महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,76,608

शिवकालीन इतिहास अभ्यासपूर्ण साधने

By Discover Maharashtra Views: 7152 8 Min Read

शिवकालीन इतिहास अभ्यासपूर्ण साधने –

साधारणपणे मराठ्यांच्या इतिहासात सतरावे शतक हे शिवकाळ म्हणून ओळखले जाते. बहुतांश इतिहासकारांच्या मते शिवरायांच्या जन्मापासून ते  शिवरायांच्या नंतर जवळपास २५ वर्ष हा शिवकाळ म्हणून ओळखला जातो. यात शहाजीराजे, शिवराय, संभाजीराजे, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांचा काळ साधारणतः शिवकाळात येतो.
इतिहास हे एक शास्त्र आहे. इतिहासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी व लेखन करण्यासाठी अनेक ऐतिहासिक साधनांचा वापर करावा लागतो. तत्कालीन काळात घडलेल्या घटनांसोबतच अनेक तर्क-वितर्क सुद्धा येतातच. त्यामुळे इतिहास वस्तुनिष्ठपणे लिहावा लागतो. काय घडले, कसे घडले, त्याने काय साध्य झाले या सगळ्यांचा वेध घेणे आवश्यक ठरते. त्यामुळेच ऐतिहासिक साधनांना इतिहासाचा आत्मा म्हटले जाते.शिवकालीन इतिहास अभ्यासपूर्ण साधने.

प्राध्यापक लॉजीलॉस व प्राध्यापक सेनवास यांच्या “No Documents No History” या अर्थपूर्ण विधानांतून आपल्याला साधनांचे महत्व समजू शकते.

मोगल, पेशवेशाही च्या तुलनेत शिवकालीन इतिहासाची साधने फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.
त्यामुळे आपण मराठा इतिहासाच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या तत्कालीन साधनांचा आढावा घेऊ.

संस्कृत ग्रंथ

१.राधामाधवविलास चंपू

इस. १६५३-१६५४ च्या आसपास जयराम पिडे यांनी शहाजीराजे बंगलोर मुक्कामी असताना हा काव्यग्रंथ लिहिला. यात शहाजीराजांचे चरित्र अन पराक्रम यांचे वर्णन केले आहे. १९२२ मध्ये इतिहासकार राजवाडे यांनी विस्तृतपणे हा ग्रंथ प्रकाशित केला.

२.शिवभारत

शिवभारत हा ग्रंथ कवी परमानंद यांनी लिहिला असून यात १६६१ पर्यंत घडलेल्या घटनांची माहिती आपल्याला मिळते. यात एकूण ३२ अध्याय आहेत. १९२७ मध्ये स.म. दिवेकर यांनी हा ग्रंथ संपादित केला.
शिवरायांनी शृंगारपूर घेतले तिथपर्यंत या ग्रंथात वर्णन आहे.

३.पर्णालपर्वतग्रहणाख्यान

१६७४ साली जयराम पंडित किंवा पिडे यांनी हा ग्रंथ लिहला असावा असे मत दिवेकर यांनी नोंदवले आहे. पर्णाल म्हणजे पन्हाळा. शिवरायांनी १६७३ मध्ये पन्हाळा कोंडाजी बाबांकरवी पुन्हा स्वराज्यात आणला तिथपासून  प्रतापराव गुजर व बहलोलखान यांच्यात झालेल्या उमराणीच्या लढाईपर्यंत इतिहास या ग्रंथात सापडतो.
१९१३ मध्ये दिवेकरांनी मराठी भाषेत हा ग्रंथ प्रकाशित केला.

४.शिवराज्याभिषेक कल्पतरू

अनिरुद्ध सरस्वती यांनी हा ग्रंथ लिहिला. याची पोथी आपटे व दीक्षित यांनी संपादित केली.

५.राज्यव्यवहार कोश
शिवरायांच्या आज्ञेवरून धुंडिराज लक्ष्मण व्यास या पंडिताने हा ग्रंथ लिहिला. फारसी भाषेचे मराठीवरील आक्रमण दूर करण्यासाठी १६७८ मध्ये हा कोश बनवला गेला.

६.शिवकार्योदय

हा ग्रंथ वेदोनारायण गागाभट्ट यांनी १६८० मध्ये लिहला असून तो संभाजीराजांना अर्पण केला.

