मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग १५ –
देशमुखांचे शिक्के – स्वरूप, महत्त्व आणि ऐतिहासिक संदर्भ – मराठेशाहीच्या मुलकी प्रशासनात आणि न्यायव्यवस्थेत ‘देशमुख’ या वतनदाराचे स्थान अत्यंत महत्त्वाचे होते. परगण्याच्या वतनदारांमध्ये देशमुख हा सर्वोच्च वतनदार मानला जाई. देशमुखांचे अधिकार, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या शिक्यांचे (मुद्रा) स्वरूप यावरून तत्कालीन सामाजिक आणि प्रशासकीय रचनेवर मोठा प्रकाश पडतो.
१. देशमुखांचे स्वरूप आणि प्रशासकीय भूमिका –
राजाच्या आश्रयाने आणि सुभेदाराच्या सोबतीने परगण्याचा महसूल (वसुली) गोळा करण्याचे मुख्य काम देशमुखांकडे असे. ते एक प्रकारे राजाच्या मुलकी कारभाराचे प्रतिनिधी म्हणूनच काम करत.
परगण्यातील देशमुखांच्या जोडीने मुलकी कारभार चालवण्यासाठी देशपांडे, नाडगौडा, देश चौगुला, नायकवडी तसेच गावपातळीवर पाटील आणि कुलकर्णी इत्यादी वतनदार काम करत असत.
जनतेची भरभराट आणि शेतीसाठी सर्व जमीन लागवडीखाली आणून प्रजेची भरभराट करणे हे देशमुखाचे मुख्य कर्तव्य होते.
२. देशमुखांच्या शिक्यांची वैशिष्ट्ये व ‘नांगर’ हे प्रतीक –
देशमुखांच्या शिक्यांचा अभ्यास केला असता त्यांची काही खास वैशिष्ट्ये दिसून येतात.
केवळ नामनिर्देश – हे शिक्के बहुतेक सर्व ‘निव्वळ नामनिर्देश करणारे’ असत. नामनिर्देशाव्यतिरिक्त अधिक कोणताही भाव वा मजकूर या शिक्यांमध्ये दिसत नाही.
देशमुखांच्या शिक्यांवर “शिवचरणी तत्पर”, “शाहू चरणी तत्पर” किंवा आदिलशाही/निजामशाहीच्या काळात असूनही “बंदे निजामशाही” असा कोणताही उल्लेख आढळत नाही.
बहुतांश देशमुखांच्या शिक्यांवर फक्त ‘नांगर’ हीच निशाणी कोरलेली दिसते.
जमिनीची किर्द (लागवड) सुरू करण्यासाठी रयतेला नांगर आणि बैल देऊन शेतीस प्रवृत्त करणे हे देशमुख व पाटलांचे मुख्य काम होते.
नांगर हे त्यांच्या मूळ व्यवसायाचे आणि कृषी संस्कृतीचे प्रतीक मानले जाई.
व्यवसायाचे चिन्ह म्हणून नांगराचा वापर केला जात असे. वतनदारांमध्ये श्रेष्ठ वतनदार असल्याने देशमुखाला शिक्क्याचा व शिक्क्यातील मजकुरात नांगर कोरण्याचा अधिकार होता, तर पाटलाच्या नावापुढे हाताने ‘निशाणी नांगर’ असे लिहिण्याची पद्धत होती.
अपवाद –
काही देशमुखांच्या शिक्यांवर नांगराचे चिन्ह आढळत नाही.
फलटणचे निंबाळकर देशमुख: त्यांना ‘नाईक’ ही पदवी होती आणि सुरवातीला हा परगणा त्यांच्याकडे ‘मोकासा’ (जहागीर) म्हणून होता, त्यानंतर देशमुखी मिळाली.
इतर घराणी पाहीली तर मलवडीचे घाटगे आणि मसुरचे जगदाळे देशमुख यांच्या शिक्यांवरही नांगराचे चिन्ह दिसत नाही.
३. प्रशासकीय मान्यता आणि शिक्क्याचे महत्त्व –
राजदरबारात ज्या पातीकडे (शाखेकडे) शिक्के असत, त्या पातीला ‘शिक्केकरी’ म्हटले जाई आणि दरबारात त्यांनाच
देशमुखाचा मुख्य मान मिळे.
दस्तऐवजांची वैधता – परगण्यातील निवाड्यासंबंधीच्या ‘महजर पत्रांवर’ किंवा इतर कागदपत्रांवर देशमुखाचा शिक्का असणे अनिवार्य होते. देशमुखाचा शिक्का नसल्यास ते कागदपत्र कायदेशीर किंवा प्रमाण मानले जात नसत. (ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड १६ पृ. १७ पायगुडे देशमुख हकीकत)
उदाहरण (इ.स. १ ऑगस्ट १७७४) –
नारायणराव पेशवे यांच्या कारकीर्दीत वाल्हे गावचे वाल्हेकर (पवार ) आणि फलटणचे नाईक निंबाळकर यांच्यात पाटीलकीचा वाद झाला.
निंबाळकरांनी सादर केलेल्या पुराव्यांमध्ये गोत पंचायतीला दोष आढळले.
त्या महजर पत्रात मोरो महादेव देशमुख आणि बावाजी शिवदेव देशपांडे यांच्यामार्फत करार लिहिल्याचा उल्लेख होता, पण तपासात ते दोघे वतनदार नसल्याचे निष्पन्न झाले.
मुख्य म्हणजे, कागदपत्राच्या शेवटी देशमुखाचा मान्यतादर्शक शिक्का आणि ‘बी-कलम’ हा शेरा नव्हता. त्यामुळे गोत सभेने तो पुरावा पूर्णपणे नाकारला.
४. ऐतिहासिक निवाडा आणि छत्रपती शाहू महाराजांची देशमुख म्हणून उपस्थिती –
इ.स. १७२७ रोजी इतिहासातील प्रसिद्ध अत्रे व पुरंदरे यांच्या वतनाच्या वादावरून गोतांच्या निर्णयसभेत खुद्द छत्रपती शाहू महाराज, त्यांचे अष्टप्रधान मंडळ (सरकारकून मंडळी) आणि विविध परगण्यांचे वतनदार उपस्थित होते.
या सभेत छत्रपती शाहू महाराज राजा म्हणून नव्हे, तर ‘राजमुद्राधिकारी’ (गोतवतनदार) या नात्याने ‘देशमुख’ वतनदार म्हणून उपस्थित होते.
या पत्रावर शाहू महाराजांचे दोन शिक्के आहेत.
हे शिक्के अष्टप्रधानांच्या वरती नसून, जिथे देशमुख मंडळींचे शिक्के आहेत तिथे खालीलप्रमाणे नोंदवले आहेत:
“राजेश्री शाहूजीराजे भोसले देशमुख प्रांत वाई”
”राजेश्री शाहुजीराजे भोसले देशमुख प्रांत कराड”
विशेष म्हणजे, छत्रपती शाहू महाराजांच्या या दोन्ही देशमुखीच्या शिक्यांवरही ‘नांगर’ हेच चिन्ह कोरलेले आहे. यावरून देशमुखाच्या शिक्यातील नांगराचे स्थान आणि त्याचे महत्त्व अधोरेखित होते. (पुरंदरे दफ्तर भाग – १ ले. ८९ पृ.५९ )
राम वाघोले
