महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,620

करवीर राज्याचे इंग्रजांच्या हातावर उदक सोडण्यास भाग पाडणारे | शिधोजीराव अप्पासाहेब नाईक निंबाळकर

By Discover Maharashtra Views: 1680 10 Min Read

करवीर राज्याचे इंग्रजांच्या हातावर उदक सोडण्यास भाग पाडणारे | शिधोजीराव अप्पासाहेब नाईक निंबाळकर –

काही व्यक्तींच्या अंगी अफाट ताकद,शौर्य,धाडस,पराक्रम आदि गुणांचा समुच्चय असून देखील त्याचा राष्ट्र कल्याणासाठी उपयोग न झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात आढळून येतात.अशा व्यक्तींच्या अंगी असलेल्या गुणांचा राज्याला उपयोग न होण्यामागे केवळ त्या विशिष्ठ व्यक्तीची महत्वाकांक्षा असते असे नाही तर तत्कालीन सत्तारूढ व्यक्तींना अशा धाडसी,पराक्रमी,हुशार लोकांचा राज्यासाठी उपयोग करून घेता आला नाही असे पण असू शकते.काही वेळा त्याकाळची राजकीय परिस्थिती पण त्यासाठी जबाबदार असू शकते.आज ओळख करून घेऊ या.(शिधोजीराव अप्पासाहेब नाईक निंबाळकर

सध्या कर्नाटक राज्यात मोडणाऱ्या निपाणी येथील शिधोजीराव अप्पासाहेब देसाई नाईक निंबाळकर ह्या उत्तर मराठेशाहीतील अशाच एका धुरंधर व्यक्तीची. आदिल्शहा कडून ह्या घराण्यास शिरगुप्पी आणि निपाणी गावे इनाम मिळाली होती.मुराराव देसाई यांच्या थोरल्या पत्नीचा मुलगा म्हणजेच शिधोजीराव.यांचा जन्म इ.स.१७७४ साली झाला.अंगयष्टी पहिल्या पासूनच इतकी धिप्पाड आणि धष्टपुष्ट होती कि साधारण घोड्याला शिधोजीरावांची सवारी पेलवत नसे.त्यांची बंदूक आणि तलवार दुसऱ्या कुणाला झेपत नसे.

करवीरचे छत्रपती शिवाजी महाराज(दुसरे-कारकीर्द इ.स.१७६२ ते १८१३)यांची एक राणी आणि शिधोजीरावांची आई ह्या सख्ख्या बहिणी होत्या.त्यामुळे छत्रपतींकडे शिधोजीरावांचा नेहमी राबता असायचा.महाराजांनी पुत्र समजून त्यांना एकांड्या मानकरी मंडळीत स्थान दिले.शिधोजीराव पण महाराजांना पित्यासमान मान देत असत..असे सर्व काही ठीक चालले असताना अशी एक घटना घडली कि ज्यामुळे छत्रपती आणि शिधोजी आयुष्यभर परस्परांचे कट्टर वैरी होऊन शेवटी महाराजांना शिधोजीरावांच्या बंदोबस्तासाठी राज्याचे इंग्रजांच्या हातावर उदक सोडावे लागले.शिधोजीरावांचे लग्न गजेंद्रगडकर घोरपडे घराण्यातील एका मुलीबरोबर ठरले होते.हि सोईरीक छत्रपतीना पसंत नव्हती.त्यांनी ह्याच मुलीचा विवाह आपले सरदार हिम्मतबहादूर चव्हाण यांच्या मुलाशी ठरवला.त्यामुळे शिधोजीराव संतप्त होऊन त्यांनी लग्न करेन तर खुद्द छत्रपतींच्या मुलीबरोबरच अशी प्रतिज्ञा केली आणि इथपासून सुरु झाला शिधोजीराव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील सूडाचा,मानहानीचा,जीवघेणा रक्तरंजित प्रवास!

