खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास

खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास | खानदेशचा पुर्व मध्यकाळ आणि व्यवस्था

खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास –

पुरातत्वेत्यांनी गिरणा आणि तापी नदीच्या परिसरात केलेल्या उत्खननामुळे या प्रदेशातील प्रागैतिहासिक काळातील भटक्या मानवाची वस्तुरूप संस्कृती काही प्रमाणात उजेडात आली. तापीच्या खोऱ्यात जवळपास पंधराशे एवढी मानवी वसतीचे पुरावे असलेली स्थळे डॉ.वसंत शिंदे आणि इतर तज्ञांनी शोधली आहे. या दोन्ही नद्यांच्या काठी मिळालेल्या प्राचीन अश्मयुगीन हत्यारांमुळे जळगाव परिसरात एक-दीड लाख वर्षांपूर्वी मानव वस्तीला राहत असावा. चांगदेवपासून अवघ्या तीन किलोमीटर आग्नेयेस असलेल्या मानेगावी आद्य पुराश्म युगातील म्हणजे काही अवशेष सापडले आहेत.(खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास)

बी.पी.बोपर्डीकर यांनी उत्खनन केले आहे. “Early stone age site at Manegav of the Purna river, Jalgaon district Maharashtra, indian antiquity असा त्यांचा लेख इंडियन अंटीक्वेरी खंड 4 मध्ये 1970 मध्ये प्रसिद्ध झाला.

पाटणे या गावी चाळीसगाव तालुक्यातील, मध्यपुराश्म युगाच्या(middle paleolithic) म्हणजे शेवटच्या काळापासून उत्तर पुराश्म युगातील म्हणजे अप्पर पेलीओलेथिक आणि त्यापुढील मध्याश्मयुगातील म्हणजे मेझोलेथिक काळात मानवी वसाहतींचे यांचे पुरावे आढळले आहेत. पाटणे येथील उत्खननाचा रिपोर्ट बघितल्यास आपल्यास ही माहिती मिळते. पाटणे बद्दल सविस्तर वेगळा लेख लिहिन. यावरून खानदेशात इसवी सन पूर्व दिड लाख ते एक लाख वर्षे या कालावधीत मानवी वसाहत होती. गिरणेच्या काठी येथे बहाळ आणि टेकवडे येथे 1952 व

57 मध्ये केलेल्या उत्खननावरून ताम्रपाषाण युगात इसवी सन पूर्व २७०० ते इ.स. सहाशे येथे निश्चित मानवी वसतीचे पुरावे मिळाले आहेत.

लासन (Lassen) या इतिहासकारांच्या मते संस्कृत भाषा बोलणारे लोक दक्षिण गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरून तापीच्या खोऱ्यात शिरले व तेथून पुढे पूर्वेकडे गेले तशीच एक वसाहत करणाऱ्यांची लाट पूर्वेकडे आल्याचे काही उल्लेख आख्यायिका मध्ये आहेत. या आख्यायिका ग्राह्य धरल्या तर किंवा काही कणही ग्राह्य धरले तक्ष इसवी सन पूर्व सोळाशे शतकाच्या अगोदर खानदेशातील गडावर विविध राजपूत अधिपतींचे राज्य होते असे अनुमान करता येईल. नाशिकच्या सातवाहन लेणीतील सातवाहन काळातील लेणीतील शिलालेखात ऋषिक हा उल्लेख आहे या प्रदेशात सातवाहन काळात म्हणजे इसवी सन पूर्व 250 ते इ स 250 ऋषिक नावाचे हिमालयात वस्ती करून राहणारे लोक आले. त्यांचा स्वामी कृष्ण,#कान्हा, कण्ह असा बदल होऊन कानदेश आणि पुढे खानदेश असे नाव पडले असावे. येथील राजे अभीर म्हणजेच मध्ययुगातील आहेत, जरी ते नंतरच्या काळात उल्लेख सापडतो तरी सुरवातीच्या काळात वसती केली असावी.
आसिक हा ऋषिक नावाचा अपभ्रंश मानला तर प्राचीन खिंड आसिरगडला पुष्टी मिळते. त्याविषयी सविस्तर संशोधन लेख मी आशिरगड या पुस्तकात लिहिले आहे. ते अप्रकाशित आहे. ते व्यवसायांनी गवळी होते. म्हणजेच कृष्णाची नाते सांगणारे काही काळ खान्देशावर त्यांनी राज्य केले. नंतरच्या काळात चालुक्य बदामींचे ते मांडलिक दिसतात. तसेच अजिंठा लेणी येथील शिलालेखात उल्लेख असलेले वाकाटक राजांचे मांडलिक राजे अभिर असण्याची शक्यता दिसते. अजिंठा आणि खानदेश या संदर्भात सविस्तर लिहिले आहे. तर नाशिक लेणीतील शिलालेखात शिवपुत्र शिवदत्त याचा पुत्र ईश्वर सेन या राज्याची इसवी सन 419 मध्ये खानदेशावर सत्ता होती असे नाशिक लेणीतील एका शिलालेखातून दिसून येते.

