महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,02,051

दशानन रावण मूर्ति, सांगोळा, अकोला

By Discover Maharashtra Views: 1301 6 Min Read

दशानन रावण मूर्ति, सांगोळा, अकोला –

अकोला जिल्ह्य़ातील सांगोळ्यामध्ये रावणाची दहातोंडी मूर्ती आहे. या गावात दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या या मूर्तीची पूजा केली जाते. काय आहे ही अनोखी प्रथा? विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय.. रामराज्याचा रावणराज्यावरचा विजय.. प्रभू रामाने रावणचा शेवट केला तो दिव्य दिवस.. रावणाने सीतेचे अहंकारातून हरण केले याच अहंकारी रावणाचा दशमीला रामाने वध केला. म्हणून संपूर्ण भारतभर विजयादशमीला (दसऱ्याला) रावणरूपी पुतळ्याचं दहन होतं..(दशानन रावण मूर्ति)

रावण म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर येते तो रावण नावाचा खलनायक. दृष्ट प्रवृत्ती असणारा अहंकारी माणूस.. लहानपणापासून रावणाच्या दुष्कृत्यांचे किस्से रामायणापासून ते अनेक पोथ्यापुराणांतून आपण ऐकलेले, वाचलेले असतात. त्यामुळे रावण म्हटलं की तो खलनायक, दुष्ट, राक्षस म्हणूनच आपल्याला माहीत असतो. पण विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र रावण पुजला जातो..

त्याबरोबरच सबंध भारतात एकमेव असावी अशी काळ्या पाषाणातील दशमुखी, वीस भुजाधारी, रावणाची मूर्तीदेखील येथे आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या सांगोळा या गावात चार ते साडेचार फूट उंच काळ्या दगडातील रावणाची मूर्ती ही कुणाही सामान्य माणसाला आश्चर्यचकित करते.. रामराज्यात रावण पूजन ही गोष्टच अनेकांना विचार करायला भाग पाडते.

सांगोळा हे हजार-दीड हजार लोकवस्तीचं गाव. रावणाच्या मूर्तीने मात्र हे गाव रावणाचं सांगोळा असंच  काहीसं ओळखलं जातं.. गावात प्रवेश करण्यापूर्वीच गावात जाताना डाव्या बाजूने एका ओटय़ाच्या चौथऱ्यावर काळ्या पाषाणाची एक भव्य मूर्ती दिसून येते. हीच ती रावणाची दशमुखी मूर्ती आणि याच मूर्तीभोवती सुमारे २० फुटांच्यावर चौरस दगडांनी बांधलेला ओटा आहे.. या मूर्तीसमोरील ओटा हेच गावातील रावणाचे मंदिर.. काळ्या दगडात घडवलेली ही मूर्ती रावणाचं अहंकारी रूप दर्शवते.

या मूर्तीला दहा तोंडे आहेत.. दहा तोंडाच्या दहाही चेहऱ्यांवरचे भाव हे अहंकारी, कपटी रावणाचेच दर्शन घडवतात.. दहा तोंडाच्या रावणाला चांदीचे डोळे लावलेले आहेत.. सर्व दहाही मस्तकांवर मुकुट आहेत. मूर्तीच्या हाती मोठी तलवार आहे शिवाय मूर्तीच्या इतर भुजांमध्ये इतर शस्त्रं आहेत (गदा, बाण.) ही मूर्ती युद्ध पेहरावात आहे. दसऱ्याच्या दिवशी सर्वजण रावणाविषयी राग, तिरस्कार द्वेष व्यक्त करतात. ठीकठिकाणी रावणाचा पुतळा जाळून रावणाचा निषेध केला जातो.

सांगोळ्यात मात्र जणू रावणाच्या या समस्त दुष्टपणाला, कपटीपणाला माफ करण्यात आले आहे.. सुमारे २०० ते २५० वर्षांहून अधिकचा इतिहास या सांगोळ्याच्या रावणपूजेला असल्याचं गावकरी सांगतात. रावणाची मूर्ती ही या गावात कशी आली याबाबत गावकरी आख्यायिका सांगतात. गावातील ग्रामदैवतेसमोरील झाडाची दगडी प्रतिकृती बनवण्याकरिता गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पंचक्रोशीतील बाभुळगावच्या एका शिल्पकाराला सांगण्यात आले.

