सुभेदार पिलाजीराव जाधवराव !!!
१) सुभेदार पिलाजीराव जाधवराव हे राजे लखुजीराव जाधवराव यांचे द्वितीय पुत्र राजे अचलोजीराव जाधवराव यांचे वंशजशाखेपैकी राजे देवराव यांच्या आडगाव राजा या वंशजशाखेतील आहेत.
२) सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांच्या आजोबांचे नाव पिलाजीराव बीन रामराव जाधवराव होते. सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांच्या पित्याचे नाव चांगोजीराव /चांदोजीराव बीन पिलाजीराव जाधवराव असुन मातेचे नाव हंसाई होते..श्रीशके १५९० पिलाजी जाधव मोकदम मौजे वाघोली. पुढे चांगोजीरावांकडे वाघोलीच्या पाटीलकीचे वतन चालत आले होते. वाघोली या गावचा मोकासा सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांचे खापर पणजोबा विठोजीराव जाधवराव यांच्या कडे असल्याचे एक पत्र शाहु दप्तरातुन नुकतेच प्राप्त झाले आहे. वाघोली हे गाव या घराकडे परंपरागत चालत आलेले गाव असल्याचे स्पष्ट होते.
३) सुभेदार पिलाजीराव जाधवराव हे इ सन १७५१ साली वयाच्या ७१ व्या वर्षी वारले…म्हणजे त्यांचे जन्मसाल इ सन १६८० धरण्यास हारकत नाही .
४) पिलाजीराव जाधवराव यांचे पणजोबा रामराव जाधवराव हे छत्रपती संभाजी महाराज यांचे सरदार होते.
५) तसेच सर्वात महत्त्वाचे, पिलाजीराव जाधवरावांनी मलजी पाटील मांजरीकरास भगवंतराव चिंचवेकराच्या जमानतीसंबंधी दादो बल्लाळ यांजकडून मिळालेल्या ऐवजाबद्दल २१ डिसेंबर १७०२ ला लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे… यावरुनही पिलाजीरावांचे राज्यकाराभारातील स्थान फार आधीपासुनचे होते हेच स्पष्ट होते.
६) पुढे इ सन १७०८ साली छत्रपती थोरले शाहु महाराजांच्या सुटकेसमयी जे सरदार गेले होते त्यात पिलाजीराव जाधवराव यांचा समावेश होता…याची आठवण ठेवून खुद्द छत्रपती थोरले शाहु महाराजांनी दिवे घाटावर एक चाहुर जमीन इनाम केली..त्यानंतर पिलाजीराव जाधवराव यांनी इ सन १७१० सालीच जाधववाडी येथील भुईकोट किल्ले वजा गढी बांधुन तेथे राहवयास गेले . विशेष यासमयी खुद्द बाळाजी विश्वनाथ यांना देखील पुण्यात राहण्यासाठी अशी गढी नव्हती… म्हणजे यावरून या काळातील पिलाजीराव जाधवराव यांचे छत्रपती थोरले शाहु महाराजांच्या दरबारातील स्थान स्पष्ट होते… मग या पिलाजीरावाना कोणाच्या सेवेत काम करण्याची गरजच नव्हती … कारण ते त्यासमयी सक्षम सरदार होते…
७) विशेष छत्रपती थोरले शाहु महाराजांच्या विरोधात सुरुवातीच्या काळात ज्या ज्या सरदारांनी बंडाळ्या केल्या त्यापैकी रंभाजी निंबाळकर, दमाजी थोरात, चंद्रसेन जाधवराव , उदाजी चव्हाण आदी सरदारांच्या बंडाळ्या मोडुन काढण्याचे महत्तम कार्य खुद्द सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांनीच केले… यावरुन इ सन १७१०-१७१८ या काळातील त्यांचे स्थान स्पष्ट होते… तसेच याच काळात सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांनी मराठा साम्राज्याचे तिसरे प्रधान थोरले बाजीराव व त्यांचे बंधु चिमाजी अप्पा यांना युद्धकलेचे प्रशिक्षण दिले आहे… या काळातील त्यांचे हे कार्य लक्षात घेता ते कोणाच्या सेवेत असतील याची कसलीच शक्यता दिसत नाही व तसा स्पष्ट उल्लेख उपलब्ध नाही.
८) इ सन १७१८-१९ च्या खुद्द छत्रपती थोरले शाहु महाराजांनी आखलेल्या सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली मोहिमेत पिलाजीराव जाधवराव यांचा समावेश होता.
९) इ सन १७१८ साली दमाजी थोरात रुस्तुमराव यांनी छत्रपती थोरले शाहु महाराजांच्या विरोधात तिसरी बंडाळी केली तेव्हा पिलाजीरावांनी हिंगणगावावर स्वारी करून त्यांचा पुरता मोड करून त्यांना कैद करून शाहु महाराजांपुढे आणले व त्यांना पुरंदरवर कैदेत ठेवले. पिलाजीरावांच्या या कर्तृत्वशक्तीवर संतुष्ट होऊन छत्रपती थोरले शाहु महाराजांनी त्यांना ” पुणे प्रांती,मौजे दिवे हे गाव व मौजे नांदेड येथील स्वराज्य अमंल इनाम दिला.”
९) येथे सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांची सुरुवातीच्या काळातीलच थोडक्यात माहिती मांडली आहे…
१०) तसेच छत्रपती थोरले शाहु महाराजांच्या कार्यकाळात सुभेदार पद असणारे फक्त दोन पराक्रमी व्यक्ती होते * सुभेदार पिलाजीराव जाधवराव व दुसरे सुभेदार मल्हारराव होळकर.
मराठा साम्राज्याचे विस्तारक छत्रपती थोरले शाहु महाराज यांचे खाजगी सल्लागार, मराठा साम्राज्याचे परराष्ट्रमंत्री (शत्रु हारल्यानंतर वाटाघाटी व तह करणारे ), मराठा साम्राज्याचे प्रधान थोरले बाजीराव यांचे युद्धकलेतील गुरु व हुजुराती तुकडीचे कायम नेतृत्व करणारे सुभेदार पिलाजीराव जाधवराव
