महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,98,953

बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस

By Discover Maharashtra Views: 4093 5 Min Read

बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस

नाना फडणवीस यांची माहिती

बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस (फेब्रुवारी १२, इ.स. १७४२; सातारा, महाराष्ट्र – मार्च १३, इ.स. १८००; पुणे, महाराष्ट्र) पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात.

नाना फडणवीस यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. नानांचा जन्म फेब्रुवारी १२, इ.स. १७४२ रोजी सातारा येथे झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.

आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.

थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रूळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात मार्च १३, इ.स. १८०० रोजी त्यांचा अंत झाला. वाई येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे.नाना फडणवीस यांची माहिती.

नाना फडणवीस यांची नऊ लग्ने झाली होती; शिवाय त्यांना दोन रखेल्या होत्या. नानांचे पहिले लग्न दहाव्या वर्षी झाले; या स्त्रीचे नाव यशोदाबाई. नानांच्या नऊ बायकांपैकी सात त्यांच्या हयातीत वारल्या; नाना वारले तेव्हा त्यांची आठवी पत्‍नी बगाबाई व नववी जिऊबाई या देवसेवेसाठी सिद्धटेकला होत्या; त्यांना ही बातमी समजताच त्या पुण्यास येण्यास निघाल्या. वाटेत त्यांना ताब्यांत घेण्यासाठी पेशव्यांनी फौज पाठविली. परंतु तिला या बायकांच्या सोबत असलेल्या अरबांनी हुसकावून दिले, असे मॅकडोनल्ड म्हणतो. या स्त्रिया पुण्यास आल्यावर बगाबाई नानांच्या पश्चात चौदा दिवसांनी वारली. जिऊबाईचे वय यावेळी नऊ वर्षांचे होते. तिने नानांनी अर्धवट ठेवलेले भीमाशंकराचे देऊळ बांधून पुरे केले.

रावबाजीच्या म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या स्वभावाचा धसका नाना फडणवीस यांच्या जिऊबाई या पत्नीनेही घेतला होता. नाना गेल्यावर या बाजीरावाने नानांच्या अरबांचा पगार चुकता करून नानांचे वाडे, जहागीर व इनामी गावे जप्त केली. नानांजवळील अफाट संपत्ती हाती येण्यासाठी जिऊबाईस शनवारवाड्यात आणून ठेविले. दौलतराव शिंद्याचीहि त्या संपत्तीवर दृष्टी असल्याने, त्याने बाईस दत्तक देऊन आपल्या ताब्यात देण्याबद्दल पेशव्यांस विनंती केली, पण पेशव्यानी ती नाकारली, आणि नानांचा पक्का सूड उगवला.

यानंतर नानांच्या पक्षाच्या सर्व मंडळींस पेशव्यानी प्रतिबंधात ठेविले. यशवंतराव होळकराने पुणे जाळले, तेव्हा रावबाजी पळून गेले होते. तेव्हा जिऊबाई वाड्यातच होती. नानांचा व आपल्या घराण्याचा पूर्वापार संबंध जाणून यशवंतरावाने बाईस लोहगड (हा किल्ला नानांस सरकारांतून बक्षीस मिळाला होता) किल्ल्यावर नानांचा विश्वासू नोकर धोंडोपंत नित्सुरे याच्या स्वाधीन केले. नानांचा मुख्य खजिना तेथेच असे.

पुढे दोन वर्षांनी जनरल वेलस्लीने मध्यस्थी करून बाजीरावाकडून बाईस दरसाल बारा हजारांची नेमणूक करून देऊन पेशव्यांच्या आग्रहावरून बाईस लोहगड किल्ला सोडावयास लावला. पुढे बाजीराव इंग्रजांच्या मदतीने पुन्हा पुण्यात आला. तेव्हा इंग्रजांनी जिऊबाई यांस पुण्यात येण्यास सुचवले. पण बाजीराव याची खोड फार वाईट आहे. त्यामुळे माझी पुण्यात रहाण्याची इच्छा नाही असे तिने सांगितले. तेव्हा इंग्रजांनी बाजीरावास तिला महिना हजार रुपये देण्यास सांगून तिला पनवेलला ठेवले व सुरक्षेसाठी स्वतःचे सैन्य ठेवले. पुढे बाजीराव बिठूरला गेल्यावर तिला वाद, बेलबाग संस्थान व मेणवली गाव इनाम दिले. हजार रुपये पेन्शन सुरूच ठेवली. यानंतर शेवटपर्यंत ती मेणवली येथे राहिली. नंतर बाई इंग्रजांच्या आसऱ्याने पनवेलास पेशवाई नष्ट होईपर्यंत राहिली. पेशव्यांनीं तिला आपल्या ताब्यांत आणण्याची फार खटपट केली, पण ती त्यांच्याकडे आली नाही.

इंग्रजी राज्य झाल्यावर एलफिन्स्टनने बाईस पुण्यास आणून वार्षिक हजारांची नेमणूक कायम करून, बेलबाग संस्थान व मेणवली गाव जप्तीतून मोकळे केले. नंतर बाई मेणवलीस जाऊन राहिली. तिने इ.स. १८२७ मध्ये मिरजेच्या गंगाधरराव भानू नावाच्या मुलास इंग्रजांच्या संमतीने दत्तक घेऊन त्याचे नाव माधवराव ठेविले व त्यास आपली बारा हजारांची नेमणूक, बेलबाग संस्थान व मेणवलीची वहिवाट मिळावी म्हणून फार खटपट केली; परंतु इंग्रजांनी तिचे काही एक ऐकले नाही. अखेर इसवी सन १८५४ च्या मार्चमध्ये जिऊबाई वारली. ती शहाणी व सदाचरणी असून तिने अखेरपर्यंत नानांचे नांव निष्कलंक राखिले. बाई वारल्यावर तिची नेमणूक इंग्रजांनी बंद केली.

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a Comment