रायगडावरील होळीचा माळ

रायगडावरील होळीचा माळ

रायगडावरील होळीचा माळ –

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला “होळी पौर्णिमा” असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तसेच काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो . फाल्गुनी पौर्णिमा पासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो. भारतामध्ये प्राचीन काळापासून होळीचा सण हा लोकोत्सव म्हणून संपूर्ण देशभर साजरा होत असल्यामुळे त्या-त्या प्रांतात होळीला निरनिराळ्या नावाने ओळखतात. महाराष्ट्र आणि गोव्या मध्ये या सणाला शिमगा असे म्हणतात.(रायगडावरील होळीचा माळ)

शालिवाहन शकाच्या मास गणनेप्रमाणे शेवटचा जो फाल्गुन महिना, त्या फाल्गुनोत्सव करावा असे भविष्यादी पुराणात कथन केले आहे. सामान्यत: शुल्क नवमीपासून पौर्णिमेपर्यंत हा उत्सव सर्व लहानथोर मोठय़ा उत्साहाने साजरा करतात. स्थानपरत्वे यास शिमगा, होलिकादहन, होळी, हुताशनी महोत्सव, उत्तरेत दोलयात्रा, तर दक्षिणेत कामदहन म्हणून होलिकोत्सव साजरा केला जातो. लहान मुलांना पीडा देणाऱ्या “होलिका”, “ढुंढा”, “पुतना” ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

महाराष्ट्रात शंकराच्या मंदिरासमोरील किंवा ग्रामदेवते समोर मोकळ्या जागेत १५ ते २० फुटाची होळी उभारली जाते. जंगम, गुरव वा ब्राह्मणाने गाव प्रमुखाच्या उपस्थितीत पूजाअर्चा केली की होळी पेटविली जाते. अर्वाच्च उच्चारण केले जाते. होळीसमोरील पटांगणात खेळे नाचतात, आटय़ापाटय़ाचा डाव रंगतो. पताका लावतात. फुलांची सजावट करतात. होळीची पूजा करून होळी भोवती फेर धरून लोकगीते म्हणतात.विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजन परंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा. त्यात कालांतराने स्थानिक लोकांकडून धार्मिक/सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी. कोकणात काही ठिकाणी बाणाठीचे खेळ होतात. ही प्रथा शिवकाळापासून आहे, असे म्हटले जाते. असा हा प्राचीन काळापासून लोकोत्सव म्हणून मान्य पावलेला होळीचा सण शिवकाळात कसा साजरा होत होता. मुळात होळीचा सण साजरा करण्यासारखी तेव्हा परिस्थिती होती का? एक  इतिहासप्रेमी म्हणून इतिहासकाळात डोकावू लागलो.

शिवकाळपूर्व महाराष्ट्र चार पातशहांच्या विळख्यात भरडला जात होता. कोण आपला, कोण परका, याची सुदबुध नसलेली रयत जीव मुठीत धरून वावरत होती. परचक्राच्या धाडीत गावेच्या गावे रोज उद्ध्वस्त होत होती. घरादारांची होळी आणि रक्ताची रंगपंचमी ही नित्याचीच बाब होती. महाराष्ट्र संस्कृती, देव, देश आणि धर्म असा लयाला जात असताना शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्राला तारणहार लाभला. रयतेला आपलासा वाटणारा राजा आणि राज्य नव्हे स्वराज्य. स्वराज्य व्हावे, हे तर श्रींच्या इच्छेनेच होणार आहे, असा विश्वास रयतेत निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी निर्माण केली ती अतिशय नियोजनपूर्वक. रायगड चे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत.

जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.

रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते. राजधानी कशी असावी? याचा सुंदर आदर्श शिवाजी महाराजांनी रायगडावर साकारला. राजवाडा, शिर्काई मंदिर ते बाजारपेठ या दरम्यान मोठे पटांगण केले आणि त्याचे नाव ठेवले ‘होळीचा माळ’ हे आहे महाराष्ट्र संस्कृतीचे जीते-जागते प्रतीक. स्वराज्याची कल्पना वास्तवात आणताना छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप बारकाईने विचार केला होता. हे राज्य बलशाली व्हावे, लोककल्याणकारी व्हावे, नीतिमत्तेचे व्हावे, धर्म संस्कृती संवर्धनाचे व्हावे, असा ठाम विचार त्यांच्या मनी वसत असे. सर्व धर्माचा आदर केला तर महाराष्ट्र धर्मही मोठा होणार आहे, यावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच रायगडावरील शिर्काई माता ही प्रमुख देवता. तिच्या साक्षीने होळीच्या माळावर नवरात्र उत्सव, देवीची यात्रा शिवरायांनी सुरू केली. चैत्र पौर्णिमेचा उत्सव (वसंतोत्सव) आणि हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमेचा उत्सव सुरू केला.

इ. स. १६७१ साली शिवाजी महाराजांनी रायगडावर शिमग्याचा सण साजरा केल्याची नोंद आहे. स्वराज्य कार्यात सतत लढाईच्या धामधुमीत मग्न असलेल्या शिवाजी महाराजांना मिळालेला हा दुर्मिळ क्षण म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावयाचा. तेव्हा होळीच्या माळावर होळी कशी रंगली असेल, खेळ्ये आले असतील, सोंगे काढली असतील. ही सोंगे बहिर्जी नाईकांच्या पथकातील लोकांनी वटविली असतील. शेवटपर्यंत ते खरे कोण हे न समजल्यामुळे अचंबित झालेल्या लोकांकडे पाहात शिवरायांनी हलकेच बहिर्जीला इशारा करून त्या सोंगाडय़ाला पोस्त दिले असेल. हळगीच्या चढत्या सुरात दांडपट्टा, तलवारबाजी, बाणाठी, कुस्तीचे फड रंगले असतील. समोर प्रत्यक्ष महाराज आहेत म्हटल्यावर हवसे, नवसे, गवसे सर्वानीच कलाबाजी दाखविली असेल. धर्म, संस्कृती आणि देश जागरणाचा होळीचा हा सण पंचमीपर्यंत मोठय़ा उत्साहात झाला असेल. आज या घटनेचा पूर्ण तपशील उपलब्ध नसला तरी राज्याभिषेक सोहळ्यावरून याची कल्पना यावी. शिवाजी महाराजांनी घालून दिलेला पायंडा पेशवाईच्या अखेपर्यंत सुरू होता. हे त्यांनी केलेल्या रायगडावरील सण-उत्सवाच्या प्रत्येक वर्षीच्या जमा-खर्चाच्या नोंदीवरून लक्षात येते.

लेखन व माहिती संकलन – विजयश भोसले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here