छत्रपतींशी भांडून शिधोजीराव करवीर गादीच्या जुन्या शत्रूला म्हणजे मिरजकर परशुरामभाऊ पटवर्धन यांना जाऊन मिळाले.शिधोजीरावांसारख्या बलशाली माणसाला पटवर्धनांनी लगेच सरदार पदी नियुक्ति दिली.पटवर्धनांकडे असताना शिधोजीरावानी करवीर राज्यावरील विविध चढायात करवीर फौजांना खूपच जेरीस आणले.त्यातील काही प्रमुख लढायांची,छत्रपतीना दिलेल्या त्रासाची थोडक्यात माहिती घेऊ.

(अ) आळत्याची लढाई- इ.स.१७९३ मध्ये पटवर्धन आणि करवीर फौजात झालेल्या लढाईत करवीर फौजांनी पटवर्धनांचा पराभव करून रामचंद्रपंत पटवर्धनांना कैद पण केले.रामचंद्रपंतांचे वडील परशुरामभाऊ यांनी आपल्या मुलाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा एकदा कोल्ह्पुरला वेढा घातला.ह्यावेळी मात्र करवीर फौजांचा पराभव होऊन त्यांना पटवर्धनांना दहा लाख रुपये देऊन तह करावा लागला.टिपू सुलतान मे १७९९ मध्ये ठार झाल्या नंतर लगेचच परशुरामभाऊ पटवर्धनांनी जुलै पासून दक्षिणेकडे निरनिराळी ठाणी काबीज करण्यास सुरुवात केली.यात कोल्हापूर राज्यातील चिकोडी,मनोळी यांसारखी काही ठाणी पण होती.परशुरामभाउंच्या ह्या अभियानात करवीर आणि पटवर्धन फौजांची गाठ पट्टणकुडी येथे सप्टेंबर १७९९ मध्ये पडून त्यावेळी झालेल्या लढायीत पटवर्धनांच्या सैन्याचा पराभव होऊन खुद्द परशुरामभाऊ त्यात मृत्यू पावले.त्यांच्या अकल्पित मृत्यूने उत्तर मराठेशाहीतील शूर,धाडसी,आणि युद्धकुशल सेनापती नाहीसा होऊन त्याचा पेशव्यांच्या दक्षिणेकडील सामर्थ्यावर विपरीत परिणाम झाला.पट्टणकुडीचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांसाठी(द्वितीय)त्यांच्या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतली सर्वात मोठी आणि भूषणास्पद घटना ठरली.

परशुरामभाउंच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांचा मुलगा रामचंद्रपंत यांनी पुण्याला जाऊन बाजीराव रघुनाथराव पेशवे,नाना फडणीस तसेच दौलतराव शिंदे यांना कोल्हापूरवर चढाई करण्यासाठी लष्करी साह्य करण्याची गळ घातली.दौलतरावांची संमती मिळताच संयुक्त फौजांनी जानेवारी १८०० मध्ये कोल्हापूरकडे कूच करून फेब्रुवारी १८०० रोजी टेंबलाई गाठले.छत्रपतींच्या फौजेत तोर्गलकर शिंदे,प्रतिनिधी,अमात्य,चतुरसिंग भोसले रायाजी जाधव इ.सरदारांच्या फौजा होत्या.दोन्ही पक्षांच्या दीड एक महिना विविध ठिकाणी लहानमोठ्या चकमकी झडत राहिल्या.ह्या सर्व घडामोडीं दरम्यान १३ मार्च १८०० रोजी नाना फडणीस निधन पावले.तर दुसरीकडे छत्रपतींनी सर्जेराव घाटगे ( दौलतराव शिंद्यांचे सासरे)यांच्या मार्फत दुसरे बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांच्याशी तहा संबंधी बोलणी सुरु केली.ह्या दोन्ही गोष्टी रामचंद्रपंत पटवर्धनांसाठी मारक ठरल्या.

