महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,68,569

सरदार उदाजीराव चव्हाण

By Discover Maharashtra Views: 2959 5 Min Read
Source - Wikipedia

सरदार उदाजीराव चव्हाण –

उदाजीचा आजा राणोजी चव्हाण हा मालोजी घोरपड्याजवळ चाकरीस होता. राणोजी लढाईंत पडल्यावर त्याचा मुलगा विठोजी यास मालोजीनेंच वाढविलें. मालोजीच्या मृत्यूनंतर विठोजी चव्हाणसंताजी घोरपडे यांनीं बादशहाच्या तंबूवर छापा घालून सोन्याचे कळस काबीज करून आणिले (म. रि. पू. ६२७). त्यावेळीं हिंमतबहाद्दर हा किताब विठोजीस मिळाला. तेव्हांपासून विठोजी रामचंद्रपंताच्या हाताखालीं असे. इ. स. १६९६ सालीं कर्नाटकांत युद्ध चालू असतां विठोजी मारला गेला. नंतर त्याचा पुत्र सरदार उदाजीराव चव्हाण यास हिंमतबहाद्दर पदाचीं वस्त्रें मिळालीं. उदाजीहि पूर्वजांसारखाच पराक्रमी असून यावेळीं ताराबांईच्या पक्षांत जाऊन शिरोळ, रायबाग, विजापूर, एवढ्या टापूंत दंगा करीत होता. शाहूला तो बंडखोर वाटे. परंतु संभाजीचा तो केवळ मुख्य साह्यकर्ता होता. त्यास प्रथम रामचंद्रपंत अमात्यानें वाढविलें. तो बलाढ्य व पुंडं असून त्याच्याच आधारावर संभाजीनें शाहूशीं थोडीबहुत धडपड चालविली होती तेव्हां बाजीरावानें त्यास चांगलें धाकांत ठेविलें.

इ. स. १७२९ त बाजीराव व चिमाजी आपा दोघेहि बाहेर गेलेले पाहून उदाजी चव्हाणानें वारणेच्या तीरीं येऊन मुलूख लुटण्यास आरंभ केला. शिरवळच्या ठाण्यांत राहून बाहेरच्या मुलखास तो उपद्रव देऊं लागला. एके दिवशीं शाहू त्या बाजूस शिकारीस गेला असतां, चव्हाण जवळच आसपास आहे असें कळलें. त्यावरून अभय देऊन शाहूनें त्यास भेटीस बोलाविलें. भेट होऊन तो परत गेला. पुढें एके दिवशीं शाहूला मारण्यासाठीं आलेले चार मारेकरी जंगलांत भेटले. चव्हाणाकडून किंवा संभाजीकडून ते आले होते असें कळलें. तेव्हां संभाजीचें व चव्हाणाचें पारिपत्य करण्याचा विचार करून शाहूनें त्यासाठीं मोठी तयारी केली. सर्वांस पत्रें लिहून मोहिमेस बोलाविलें. त्रिंबकराव दाभाडे यांसहि शाहूनें (रोजनिशी ले. ४६) पत्र लिहिलेलें आहे.

‘हेरलें येथील वाडा घेऊन कोल्हापुराभोंवतें राहून चव्हाणास तंबी पोंचविणें, लांब न जाणें,’ अशी शाहूची आज्ञा सेनापतीस आहे. सिधोजी थोरात, दावलजी सोमवंशी, राणोजी घोरपडे इत्यादि अनेक लहान मोठ्या सरदारांस उदाजी चव्हाणावर चालून जाण्याची शाहूनें आज्ञा केली (रोजनिशी ले. २१५,२१६). आपण स्वतः वारणेच्या बाजूस तळ देऊन पलीकडे कोल्हापुरच्या राज्यांत त्यानें मोहीम सुरू केली. निजामास सामील झाल्यावेळेपासून प्रतिनिधि शाहूच्या मनांतून पुष्कळ उतरला होता, आणि कांही तरी पराक्रम दाखवून पुन्हां शाहूची मर्जी संपादावी अशी त्यास उत्कंठा झाली होती. तेव्हां शाहूनें तरी त्याची परीक्षाच पाहण्याकरितां बाजीराव वगैरे जवळ असतांहि मुद्दाम प्रतिनिधीस चव्हाणावर रवाना केलें.