प्राचीन काळ समजून घेण्यासाठी खानदेशात असलेल्या लेणी नाशिक अजिंठा यातील शिलालेखांचा आधार घ्यावा लागतो. स्थानिकांनुसार रामायणातील रामायणकालीन शरभंग ऋषीचा आश्रम उनपदेव चोपडा येथे तालुका चोपडा आणि वाल्मिकींचा आश्रम वालझरी चाळीसगाव येथे होता. तसेच खानदेशात फिरतांना अनेक ऋषिंच्या आश्रमांचा उल्लेख येतो. कानळदा कण्व, शिंगद येथे शृंग इत्यादि अजून उदाहरणे देता येतील. यांची कथा आणि दंतकथा सांगितल्या जातात.

ऋषींचे आश्रम तसेच अजिंठा परिसर गौतम ऋषींचा म्हणून ओळखला जातो, तर महाभारतात उल्लेखलेली एकचक्रा नगरी म्हणजे आत्ताचे एरंडोल असेही सांगतात. इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व तीनशे या काळात विदर्भ खानदेशात आर्य लोक आले, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यात रेणुकामाता आणि तिच्या कथा प्रामुख्याने आहे. अनेक जण तिला कुलदेवता मानतात. दंतकथांवर विश्र्वास नसला तरी काही कण सापडतात एवढं मात्र नक्की.

खानदेशाविषयी पहिला विश्वसनीय संदर्भ टॉलेमी इसवीसन 150 चा लेखनात मिळतो. टॉलेमीने फिलीट आणि कोंडली किंवा गोंडली यांचे मुळस्थान नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे असल्याचे नमूद केले आहे. ते फिलिट म्हणजे बहुतेक भिल असावेत. आजही खानदेशात बरेच भिल्ल आहेत. भारतात नंतर आलेल्या टोळ्यांनी नर्मदेकाठून भिल्लांना खानदेशात पिटाळले. त्यावेळी खानदेश हीच भिल्लांची मुख्य वसाहत झाली होती. गोंडली याचे गोंधळी या शब्दाशी जसे उच्चार साम्य आहे. तसेच गोंड्या शब्दाचीही आहे. गोंडू गवळी गोंड महार हे गोंडांचेच वंशज असावेत. त्यांची वस्ती चाळीसगाव भागात जास्त प्रमाणात आहे.

नाशिक लेण्यातील इसवीसन 419 च्या एका शिलालेखात नाशिक खान्देश भागांवर अहिरांची सत्ता होती. या काळी या भागात आहिर वंश स्थायिक झाला होता. आज अहिरांपैकी अहिर सोनार, अहिर सुतार, आहिर शिंपी इत्यादी पोटभेद जिल्ह्यात आढळतात. खान्देश शिवाय ते वायव्य सीमा प्रांत, बंगाल, मध्य प्रदेश, कच्छ व काठेवाडतही आहे. ते सिथियन वंशाचे असावेत व मध्य आशिया व पुढे सिंधू खोऱ्यातून भारतात आले असावेत. काहींच्या मते अभीर हे आर्य वंशाचे आहेत. मात्र त्यास विश्वसनीय पुरावा नाही. स्थानिक आख्यायिकेनुसार काठेवाड हे अहिरांचे मुख्य केंद्र होते व येथिल आहिरांचे यांचे बाराव्या व तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांची जवळचे राजकीय संबंध जोडले होते.

गुजरातेतील मुसलमान स्वाऱ्यांना कंटाळून अकराव्या शतकात लेवा पाटीदार व लेवा गुजर हे तापीच्या खोऱ्यात आले. अल्लाउद्दीन खिलजीच्या देवगिरी वरील स्वारीच्या वेळी म्हणजे इ.स.१२९६ मध्ये मुसलमान प्रथमच या भागात आले. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठे दक्षिणेकडून तेथे आले. फारुकी राजवंशाचा संस्थापक मलिक राजा तथा राजा अहमद हा दुसऱ्या खलिफाचा वंशज होता. त्याची राजवट थाळनेरला १३७० पासून सुरू झाली. याच काळात अरब लोक या भागात आले. आठव्या शतकातील राष्ट्रकुट राजांच्या सैन्यात बरेच अरब होते हे दिसते. याच काळात फरिश्ता या इतिहासकाराने नुसार याच काळात पहिल्या दुर्गादेवी दुष्काळात भिल्ल व कोळी वगळता बहुतेकांनी येथून स्थलांतर केले. फारुकींच्या काळात या भागाची भरभराट झाली व शेजारच्या राज्यातील बरेच हिंदू व मुसलमान या भागात येऊन स्थायिक झाले. मुगल काळात येथे भिल्ल व कुणबी यांची भरभराट झाली.