त्या मूर्तीकाराने मूर्ती घडवली पण ती झाडाची न बनता दहा तोंडांची अहंकारी पुरुषाची प्रतिकृती निर्माण झाली. सांगितल्याप्रमाणे मूर्ती मिळाली नसल्याने गावकरीदेखील विचारात पडले. पण मूर्ती तयार आहे तर न्यावी लागणार म्हणून मूर्ती न्यायचं ठरवलं आणि गावात गेल्यावर काय तो निर्णय घेऊ म्हणून निघाले असता प्रत्येक गावाची हद्द आली का मूर्ती असलेली बलगाडी अडून राहायची. हलायचीच नाही.

शेवटी गावकऱ्यांनी प्रत्येक गावाच्या वेशीवर नारळ फोडून गावात मूर्तीची स्थापना करू असे कबूल केले असता पुढे अडथळे आले नाहीत. अशी आख्यायिका सांगितली जाते. अशा रीतीने मूर्ती गावात आली. सांगोळ्यातील रावण मूर्तीची अशी आख्यायिका आहे. दहा तोंडांची, अहंकारी भाव दर्शवणारी युद्ध पोशाखातील शस्त्राधारी मूर्ती असल्याने गावकऱ्यांनी रावणाची मूर्ती म्हणून या मूर्तीवर शिक्कामोर्तब केले. सहिष्णुता हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग असल्यामुळे रावण जरी दुष्ट, कपटी, अहंकारी असला तरी सांगोळ्यात या रावणाची प्रतिष्ठापना केलेली आहे. गावात रावणाच्या मंदिराव्यतिरिक्त एक हनुमानाचे मंदिर आहे.. दसऱ्याला संध्याकाळी रावणाची विशेष पूजा गावकऱ्यांद्वारे केली जाते.. दसऱ्याच्या सणाला रावणाच्या मूर्तीला हार, फुलं वाहली जातात. मूर्तीसमोर दिवे पेटवले जातात. या गावातील रहिवासी व निवृत्त शिक्षक दिनकर पोरे याविषयी सांगतात की, दसऱ्याला ठिकठिकाणी रावणाचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला जातो. पण या निषेधात उन्मादच जास्त दिसतो..

रावण जरी दुष्ट प्रवृत्तीचा असला तरी तो एक प्रचंड ज्ञानी पंडित होता असं म्हटलं जातं, हे आपण सोयीस्कर विसरतो.. रावणाने साक्षात शंकरांना प्रसन्न करत अजेय वरदाने मिळवली होती, असं मानलं जातं. सांगोळ्यात या मूर्तीविषयी किंवा रावणाविषयी तिटकारा, तिरस्कार वाटत नाही.. की कधी विरोध म्हणून कुणीच रावणाच्या मूर्तीची टिंगल किंवा विटंबनादेखील केली नाही. इतर ठिकाणी मात्र रावणाची दसऱ्याला टिंगल व चेष्टा होतानाच जास्त दिसते.

गावात रावणाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कुठलाही मोठा उत्सव होत नसला तरी गावातील नागरिक आपापल्या सोयीनुसार पूजा करतात.. सांगोळा या गावाव्यतिरिक्त विदर्भातील आदिवासी जमाती या रावण पूजा करतात; किंबहुना सातपुडय़ाच्या पायथ्याचा भाग हा अतिदुर्गम तथा डोंगराळ, घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. याच पर्वतरांगांमध्ये मेळघाट वसलेलं आहे.

कोरकू हे रावणाला देव मानतात. कोरकू आदिवासींमध्ये असे मानले जाते की, महादेव त्यांचे पिता आहेत, शिवाय त्यांच्या उत्पत्तीसाठी रावणाने भगवान शिवाजवळ प्रार्थना केली आणी रावणाच्या भक्तिभावाने प्रसन्न होत महादेवाने कोरकूंची सृष्टी निर्माण केली. यासाठीच कोरकू हे दसरा तथा होळीला रावणाची पूजा करतात.

आदिवासी कोरकू फक्त रावणालाच नव्हे तर त्याचा पुत्र इंद्रजीत मेघनाद यालासुद्धा मनोभावे पूजतात. आदिवासी कोरकूंची अशी धारणा आहे की एकदा मेघनादने युद्धात कोरकूंचे रक्षण केले होते. यासाठीच कोरकू हे मेघनादपूजक म्हणूनपण ओळखले जातात. आदिवासी कोरकूंच्या गावात पूजेसाठी भलेमोठे दोन लाकडी उंच खांब रोवलेले असतात. मेघनाद खांब म्हणूनच ते ओळखले जातात.

पोस्ट – संतोष विनके
फोटो – RJ Dipak Wankhade

Leave a comment