दौलतराव शिंद्यांनी रामचंद्रपंतास कोल्हापूरचा वेढा ताबडतोब उठविण्यास कळविले.बाजीरावांनी यावर ताण करून सर्व पटवर्धन मंडळींस कैद करण्याचा हुकुम ब्राऊन ह्या शिंद्यांच्या पलटणीच्या इंग्रज अधिकाऱ्यास दिला.जासुदाच्या चुकीने हा हुकुम खुद्द रामचंद्रपंतांच्या हातात पडून ते सावध होऊन रातोरात वेढा उठवून निघून गेले.अशा घटना घडत गेल्याने पटवर्धनांच्या चाकरीत राहूनही शिधोजीरावांची करवीर छत्रपतींवर सूड उगविण्याची इच्छा मनाजोगती पूर्ण झाली नाही.नाना फडणीसांच्या मृत्यू(मार्च १८००) नंतर पुणे दरबारात दौलतराव शिंदे आणि त्यांचे सासरे सर्जेराव घाटगे यांचे महत्व अतोनात वाढले होते.धूर्त शिधोजीरावानी बदलत्या राजकीय वातावरणाचा अंदाज घेऊन पटवर्धनांची साथ सोडून देऊन बाजीराव(द्वितीय),सर्जेराव घाटगे आणि दौलतराव शिंदे यांच्याशी घरोबा केला.

(ब) सावगावची लढाई: पटवर्धनां पासून वेगळे झाल्यावर शिधोजीराव स्वतंत्रपणे लष्करी मोहिमा आखू लागले.सावंतवाडीच्या खेम्सावन्तांचे इ.स.१८०३ मध्ये निधन झाले.हे सुद्धा करवीर छत्रपतींच्या विरोधकांपैकी एक होते.वारसा युद्धात खेमसावंतांची पत्नी लक्ष्मीबाई भोसले यांनी छत्रपतींविरुद्ध शिधोजीरावांकडे मदत मागितली.बाजीराव रघुनाथ पेशव्यांचा यासंबंधीचा कल ओळखून शिधोजीरावानी मे १८०७ मध्ये मोठ्या प्रमाणावर अरबांचा समावेश असलेल्या प्रचंड फौजेनिशी कोल्हापूरवर स्वारी केली.कोल्हापूरकरांचा चिवट प्रतिकार आणि पावसाळा ह्या दोन्हीमुळे शिधोजीरावाना काही काळ माघार घ्यावी लागली.पावसाळा संपताच शिधोजीरावानी ऑक्टोबर १८०७ मध्ये पुन्हा एकदा मोठ्या तयारीनीशी कोल्हापूरकडे कूच सुरु केले.चिकोडी,मनोळी,कटकोळ आदि ठाणी काबीज करून बाजूच्या प्रदेशात एकच धुमाकूळ घातला.शिधोजीरावाना बाजीराव पेशवे(द्वितीय) यांचा पाठींबा असल्याने आजूबाजूचे छोटे मोठे सरदार पण शिधोजीरावाना मिळाले.करवीर फौजेचे नेतृत्व दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज(द्वितीय) करत होते.दोन्ही पक्षांची ४ फेब्रुवारी १८०८ रोजी सावगाव इथे समोरासमोर गाठ पडली.

कोल्हापूरचे सरलष्कर नारायणराव पाटणकर जे शिधोजींचे मावसभाऊ होते,ऐन युद्धात करवीर पक्ष सोडून शिधोजीरावाना जाऊन मिळाले.कोल्हापूरच्या तोफखान्याचे प्रमुख यशवंतराव घाटगे गोळा लागून जमिनीवर कोसळले.इतरही अनेक सरदार जखमी होऊन सैन्यात एकच गोंधळ माजला.शिधोजीरावांच्या फौजेने कोल्हापूर फौजेची प्रचंड कत्तल केली,दोन हजार शिपाई मरण पावले,दोन अडीच हजार जखमी झाले,कित्येक सैनिक,सरदाराना शिधोजीरावांच्या फौजेने कैद करून नेले.महाराजांचा जरीपटका,निशाणाचा हत्ती,डंका,तोफा आदि साहित्य शिधोजीरावांच्या हाती पडले.कोल्हापूर फौजेत झालेल्या पळापळीत शिधोजीरावांच्या काही घोडेस्वारानी छत्रपतींवर भाला फेकून त्यांना जखमी केले.तेवढ्यात रायाजी जाधव जपतनमुल्क यांनी मोठ्या शिताफीने आणि प्रसंगावधान राखून घोडा बाहेर काढून महाराजांना सुरक्षित ठिकाणी नेले.सावगावच्या लढाईचे वृत्त पुण्याला पेशव्यांना समजले. ` छत्रपतींचे रक्त भूमीस लागले,हि अतिशय वाईट गोष्ट झाली म्हणून पेशव्यांनी पुण्यात शांती करविली.`