अहमदनगर आणि विजापूरच्या राजवटीचा अस्त झाल्यानंतर तेथे अराजक माजून दक्षिणेत अस्थिरता आली. खानदेशात त्या मानाने शांतता असल्याने बरेच लोक येथे येऊन राहिले. औरंगजेबाच्या कारकिर्दीत खानदेशातील काही हिंदूंनी स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारला तर अनेकांना बळजबरीने मुसलमान करण्यात आले. खानदेशावर मराठ्यांची सत्ता स्थापन झाल्यावर म्हणजे १७६०-१८१८ हिंदूंना पुन्हा स्थैर्य प्राप्त झाले.

इसवीसन अठराशे तीन मध्ये भयंकर दुष्काळामुळे भिल्ल व कोळी यांच्याशिवाय इतरांनी काही काळ परत स्थलांतर केले. दुष्काळामुळे इथले जनजीवन पार विस्कळीत झाले. स्थलांतरित आणि पैकी बरेच लोक परत आलेच नाहीत. या कालखंडात येथे स्थानिक सरदारांनी उत्तर भारतातील अरब, उत्तर भारतातील परदेशी ब्राह्मण व कर्नाटकातील नाईकडा या तीन जमातींच्या सेना आपल्या पदरी बाळगल्या होत्या.

ब्रिटिश राजवट आल्यावर अठराशे अठरा मध्ये नाईकडा सैन्य हे कर्नाटकात गेले तर अरबहे हैदराबाद कडे गेले, तर काही परदेशी ब्राम्हण मात्र तिथेच शेती व्यवसाय करून स्थायिक झाले. मात्र जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाल्यावर विदर्भ व गुजरातमध्ये गेलेले मूळचे लोक परत आले.

हैदराबादचा निजाम व शिंदे यांच्या राज्यातूनही बऱ्याच लोकांनी खानदेशात स्थलांतर केले. तरीही एकोणिसाव्या शतकात बरीच दशके येथे वस्ती विरळच होती. इसवीसन १८५२ मध्ये जिल्ह्याचा बराच भाग विरळ लोकवस्तीचा होता. त्यामुळे उपजीविकेची साधने कमी असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातून लोकांना आणण्याचे प्रयत्न झाले, परंतु एवढ्या दूर लोक यायला तयार नव्हते. उदार शेतसारा पद्धती व रेल्वे सुरू झाल्यावर नजीकच्या भागातून मोठ्या संख्येने लोक आले.इ.स.१७७४ मध्ये खान्देश मिल सुरू झाल्यावर पुणे सातारा भागातील बरेच मराठा मजूर जळगावला आले. तरीदेखील २८७२ मध्ये खान्देश इतर जिल्ह्याच्या मानाने विरळ वस्तीचा गणला जात होता.

ब्रिटिश राजवटीत आलेल्या स्थलांतरित लोकांमध्ये प्रामुख्याने मारवाडी, व्यापारीवर्ग, रंगारी व तेल कामगार वर्ग आणि मराठा व कुणबी व मजूर वर्ग येथे आला.

येथील बंजारी लोक समुद्रकिनाऱ्यापर्यंत बैलगाडीने मालाची वाहतूक करत. रेल्वे आल्यानंतर बंजारांना वाहतुकीच्या बाबतीत रेल्वे स्पर्धा करावी लागली. काहींना पारंपारिक व्यवसाय पूर्ण सोडावा लागला. तांडा नायकांची जवळ भांडवल असल्यामुळे ते व्यवसाय करू लागले व्यापार करू लागले आणि तांड्यातील बाकीचे लोक शेती व्यवसाय करू लागले. काहींनी लुटमारीचा मार्ग स्वीकारला. आता ह्या भागात झपाट्याने औद्योगिकीकरण होत असून इतर भागातील लोक येथे येत आहेत. तरीही प्राचीन व्यवस्था, प्राचीन इतिहास आणि व्यवस्था समजून घ्यायला आशिरगड तसेच अजिंठा याचा क्रमाक्रमाने अभ्यास करूया. या आधी या भागात झालेली उत्खनने आणि त्यांचा आढावा घेतल्यास बराच उलगडा होईल.खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास.

संदर्भ:

१. महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा: १९९४
२. हिस्टरी ऑफ मिडीएव्हल डेक्कन, एच.के.शेरवानी,पी.एम. जोशी
३.बी.पी.बोपर्डीकर, अर्ली स्टोन एज साईट ऑट मानेगाव ऑन दि पुर्णा रिव्हर जलगांव डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र, इंडियन अन्टिक्वरी खंड ४.

Suresh Suryawansh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here