महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,20,042

शिवजन्मोत्सव इंग्रजी तारखेप्रमाणे का तिथी प्रमाणे ?

By Discover Maharashtra Views: 1735 9 Min Read

शिवजन्मोत्सव इंग्रजी तारखेप्रमाणे का तिथी प्रमाणे ?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा वाद आता संपुष्टात आला असला, तरी शिवजयंतीचा शासकीय उत्सव नेमका कोणत्या तारखेला साजरा करायचा, म्हणजे तिथीनुसार दरवर्षी बदलणार्‍या तारखेस की इंग्रजी तारखेस असा वाद अजूनही शिल्लक आहे. यात तिन प्रकारचे शिवभक्त आहेत. एक जे शिवजयंती “तारखेप्रमाणेच” साजरी करा असा आग्रह करणारे आणि त्यासाठी तिथिप्रमाणे शिवजयंती करणा-यांना विरोध करणारे! दुसरे जे शिवजयंती तिथीप्रमाणेच साजरी करावी असे मानणारे आणि तारखेप्रमाणे शिवजयंती करणा-यांचा विरोध करणारे! तिसरे ज्यांना तारिख आणि तिथी यात नेमका वाद काय आहे! हा वाद कोण आणि का करतय याबद्दल काहीच माहिती नसताना फक्त छत्रपती शिवरायांच्या विषयीच्या “आंधळ्या प्रेमापोटि”(हो ! आंधळ्याच) समोर आलेला मेसेज पुढे पाठवून आपले So called शिवप्रेम व्यक्त करणारे. यात तारखेप्रमाणे शिवजयंती करणारे चुक की तिथी प्रमाणे चुक हा मुद्दाच नाहिये!शिवजन्मोत्सव.

मुद्दा हा आहे की ज्यांना नेमका हा वाद काय आहे?

१५ एप्रिल १८९६ रोजी बाळ गंगाधर टिळकांनी रायगडावर शिवाजीजयंती साजरी केली. तेव्हापासून महाराष्ट्रात शिवजयंतीचा सार्वजनिक उत्सव सुरू झाला. त्यावेळी लोकमान्यांना उपलब्ध झालेल्या पुराव्यांवरून शिवरायांचा जन्म वैशाख शुद्ध प्रतिपदेला झाल्याचे मानण्यात येत होते. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी संशोधन करून ही तिथी वैशाख शुद्ध पंचमी असल्याचे सांगितले. पुढे १९१४च्या सुमारास टिळकांना छत्रपतींच्या जन्मकालाची नोंद “जेधे शकावली’त सापडली. शकावलीत शके १५५१ शुक्‍ल संवत्सर या वर्षात “शिवजन्म फाल्गुन वद्य तृतीया, शुक्रवार, घटी १८, पळे ३१, गड ५, पळे ७ ये दिवसी झाला’ अशी नोंद आढळते. ग्रेगरियन कॅलेंडरनुसार ही तारीख १९ फेब्रुवारी १६३० अशी येते. हे पुरावे सापडल्यानंतर खरेतर वादाचे काही कारण नव्हते. परंतु इतिहासकारांमध्ये एकवाक्‍यता नव्हती. १९२५ सालचा शिवजयंती उत्सव फाल्गुन वद्य तृतीयेलाच व्हावा अशी जाहीर विनंती महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी “केसरी’मधून केली होती. पण या तारखेला काही अभ्यासकांनी आक्षेप घेतला. पोतदारांप्रमाणेच, ग. ह. खरे, बा. सी. बेंद्रे, सेतुमाधवराव पगडी यांना ही तारीख योग्य असल्याचे मान्य होते. परंतु न. र. फाटक यांनी मात्र याबाबत निर्णायक पुरावा नसल्याचे कारण दर्शवित त्यास विरोध दर्शविला. पुढे १९६७ मध्ये महाराष्ट्र सरकारने असे जाहीर केले, की इतिहासकारांमध्ये एकवाक्‍यता होईपर्यंत वैशाख शुद्ध द्वितिया, शके १५४९ ही शिवजयंतीची प्रचलित तारीखच उत्सवासाठी स्वीकारली जाईल. श्री शिवदिग्विजय, धडफळे शकावली, प्रभानवल्ली शकावली, नागपूरकर भोसले बखर, न्यायशास्त्री पंडितराव बखर, शिवाजी प्रताप बखर, शेडगावकर बखर, तसेच पारसनीस व किंकेडकृत इतिहास या साधनांमध्ये ही तिथी देण्यात आली आहे.

