मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग १७

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 1
2 Min Read

मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग १७ –

धर्मसंवर्धन करणाऱ्या छत्रपतींच्या मुद्रा आणि ‘पंडितराय’ पदाची स्थापना – महाराष्ट्रावर परकीय आक्रमणे झाली आणि यादव घराण्याची सत्ता लयाला गेली. त्याकाळानंतर महाराष्ट्रात धर्माचा ऱ्हास होऊ लागला, परकीय आक्रमकांच्या जुलुमामुळे हिंदू धर्माचे आचार-विचार आणि परंपरा धोक्यात आल्या होत्या. अशा अंधकारमय काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला आणि त्यांनी या लोप पावलेल्या धर्माचे पुनरुज्जीवन केले!
​समर्थ रामदास स्वामी म्हणूनच छत्रपतींचे वर्णन करताना म्हणतात –

“धर्म रक्षी यैसा नाही |महाराष्ट्रधर्म राहिला तुम्हा करिता |”
​
अष्टप्रधानातील ‘पंडितराय’ पदाचे महत्त्व
​महाराष्ट्रीय समाजाची बिघडलेली धार्मिक घडी पुन्हा बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात ‘पंडितराय’ हे महत्त्वाचे पद निर्माण केले.
​कानूजाबित्यानुसार पंडितरायांची कामे – धर्म आणि अधर्माचा निवाडा करणे. शिष्टांचा सन्मान करणे आणि आचार-व्यवहार ठरवणे. धार्मिक प्रायश्चित्त पत्रांवर आपली संमती (स्वाक्षरी/चिन्ह) देणे.
​
छत्रपती शाहू महाराजांच्या काळात राजेश्री मुद्गलभट बिन मल्हारभट राजपुरोहित हे पंडितराय या पदावर अधिष्ठित होते.
​
छत्रपती राजाराम महाराजांची मुद्रा आणि धर्मरक्षक
​संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर औरंगजेब संपूर्ण महाराष्ट्र गिळंकृत करण्यासाठी आणि मंदिरे-धार्मिक स्थळे उध्वस्त करण्यासाठी दक्षिणेत उतरला. महाराष्ट्रावर आलेल्या या अभूतपूर्व संकटाच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली.
​छत्रपती राजाराम महाराजांची मुद्रा –

“श्री धर्मप्रद्योतिता शेषवर्णा दशरथेरिव राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते”
​
अर्थ – ज्याप्रमाणे रामराज्यात सर्व वर्णांचे लोक धर्माला प्रकाशित करत होते, त्याचप्रमाणे ज्यांच्या राज्यात सर्व लोक धर्माचा प्रकाश पसरवत आहेत, अशा दशरथपुत्र रामासारख्या छत्रपती राजाराम महाराजांची ही मुद्रा सर्व विश्वाला वंदनीय आहे.
​
​त्या काळात संपूर्ण मराठी समाजात छत्रपती राजाराम महाराज हे प्रभू श्रीरामांचाच अवतार आहेत अशी श्रद्धा निर्माण झाली होती.
​
सन १६९४ मध्ये मोरो रायाजी पारपत्यगार या अधिकाऱ्याने छत्रपती राजाराम महाराजांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते:
​
“स्वामी अवतारी त्या अवतरे बिबीशनाची स्थापना जाहली तो चिरंजीव जाहला तोच हा अवतार दुष्टांचा संहार धर्माची स्थापना होत आहे.”
​
यावरून स्पष्ट होते की, औरंगजेबाविरुद्ध मराठ्यांनी पुकारलेला संघर्ष हा केवळ सत्तेचा नव्हता, तर तो ‘धर्मस्थापना आणि धर्मरक्षणाचा’ एक महान लढा होता!
​
संदर्भ –
१) ऐतिहासिक पुरुषांच्या मुद्रांचे प्रदर्शन(पृ.१४६ ते १४९)
२) अर्वाचीन महाराष्ट्रेतिहास काळातील राज्यकारभाराचा अभ्यास (पृ. २१५ ते २१८.)

राम वाघोले

Leave a Comment