महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 95,25,443

ऐतिहासिक बारवेतील पुरातन चौमुखी गणेश

Views: 3
2 Min Read

ऐतिहासिक बारवेतील पुरातन चौमुखी गणेश, पातूर –

अकोला जिल्ह्यातील पातूर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले प्राचीन शहर आहे. डोंगररांगांनी वेढलेल्या या शहराचा इतिहास अनेक शतकांपूर्वीपर्यंत जातो. ऐतिहासिक संदर्भांमध्ये पातूरचा उल्लेख ‘पराशर नगर’ किंवा ‘पराशर नगरी’ असा आढळतो. तसेच पुढील काळात हे शहर ‘नानासाहेबांचे पातूर’ आणि ‘पातूर शहाबाबू’ या नावांनीही ओळखले गेले.

पातूरच्या परिसरात प्राचीन लेणी, विहार, मंदिरे, बारव आणि इतर ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष आढळतात. मराठी विश्वकोशातही पातूर येथील दोन विहारांचा उल्लेख करण्यात आला आहे. या वास्तू पातूरच्या प्राचीन इतिहासाची आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाची साक्ष देतात. पातूरमधील तेली वेटाळ चौकातील विठ्ठल मंदिराजवळच काळ्या पाषाणात बांधलेली एक प्राचीन बारव (जुनी विहीर) आहे. ही बारव यादवकालीन असून तिची निर्मिती बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.

या प्राचीन बारवेमध्ये श्री गणेशाची अत्यंत सुंदर आणि कोरीव मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती चौमुखी असून तिच्या चारही दिशांना गणेशाच्या कोरीव मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही शिल्पकृती धार्मिकदृष्ट्या तसेच शिल्पकलेच्या दृष्टीने विशेष वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेष म्हणजे ही गणेशमूर्ती वर्षभर बारवेतील पाण्यात बुडालेली असते. गणेशोत्सवादरम्यान गावकरी बारवेतील पाण्याचा उपसा करून आणि गाळ काढून मूर्ती मोकळी करतात. त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून तिच्यावर अभिषेक केला जातो. मूर्तीला सजवून पूजा-अर्चा व आरती करण्यात येते.

स्थानिकांची अशी श्रद्धा आहे की, गणेशोत्सवादरम्यान मूर्ती पाण्यातून मोकळी करून तिची पूजा-अर्चा केल्यानंतर पातूरवासीयांवर वरुणराजाची कृपा होते आणि परिसरात पावसाचा वर्षाव होतो. पातूरच्या या प्राचीन बारवेत जतन झालेली चौमुखी गणेशाची ही दुर्मीळ शिल्पकृती विदर्भाच्या समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाची साक्ष देणारी आहे. अशा प्राचीन वास्तू, बारव आणि शिल्पांचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. कारण या वास्तू आपल्या पूर्वजांच्या कला, श्रद्धा आणि स्थापत्यपरंपरेचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवतात.

📍 चौमुखी गणेश – तेली वेटाळ चौक, पातूर, जि. अकोला

Photo – Rahul Bochare

Leave a Comment