उदाजी चव्हाणानें संभाजीस हिंमत देऊन शाहूमहाराजांशीं लढण्यास प्रवृत केलें. संभाजीनें आपल्या अष्ट प्रधानांस व सरदारांस पत्रें पाठवून आपापल्या फौजांसह हजर होण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणें सर्व फौज येऊन वारणातीरीं जमा झाली. व्यंकटराव घोरपडे व भगवंतराव अमात्य हेहि या फौजेंत होते. पण त्यांची भक्ति अंतर्यामी संभाजीकडे नव्हती. शाहूची तयारी होतांच त्यानें श्रीनिवासराव प्रतिनिधी यास संभाजीवर चालून जाण्याचा हुकूम केला. प्रतिनिधीनें अकस्मात येऊन घाला घालतांच संभाजीच्या फौजेची दाणादाण होऊन, संभाजी व उदाजी चव्हाण सडेच पळून गेले. यानंतर संभाजीचा व शाहूचा तह झाला तरी शाहूच्या राज्यांत दंगा करण्याचें काम उदाजीनें चालूच ठेविलें होतें. त्याचा व संभाजीचा प्रधान केशव त्र्यंबक यांचा पत्रव्यवहार होता (खं. ८ ले. १३३). इ. स. १७३१-३२ त यशवंतराव महादेव पोतनीस यास शाहूनें त्याजवर पाठविलें. यशवंतरावानें त्याचा मोड करून मोठा दंड घेऊन सोडून दिलें (शा. म. च. पृ. ६५ व रा. खं २ पृ. ६९) आणि शाहूनें त्यास कामगिरीहि सांगितली (रोजनि. ले. २२०); त्यानंतर पुन: मिरजेवर स्वारी करण्याकरितां म्हणून इ. स. १७३७ त शाहू निघाला असतां उदाजी चव्हाण गनिमाची कुमक करूं लागला म्हणून त्याजवर शाहूनें प्रतिनिधीस रवाना केलें (शा म. च. ६१, ७० व रा. खं. २ पृ. ७७). चव्हाण पळून मोगालाईंत गेला.

ता. ८ नोव्हेंबर रोजीं प्रतिनिधीनें अथणीचें ठाणें काबीज करून मध्य रात्रीं निशाण चढविलें (इ. सं. पे. द. मा. ले. ३९); चव्हाण मोंगलाईतून परत आला नाहीं. मधून मधून त्रास देतच होता त्याचा नि:पात होय ते गोष्ट करणें, म्हणून त्रिंबकराव सोमवंशी यास इ. स. १७४८ सालची शाहूची आज्ञा आहे (खं ६-१८७). नानासाहेब पेशव्यानें इ. स. १७५१ त युक्तीनें उदाजीस मोगलाईतून आणून डिग्रज येथें सरंजाम देऊन ठेविलें. तेथें अद्याप त्याचा वंश आहे (का. सं. प. या. १४४ व ४२२ ). तथापि उदाजीची खोड गेली नाहीं. डिसेंबर १७५२ त व फेब्रुवारी १७५३ त त्याजवर नानासाहेबांनीं स्वार्या केल्याचे उल्लेख आहेत (शा. म. रो. २२६, २२७, २३०, २३२), त्यांत ‘पेशव्यानें उदाजीचा उपद्रव न लागेल असा बंदोबस्त केला. उदाजीचा शेवटहि लढाईंतच झाला. मिरज प्रांतीं एका खेड्यावर रोखा केला तो गांवकर्यांनीं मानला नाहीं, त्यावरून उदाजीनें गांवावर स्वारी केली, त्यांत घोडीस गोळी लागली, ती उधळली रिकिबींत पाय अडकून डोकें फुटून मेले. पुत्र विठोजी डिग्रजेस व प्रीतिराव करविरीं शिवाजी महाराजांपाशीं राहिले.’ असें आहे.

मराठी रियासत मध्य विभाग भाग २ रा.

सौजन्य सातारचे इनामदार

Leave a comment