स्त्रियांच्या मुद्रा शिक्कामोर्तब –
मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासात स्त्रियांचा पत्रव्यवहार अतिशय कमी प्रमाणात आहे. परंतू राज्यकारभारात व राजकारणात स्त्रियांनीही लक्ष घातलेले आपण अभ्यासले आहे. छत्रपती व त्यांचे अष्टप्रधान तसेच देशमुख व मातब्बर सरदार आणि थोर वतनदार घराणी यामधील स्त्रियांनी पतीच्या पश्चात अनेक वर्षे राज्यकारभार उत्तम रीतीने चालवल्याची उदा. आहेत. छत्रपती घराणे, डफळे, निंबाळकर, दाभाडे, होळकर, घोरपडे, तंजावारकर छत्रपती, सावंतवाडीकर भोसले, पवार, नेवासकर, आंग्रे, शिंदे इ. घराण्यांनी राजकारण केल्याचे लहान मोठ्या गोष्ठी प्रसिद्ध आहेत. बऱ्याच चिटणीसी पत्राच्या शेवटी स्त्रियांनी पत्र समाप्तीची काही वाक्ये स्वहस्ते लिहिलेली आहेत. म्हणजेच अनेक राजकारणी पत्रे स्त्रियांनी पाठवलेली आहेत. तरीही अश्या पत्रांवर स्त्रियांच्या नाममुद्रा फार कमी दिसतात.
यापैकी राजमाता जिजाऊसाहेब यांच्या पत्रावर फक्त फारसीमध्ये मोहोर उमटवलेली आहे. पण ती मोहोर आर्धी फारसीत असून अस्पष्ट आहे हे सर्वश्रुत आहेच. तसेच छत्रपती संभाजीराजे यांची पत्नी येसूबाईसाहेब यांची मर्यादामुद्रा “श्री सखी राज्ञी जयति” अशी दिलेली आहे.
छत्रपती घराण्यातील अजुन एका स्त्रीची नाममुद्रा व मर्यादामुद्रा असल्याचा कागद माझ्या संग्रही आहे. तो म्हणजे, छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र कोल्हापूरकर संभाजीराजे यांची पत्नी सौभाग्यवती जीजाबाईसाहेब यांचीही नाममुद्रा व मर्यादामुद्रा होती. ती पुढीलप्रमाणे
शंभुराजस्य भार्यां जिजादेव्या धरातले । बालेंदुरी वर्धिष्णुर्मुद्रा भद्राय राजते ॥
राम वाघोले