मल्हारराव चिटणीस यांनी लिहिलेल्या शिवचरित्रात, “जिजाबाईसाहेबांनी नवस केला जे पुत्र झाले म्हणजे शिवाई देवीचे नाव ठेवीन. नंतर गरोदर दिवस पूर्ण होऊन शिवनेरीस शुभसमयी वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ प्रभावनामे संवत्सरे वर्षी गुरुवारी पुत्र झाला,’ अशी नोंद आढळते. इसवी कालगणनेनुसार ही तारीख होती ६ एप्रिल १६२७. या तिथीस येणाऱ्या इंग्रजी तारखेस शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येऊ लागला, तरी वाद शमला नव्हता. साल १६२७, १६२८ की १६३० हा घोळ सुरूच होता. अखेर इतिहासकार गजानन भास्कर मेहंदळे यांनी हा वाद एकदाचा निकालात काढला. राजस्थानात आढळलेल्या कुंडल्या, राजघराण्यांतील नोंदी, देशात ठिकठिकाणी उपलब्ध झालेले कागद, पत्रव्यवहार असे सर्व काही पडताळून आपल्या “श्री राजा शिवछत्रपती’ या चरित्राच्या पहिल्या खंडात जाहीर केले, की फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० हीच शिवाजी महाराजांची जन्मतारीख आहे. इतर ज्येष्ठ इतिहासकारांनीही त्यांच्या संशोधन, पुरावे व निष्कर्षास मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने १९ फेब्रुवारी ही तारीख सरकारी सुट्टी व शिवजयंती उत्सवासाठी घोषित केली.

आता मुद्दा असा की शिवजयंती साजरी करायची ती इंग्रजी तारखेनुसार की हिंदु पंचागानुसार? १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार आहे. ते केलेंडरछत्रपती शिवाजी महाराज्यांच्या वेळेला युरोपात सुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी “ग्रेगेरियन कॅलेंडर” १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत जगभर “ज्युलियन कॅलेंडर” अधिकृत होते. ज्युलिअन कालगणना व ग्रेगेरिअन कालगणना यांच्यात इसवीसन १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर, १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो. (ज्युलियन कॅलेंडर पुढे गेले होते.) त्यामुळे ग्रेगेरियन केलेंडरनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० – ११ दिवसांनी चुकते. अशा परिस्थितीत जर तारखेचा आग्रह असेलच तर ग्रेगोरीयन कॅलेंडर प्रमाणे म्हणजे दि. १ मार्च रोजी येऊ शकते म्हणजे जर का आपण शिवजयंती तारखे नुसार साजरी करावी तर शास्त्रीय दृष्टया दि.१ मार्च हीच तारीख अधिक योग्य आहे असं म्हणू शकतो. आता ज्यांना तारखेनुसारच शिवजयंती साजरी करायची असेल त्यांनी दि. १९ फेब्रुवारी ला न करता दि. १ मार्च रोजी करावी म्हणजे त्या महापुरुषाचा जन्मोत्सव योग्य दिनाला साजरा केला याच समाधान राहील नाहीतर सरकारने दिलीय म्हणून आम्ही १९ फेब्रुवारी ला शिवजयंती साजरी करून आपणच आपलंच अज्ञान उत्साहात गोंजारत बसतोय असं नको व्हायला.

आता प्रश्न असा की काय फरक पडतो शिवजन्मोत्सव तारखे नुसार केला काय किंवा तिथी नुसार केला काय? कारण महाराजसाहेबांचं कामच अचाट आणि अलौकिक आहे की त्यांचा जन्मोत्सव रोजच्या रोज उत्स्फूर्तपणे साजरा केला जाऊ शकतो इतकं असामान्य कर्तृत्व आपल्या महाराजांनी केलं आहे पण जन्मदिवस रोज रोज येतो का? येणारा प्रत्येक दिवस जरी नवा असला तरी आपण आपल्या आपला वाढदिवस रोज करतो का तर नाही कारण त्या एका दिवसाची उत्साह आणि उत्कंठा काही निराळीच असते. मग ती आतुरता शोधण्यासाठी आपण एक सुवर्ण मध्य काढून ह्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काही तरी करायला नको का? शिवकालीन घटना तारखेप्रमाणे साजरी करणे हि चूक नसून शिवकालीन घटनांच्या बाबतीत इंग्रजी तारीख वापरणे हीच मुळात मोठी चूक आहे मग मग तो सोहळा शिवजन्मचा असो, अफझलखानाच्या वधाचा असो वा शिवराज्याभिषेक दिन असो.

आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीने(जाणीवपूर्वक हिंदू संस्कृती वगळून भारतीय संस्कृती असा शब्द वापरला नाहीतर काही लोकांचं पोटशूळ उठायचं) कालगणनेसाठी स्वतःची पद्धती शोधून काढली आहे जी फार प्राचीन आणि शास्त्रीय आहे. प्राचीन काळापासून अनेक संस्कृतींनी आप-आपल्या कालगणना पद्धती शोधून काढल्या आणि वापरल्या. Modern पणा च भूत संस्कृती च्या मानगुटीवर बसलं आणि संस्कृती संस्कृती च्या लढाई मध्ये बर्याच ठिकाणी प्राचीन आणि मूळ चालीरीती पराभूत संस्कृतीच्या परंपरा नामशेष हळू हळू नामशेष होत गेल्या आणि आक्रमकांच्या परंपरा लादल्या गेल्या. काही वर्षांनी त्या परंपरा त्या संस्कृतीत मातीत रुजल्या आणि आज त्या विनासायास चालू आहेत. जखमांचे घाव विरले आणि नवीन पिढ्यांनी या संस्कृती आपल्या म्हणून स्वीकारल्या. आणि हे फक्त महाराष्ट्र किंवा भारतात नाही तर जगभरात अनेक ठिकाणी असे झाले आहे. आपल्या संस्कृतीचे अभिमानास्पद वैशिष्ट्य असे कि आपल्याकडे तब्बल नऊ शतके आक्रमण होऊनही,आपल्या स्वतःच्या संस्कृती परंपरा लयास गेल्या नाहीत. हे जगाच्या इतिहासात फार क्वचित अपवादानेच घडले असावे आणि त्यामुळे त्याबद्दल आपल्या मनात भारतीय संस्कृती बद्दल मग ती कालमापन पद्धत असो वा इतर कोणतीही त्याबद्दल आदर हा असलाच पाहिजे.

शिवपूर्व काळात मराठी मोडी लिपीतील पत्रामध्ये फारसी कालगणना वापरलेली दिसते. मात्र शिवकालातील पत्रांमध्ये सुरुवातीचे काही अपवाद वगळता मराठी तिथी आणि संवत्सर वापरले आहे किंवा दोन्हीचा वापर केलेला दिसतो. याचा अर्थ मराठी तिथी अधिकाधिक वापरावी हा शिवकालातील प्रघात आहे असे दिसते शिवराज्याभिषेका नंतर शिवशक सुरु झाले हे तर आपण सर्व जाणतोच. दुसरीकडे महाराजांनी जाणीवपूर्वक एक गोष्ट केली हे आपल्या ध्यानात येईल. आक्रमणाअगोदर भारतीय परंपरेत ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्यातर केल्याचं पण फारसी शब्दांचे मराठी प्रतिशब्द तयार करवून घेतले आणि त्याचा एक स्वतंत्र शब्दकोश बनवला, रूढ केला. याचे कारण हि सर्व पारतंत्र्याची प्रतीके होती. कित्येक दस्त किंवा पत्र व्यवहार त्यासाठी लागणारे मचकुर पत्रांचे मायने बदलून देवनागरी भाषेत करवून घेतले कारण शारीरिक पारतंत्राबरोबरच प्रतीकात्मक पारतंत्र्यहि महाराजांनी खोडून काढले. अशा राजाची जयंती आपण पारतंत्र्याच्या प्रतिकांनी म्हणजे इंग्रजी कालगणनेनुसार साजरी करणे चूक नाही का? महाराजांच्याचविचारांना आपण तिलांजली देण्यासारखं नाही का? इंग्रजी कालगणना आज आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य आहे आणि दैनंदिन व शासकीय, आर्थिक आणि व्यावहारिक वापरत आहे हे मान्यच!

आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये एकसूत्रता यावी यासाठी आपण इंग्रजी कालगणना मान्य केली आहे, आणि वापरत आहे. शिवकालीन घटनांच्या सोहळ्यासाठी इंग्रजी तारीख वापरण्याचे किंवा शोधण्याचे काहीच कारण नाही! ज्या घटना मुळातच तिथीप्रमाणे नमूद आहेत, त्यासाठी इंग्रजी प्रतिदिनशोधून काढण्याचा वेडेपणा करावाच का तिथीचे इंग्रजी रूपांतरण करण्यामध्ये एक फार मोठी तांत्रिक अडचण आणि तांत्रिक चूक उद्भवण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. तिथीप्रमाणे शिवकालीन घटना साजऱ्या करणे हेच आपल्या संस्कृतीला आणि महाराजांच्या प्रयत्नांना धरून आहे हे मला तरी योग्य वाटत. मग शिवचरित्र वाचून समजून देखील आऊसाहेब आणि छत्रपती नी निर्माण केलेलं स्वराज्य म्हणजे काय हे जर का समजण्यासाठी आपण असमर्थ असू तर मग शिवजयंती तारखे नुसार का तिथी नुसार हा गुंता अधिकाधिक वाढत जाणार. आता आपण जर स्वराज्यात असू तर मग शिवजयंती कोणती आणि कशी साजरी करायची हा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा.

लेखन व माहिती संकलन – विजयश श्रीकांत भोसले

Leave a comment