शिधोजीरावानी नंतर छत्रपतींच्या सरदार,जहागिरदारांच्या मुलखात लुटालूट,जाळपोळ सुरु केली.शिधोजीरावांस आवर घालणे छत्रपतींच्या ताकदी बाहेर गेल्याने त्यांनी निरुपायाने बाजीराव पेशव्यांच्या मध्यस्थीने तहाची बोलणी सुरु केली.शिधोजीरावांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या प्रतिज्ञा पूर्तीसाठी–छत्रपतींच्या कन्येशी विवाह याहून अधिक अनुकूल वेळ दुसरी कुठली असणार होती? शिधोजीरावानी छत्रपतिं बरोबरच्या तहाच्या बोलण्यात उभय पक्षात सलोख्यासाठी छत्रपतींच्या कन्येचा विवाह आपल्या बरोबर करून देण्याची अट घातली.शिधोजीरावांची अपमानास्पद अट छत्रपतीना अजिबात मंजूर नव्हती.बाजीराव पेशवे,नारायणराव पाटणकर सरलष्कर आणि महाराणी सुंदराबाई ह्या सगळ्यांनी महाराजांचे मन वळविले आणि राजकन्या येसूबाई हिचा शिधोजीरावांबरोबर राक्षस विवाह कोल्हापूर इथे २१ जून १८०८ साली पार पडला.विवाहाच्या दिवशी शिधोजीराव निपाणकर सर्व फौजफाटा,लवाजमा घेऊन कोल्हापुरात आले होते.लग्नात छत्रपतींकडून दगा फटका होईल अशी भीती वाटल्याने अक्षता डोक्यावर पडताच न जेवता नववधूला घेऊन तडक निपाणी गाठली.

(क) कोल्हापूर राज्याचे सार्वभौमत्व गमवावे लागले: इ.स.१८०९ साली कोल्हापूर गादीचे कारभारी रत्नाकरपंत राजाज्ञा यांना अंतर्गत कारणांस्तव घरी बसवले गेले तर पराक्रमी सरदार प्रीतीराव चव्हाण सावगाव लढाईत झालेल्या जखमांमुळे इ.स.१८१० मध्ये मृत्यू पावले. छत्रपतींचा जामात झाल्यानंतर सुद्धा शिधोजीरावांच्या पूर्वीच्या मानसिकतेत काही बदल घडला नाही.त्यांनी ह्या संधीचा फायदा घेऊन करवीर राज्याला त्रास देण्याचा आपला पूर्वीचा उद्योग चालूच ठेवला.सर्जेराव घाटगे ,यशवंतराव घाटगे,बाजीराव पेशवे यांचा पाठींबा असल्याने तसेच इंग्रजांच्या तटस्थ राहण्यामुळे काही तरी निमित्त,कुरापत काढून ते करवीर राज्यात घुसून नुकसान करीत असत.इ.स.१८११ मध्ये शिधोजीरावनी पुन्हा कोल्हापूरवर आक्रमण केले.नेहमी प्रमाणे ह्यावेळी पण कोल्हापूर फौजेत फितुरी होऊन कोल्हापूरकरांचा पराभव झाला.