७.अनुपुराण
हा ग्रंथ कवी परमानंद किंवा त्यांच्या मुलाने संभाजी राजांच्या काळात लिहला असावा. अनुपुराण हा संभाजी राजांबद्दल सगळ्यात विश्वसनीय असा तत्कालीन काव्यग्रंथ ठरतो.

८.बुधभूषण
शिवकाळात १६७४ ते १६७७ या काळात दस्तुरखुद्द संभाजी महाराजांनी राजकारणावर भाष्य करणारा हा संस्कृत ग्रंथ लिहिला.

९.राजारामचरितम
छत्रपती राजाराम महाराजांच्या पदरी असलेल्या केशव पंडित यांनी १६९० मध्ये या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथात संभाजी राजांच्या नंतरच्या बऱ्याच घटनांची माहिती मिळते. १६३१ ला बेंद्रे यांनी मराठी भाषांतरासह हा ग्रंथ प्रसिद्ध केला.

शकावल्या

१.जेधे शकावली
भोर जवळील कारीच्या यांच्या दफ्तरात मिळालेली शकावली भारत इतिहास संशोधक मंडळाने १९१६ मध्ये प्रकाशित केली. या शकावलीत औरंगजेबाच्या जन्मापासून जिंजीच्या वेढ्यापर्यंतच्या ३०० नोंदी आहेत.

२.शिवापुरकर शकावली
शिवापुरच्या देशपांडे घराण्यात ही शकावली सापडली. यालाच शिवराज्याभिषेक शकावली असेही म्हणतात.

३.चित्रे शकावली
स्वराज्याचे चिटणीस बाळाजी आवजी चित्रे यांच्या घरात ही शकावली सापडली. यात १६१२ ते १७०९ पर्यंत ३० नोंदी आढळतात.

बखरी

१.सभासद बखर
कृष्णाजी अनंत या समकालीन सभासदाने राजाराम महाराजांच्या सांगण्यावरून ही बखर १६९७ च्या आसपास लिहली.

२.शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर
ही बखर दत्ताजी त्रिंम्बक वाकनिस यांनी १६८६ ते १७०७ च्या काळात लिहली असावी.

३. चिटणीस बखर
ही बखर मल्हार रामराव चिटणीस याने शिवकाळाच्या नंतर जवळपास १०० वर्षांनी लिहली असल्याने ही फारशी विश्वसनीय नाही. बहुतेक घटना या काल्पनिक माहितीच्या आधारे लिहल्या गेल्या आहेत.

४.इतर बखरी
यात चित्रगुप्त बखर, शिवदिग्विजय बखर, मराठ्यांची बखर, शिवप्रताप बखर या काही बखरी आहेत.

शिलालेख
शिवकाळातील शिलालेखांची संख्या खूपच मर्यादित आहे. किल्ले, वाडे अन मंदिराच्या भिंतीवर कोरलेल्या मजकुरास शिलालेख म्हणतात. बऱ्याचशा किल्ल्यांवर असे शिलालेख आढळतात.

आज्ञापत्र
शिवरायांची राजनीती, राजव्यवस्था अन नियम समजून घेण्यासाठी रामचंद्रपंत अमात्य यांचे आज्ञापत्र खूप उपयुक्त ठरते. यात एकूण ९ प्रकरणे दिली आहेत. त्यात राजाची कर्तव्ये, लष्करव्यवस्था, फौजेचा शिरस्ता यावर जास्त भर दिला आहे.

पर्शियन साधने

१.लुत्फुलाखानाची पत्रे
या मोगल सरदाराने १६९० ते १७०० या काळातील मराठा इतिहासातील अनेक घटनांचा उल्लेख आपल्या पत्रातून केला आहे.

२.मसीरे आलमगीरी
मुघल इतिहासकार साकी मुस्तेदखान याने १७०९ मध्ये हा ग्रंथ लिहला. हा स्वतः दक्षिण मोहिमेत सहभागी होता.

३.तारीखे खाफिखान
मोगल अधिकारी खाफिखान याने १७३४ ला हा ग्रंथ पूर्ण केला. यात बहुतकरून मराठ्यांवर टीका केली आहे. परंतु शिवरायांच्या धार्मिक सहिष्णुता अन ताराबाईंची स्तुती देखील आढळते.

४.खुतुते शिवाजी
यात शिवरायांची ३२ पत्रे आढळतात. शिवरायांनी जिझिया कराच्या संदर्भात औरंगजेबाला पाठवलेले पत्र सुद्धा यात आहे.

