मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग १०

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 3
3 Min Read

मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग १० –

पेशवेकालीन प्रधान शिक्यांतील उलटा “न” – छत्रपती शाहू महाराजांचे पहिले प्रधान बहिरोपंत पिंगळे हे होते. ते अटकेत पडल्यावर प्रधानपद बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे आले. या दोन प्रधानांच्या शिक्यांचे परीक्षण केल्यास एक विशिष्ट फरक दिसून येतो तो म्हणजे,
पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या शिक्यातील ‘प्रधान’ या शब्दातील शेवटचे “न” हे अक्षर उलटे कोरलेले आहे. शिक्का कागदावर उमटवल्यावर सगळी अक्षरे सुलटी दिसतात, पण केवळ “न” हे अक्षर उलटे दिसते. पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यापासुन पुढे सर्व पेशव्यांच्या खासा शिक्क्यातील प्रधान या शब्दांतील “न” हे अक्षर उलटेच आहे.

संशोधकांचे पहिले मत आणि संदर्भ –
घराण्यांतील बदल दर्शवणे – थोरल्या शाहू महाराजांच्या कारकीर्दीत आधी पिंगळे घराण्याकडे पेशवाई होती. ती नंतर श्रीवर्धनकर भट घराण्याकडे आली आणि बाळाजी विश्वनाथ यांची पेशवे पदावर नियुक्ती झाली. हा घराण्यांतील बदल दर्शवण्यासाठी शाहू महाराजांनी मुद्दाम “न” हे अक्षर उलटे उठावे असे ठरवले, असे एक मत संशोधकांनी मांडले आहे.
संदर्भ – गो. स. सरदेसाई, य. मा. काळे व व्ही. एस. वाकसकर यांनी संपादित केलेल्या ‘काव्येतिहास संग्रहात’ प्रसिद्ध झालेली ऐतिहासिक पत्रे, लेखांक ३७८.
परंतु, या मताला कोणताही ठोस आधार मिळत नाही. कारण पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई मिळाल्यापासूनच प्रधानाच्या शिक्यांचे दोन प्रकार अस्तित्वात होते.

१. खासा शिक्का (मुख्य शिक्का) –
हा खुद्द पेशव्यांचा शिक्का होता. राजधानीच्या ठिकाणी, राजदरबारातील कचेरीमध्ये महत्त्वाच्या कागदांवर पेशव्यांच्या समक्ष आणि त्यांच्या परवानगीनेच हा शिक्का उमटवला जात असे. या खाश्या शिक्क्यातीलच प्रधान या शब्दातील “न” हे अक्षर उलटे असत.
२. मुतालकी शिक्का (दुय्यम शिक्का) –
हा दुय्यम प्रतीच्या किंवा स्वारीतील कागदांवर उमटवला जाई. त्या काळात बराच राज्यकारभार हा मुलूखगिरीतून (स्वारीतून) चालत असे. या दृष्टीने दूरवरच्या प्रांतात विशिष्ट काळासाठी आणि विशिष्ट भागासाठी ‘नामजात अंमलदार’ (Special Appointed Officers) नेमले जात. त्यांना प्रसंगानुरूप अधिकार दिले जात आणि त्यांनी वापरण्यासाठी दिलेला शिक्का म्हणजेच ‘मुतालकी शिक्का’ होय. या मुतालकी शिक्क्यातील प्रधान या अक्षरातील “न हे अक्षर मात्र सरळच असत.

खासा आणि मुतालकी शिक्यांमधील सूक्ष्म फरक –
अक्षरांचे वळण – मुतालकी शिक्का आणि खासा शिक्का यांमधील अक्षरांच्या वळणात, तसेच र्‍हस्व-दीर्घात अतिशय सूक्ष्म फरक असायचा. कारभाराच्या व्यवस्थेच्या दृष्टीने एखादे पत्र मूळ राजधानीच्या ठिकाणचे आहे की स्वारीच्या ठिकाणचे, हे केवळ या अक्षरांच्या फरकावरून सहज ओळखता येत असे.
संदर्भ – नाना फडणवीस शकावली, पृष्ठ २०.

या विधानाला पूरक असणारा दुसरा ऐतिहासिक आधार –
पेशवाईतील ‘साडेतीन शहाण्यांपैकी’ अर्धे शहाणे मानले गेलेले बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस यांच्या शिक्यावरूनही हे सिद्ध होते.
शिक्यातील मजकूर – नाना फडणवीसांच्या शिक्यामध्ये
“श्री शिवचरन लिननिरत जनार्दन सुत बाळाजी पंडीत”
असा मजकूर आहे. हा पाच ओळींचा एक गोलाकार शिक्का आहे.
सूक्ष्म बदल – या शिक्यातील शेवटच्या ‘पंडित’ या शब्दातील “प” हे अक्षर उलटे कोरलेले आहे, तर “डी” हा दीर्घ लिहिलेला आहे.
निष्कर्ष – यावरून हे स्पष्ट होते की, खासा (मुख्य) आणि मुतालकी (दुय्यम) शिक्यांमधील फरक चटकन लक्षात यावा, म्हणूनच खाशाच्या शिक्यात एखादे अक्षर उलटे किंवा एखाद्या अक्षराच्या र्‍हस्व-दीर्घात असा सूक्ष्म बदल मुद्दाम कोरलेला असायचा.

संदर्भ – नाना फडणवीस शकावली, पृष्ठ २१.

राम वाघोले

Leave a Comment