शिधोजीराव कोल्हापूरकरांच्या पाच तोफा आणि १२०० माणसे घेऊन निपाणीला परतले.कोल्हापूर राज्याचा जेवढा प्रदेश बळकावता आला तेवढा त्यांनी बळकावला.ह्या वेळेपर्यंत शिधोजीराव दहा बारा लाखांचा सरंजाम असलेला मोठा सरदार बनले होते.शिधोजीरावांचा बंदोबस्त करणे अवघड होऊन बसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांना(द्वितीय)इंग्रजांची मदत घेण्याशिवाय दुसरा मार्ग राहिला नाही.दुसऱ्या बाजीराव पेशव्यांबरोबर ३१ डिसेंबर १८०२ रोजी झालेल्या वसईच्या तहानंतर इंग्रजांना सिंधुदुर्ग वगळता जो कोल्हापूर राज्यात होता,पश्चिम किनाऱ्यावर रान मोकळे झाले होते.शिधोजीरावांचा बंदोबस्त करण्याचे इंग्रजांनी मान्य करून ८ ऑक्टोबर १८१२ रोजी छत्रपती आणि इंग्रज ह्यांच्यात तह झाला.ह्या तहान्वये छत्रपतींनी चिकोडी आणि मनोळी ह्या त्यांच्या राज्यात असलेल्या पण शीधोजीरावानी बळकावलेल्या महालांवरील हक्क सोडून दिला,मालवण बंदर आणि त्याच्या परिसरातील सिंधुदुर्ग,राजकोट,पद्मगड आणि सर्जेकोट हि ठिकाणे इंग्रजांना देऊन टाकली,इंग्रजांचा सल्ला घेतल्याशिवाय परकी सत्तेशी लढाई न करण्याचे,कोठेही आरमार/लढाऊ जहाज न ठेवण्याचे मान्य केले.हा तह झाल्यांनतर सहा महिन्यांनी छत्रपतींचे निधन झाले.(शिधोजीराव अप्पासाहेब नाईक निंबाळकर)

शिधोजीरावांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांबरोबर केलेल्या तहाने करवीर राज्याचे सार्वभौमत्व संपुष्टात आले.

इंग्रजांनी बाजीराव पेशव्यांकडे शिधोजीरावांची भलामण केल्याने त्यांना पेशव्यांचे सरलष्कर पद देण्यात आले.इंग्रज आणि मराठे यांच्यात खडकी इथे झालेल्या लढाई पासून शिधोजीरावानी इंग्रजांशी आतून संधान साधून पेशव्यांकडील बित्तंबातमी एल्फिन्स्टनकडे पोचवल्या.बाजीराव पेशव्याचे इंग्रजांना शरण जाण्यासाठी मन वळविणारे पण शिधोजीरावच होते.बाजीराव इंग्रजांना शरण जाईपर्यंत शिधोजीराव त्यांच्या लवाजम्यात होते.याची बक्षिशी म्हणून इंग्रजांनी त्यांस तब्बल पन्नास लाख रुपये दिले.

इंग्रजांनी त्यांचं संस्थान जप्त करण्याची धमकी शिधोजीरावानी एकवीस लग्न केली पण एकीपासून सुद्धा पुत्रलाभ झाला नाही.

त्यांना फेफऱ्याचा विकार जडला.शिधोजीराव नाईक निंबाळकर उर्फ अप्पा निपाणीकरांचे इ.स.१८३९ मध्ये वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचा सरंजाम सरकारजमा करण्याचे इंग्रजांनी त्यांच्या हयातीतच ठरविले होते,त्यानुसार सरंजाम जप्त करण्यात आला.अशा प्रकारे शूर,धाडसी,पराक्रमी शिधोजीराव कोल्हापूर राज्यासाठी मारक ठरले तर इंग्रजांसाठी साहाय्यक ठरले.

संदर्भ:१-करवीर रियासत ले.स.मा.गर्गे
२-मंतरलेला इतिहास ले.हर्षद सरपोतदार
३-मराठी रियासत खंड ८—ले.गो.स.सरदेसाई
४-पेशवे-ले.श्रीराम मराठे.
५- छायाचित्र : पै पृथ्वीराज माने सरकार यांची ऐतिहासिक वाडे व गढी यातील post

#प्रकाश लोणकर.

Leave a Comment