५.बुसातीन उस सलातीन
यात आदिलशाही शी संबंधित इतिहासाची माहिती आपल्याला मिळते.

६.मुहम्मदनामा
आदिलशहाचा कवी जहुरी याने १६५४ ला हा ग्रंथ लिहला. यात शहाजीराजांबद्दल खूप माहिती मिळते.

पोर्तुगीज साधने, डच साधने, फ्रेंच रेकॉर्ड्स, इंग्लिश रेकॉर्ड्स, राजस्थानी रेकॉर्ड्स अशी अनेक तत्कालीन साधने शिवराय व परकीय सत्तांचे संबंध दर्शवतात.

तत्कालीन प्रवाशांचे लेखन (शिवकालीन इतिहास अभ्यासपूर्ण साधने)

१.जॉन फ्रायर
१६७२ ते १६८१ च्या काळात हा ईस्ट इंडिया कंपनीचा सर्जन म्हणून भारतात आला. हा शिवरायांच्या राज्यभिषेक सोहळ्याला रायगडावर उपस्थित होता. याने शिवराय व संभाजीराजांबद्दल वास्तववादी लिखाण केले.
त्याचे वृत्तांत Travels in India in 17th Century या पुस्तकात उपलब्ध आहेत.

२.निकोलो मनूची
हा इटालियन प्रवाशी १६५६ मध्ये भारतात आला. तो भारतात ६५ वर्षे राहिला. त्याचा वृत्तांत त्याने Storia Do Mogor या नावाने फ्रेंच भाषेत लिहला.
असे होते मोगल या नावाने त्याचे पुस्तक चौबळ यांनी मराठीत प्रसिद्ध केले.

३.डॉ जॉन बाप्टिस्ट करेरी

हा इटालियन प्रवासी वैद्यक शास्त्रज्ञ होता. त्याने सुद्धा स्वराज्यातील खूप भागांना भेटी दिल्या व त्याचे वृत्तांत लिहून ठेवले.

४. ऐबे कॅरे
इस १६६८ ते १६७३ या काळात हा फ्रेंच प्रवासी भारतात आला होता. तो बरेच दिवस स्वराज्याच्या भागात फिरला. शिवरायांचे वर्णन त्याने One Of The Greatest Men Ever, the east has ever seen अशाप्रकारे केले आहे.

५.फ्रान्सिस मार्टिन
१६६४ ते १६९४ ला काळात हा समुद्रकिनारी वखारप्रमुख होता. पुढे हा पहिला फ्रेंच गव्हर्नर बनला. याने फ्रेंच भाषेत त्याची रोजनिशी लिहली ती जदुनाथ सरकार यांनी इंग्रजीत अनुवादित केली.
त्यात मराठ्यांच्या कर्नाटकातील हालचालींच्या संदर्भात माहिती मिळते.

६.फ्रान्सिस बरनियर
१६६५ ते १६६७ या काळात हा भारतात होता. त्याच्या ग्रंथात त्याने सतीप्रथा, धार्मिक आचार याबद्दल मनोरंजक माहिती दिली आहे.

७.विल्यम नोरीस
इंग्लंडच्या राजाने १७०१ साली त्याला औरंगजेबाकडे परवानगीसाठी पाठवले. त्यावेळी त्याने बादशाहा छावणी व मराठा-मोगल संघर्षाबद्दल लिहले.

८.टॅव्हनिर्यार
१६४२ तव १६६६ काळात या फ्रेंच हिरे व्यापाऱ्याने भारतात दुभाषी घेऊन प्रवास केला. त्याने आपले बरेच अनुभव लिहून ठेवले.

इतर प्रवासी
यांशिवाय पीटर डेला, कॉस्मो दी गारदा, जॉन ओव्हीग्टन, थॉमस बोबरी, जॉन मार्शल यांनी सुद्धा मराठ्यांबद्दल थोडेफार लेखन केले आहे.

शिवकाळाच्या अभ्यासासाठी वरील साधने ही खूपच उपयुक्त ठरतात. कारण यातील सामाजिक, भौगोलिक व इतर माहिती क्वचितच दुसरीकडे सापडते.

त्यामुळे ज्यांना शिवकालीन इतिहास अभ्यासायचा आहे त्यांनी वरील साहित्याचा अभ्यास आवर्जून करावा.

धन्यवाद🙏

माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील

Leave a comment