संबोधलं जातं. या परिसरामध्ये छोट्या-मोठ्या अशा अनेक कबरी आहेत. उंच घुमट आलेली कबर पुरुषाची असते, छोटा घुमट असलेली किंवा जमिनीला समांतर असते ती स्त्री ची, आणि कबरेच्या वर थोडासाच भाग वरती आलेली असेल तर ती लहान मुलांची कबर असते. इतर ठिकाणी आपण डोकावून नाही बघत त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींपासून लांब राहतो.

दर्गा दायराच्या चारही बाजूंना छान इमारती आहेत. त्या काळात बांधलेल्या त्या इमारती अतिशय प्रशस्त आहेत. मोठे दरवाजे आणि पूर्वी असलेल्या चार बुरुजांपैकी आता फक्त दोन शिल्लक आहेत. अशा बुरुजांच्या दायऱ्यामध्ये असलेला तो दर्गा म्हणून दर्गा दायरा. पण तो दायरा एवढा मोठा की त्याच्या आत एक पूर्ण गाव वसलेलं होतं.

दर्ग्याला चुन्याचा रंग दिला जातो म्हणून त्या दायऱ्याच्या आत असलेल्या घरांना कधीच चुना दिला जात नसे. आता ना जुने घरं राहिले ना या मान्यता पण तिथे अजूनही शाबूत आहे श्रद्धा, अतूट विश्वास आणि गंगाजमनी परंपरा.

दिपाली विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here