महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,68,712

शिवकालीन पोवाडे !

By Discover Maharashtra Views: 5388 5 Min Read

शिवकालीन पोवाडे !

पुस्तक लेखमाला क्रमांक -१५

पोवाडा! हा शब्द उच्चारताच मला माझे बालपण आठवते. त्यावेळेस शिवजयंतीला किंवा अजून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात पोवाडा हा कॅसेट वर लावला जायचा. शिवाजी महाराजांचा पोवाडा असला की शाहीर श्री बाबासाहेब देशमुख यांच्या सळसळत्या आणि जोशपूर्ण आवाजातील शिवकालीन पोवाडे आम्ही लक्ष देऊन ऐकायचो.त्यात मग शिवजन्मोत्सव ते राजाभिषेक असे वेगवेगळ्या विषयांवर पोवाडे ऐकायची ती मजाच काही और होती.त्या बालवयात ते कानांवर पडलेले शिवछत्रपतींच्या पराक्रमांचे पहिले पाऊल होते ते!!

त्यानंतर मग हळूहळू वयानुसार शिवचरित्र वाचनाच्या ग्रंथांचा अभ्यासायला सुरुवात झाली ती आजगायत!

हे पोवाडे लिहिणारे आणि त्यांना चाल देऊन गायन करणारे शाहीर हे १६ व्या शतकात खूपच प्रसिद्ध होते.त्यामुळेच की काय पण शिवछत्रपतींच्या चरित्रांचा अभ्यास करताना “पोवाडा” या विषयांचा अभ्यास करणे हे इतिहासकाराना भागच पडते.

१६ व्या शतकात पोवाडे लिहिणे आणि ते गावोगावी जाऊन गाणे हे शाहिरांचे कामच होते जणू. कारण त्या काळात सर्वसामान्य जनतेजवळ जाऊन त्या प्रसंगांचे पोवाडारूपी वर्णन केल्यामुळेच त्यावेळेस च्या जनतेमध्ये त्या पराक्रमाची जाणीव होते असे. जसे आताच्या काळात आपणास वर्तमान पत्र किंवा टीव्ही च्या माध्यमातून एखादी बातमी कळते अगदी तसेच. महाराष्ट्राच्या मातीला अनेक शाहिरांचा वारसा लाभलेला आहे.या शाहिरांनी अनेक कवने लिहिली आणि त्यांना पोवाड्यांचे स्वरूप दिले.

पोवाडा म्हणजे शूर मर्दांच्या पराक्रमाची मर्दुमकी आवेशयुक्त भाषेत निवेदन करणारे कवन.

पोवाडा म्हणजेच संस्कृत भाषेत “प्रवाद”, अर्थातच सविस्तर वृत्तांत.शिवकालीन पोवाडे हे केवळ पद्य नसून त्यात गद्य ही असते.म्हणजेच ते नुसते गायले नाही तर अभिनित ही केले जात.पोवाड्याला “शाहिरी काव्य” अशीही एक संज्ञा आहे.

शिवछत्रपतींच्या पराक्रमावर अनेक पोवाडे आहेत. ते पण वेगवेगळ्या पुस्तकांत. पण त्यांच्या वर लिहिलेला आद्य पोवाडा म्हणजे शाहीर अज्ञानदास ने लिहिलेला “अफझलखान वध पोवाडा”. ज्यात अफझलखान जावळी पर्यंत येऊन त्याला मारून मग त्याच्या आदिलशाही फौजेची कशी दाणादाण उडवली याचे वर्णन आहे.त्यानंतर शाहीर तुलसीदास यांनी लिहिलेला अजून एक महत्वाचा पोवाडा म्हणजे “तानाजी मालुसरा पोवाडा”. यात किल्ले सिंहगड घेताना जो अजरामर पराक्रम नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी केला होता, त्याचे वर्णन आहे.

आजच्या काळात आपल्यापैकी बरयाच जणांना माहिती ही नसेल. पण स्वातंत्र पूर्व काळात महात्मा फुले यांनी लिहिलेला “शिवाजी महाराजांवरील पोवाडा” हा  अतिशय अभ्यासयुक्त आहे. तसेच स्वातंत्रवीर सावरकर यांनीही जनजागृती साठी या पोवाड्यांच्या माध्यमाचा योग्य उपयोग करून घेतला. सावरकरांनि लिहिलेल्या शिवछत्रपतींच्या पोवाड्याची दाहकता इतकी होती की , इंग्रज सरकारने त्यांच्या “सिंहगड” आणि “बाजीप्रभू” या दोन्ही पोवाड्यांवर स्वातंत्र्य मिळे पर्यंत जप्ती/ बंदी घातली होती.केसरीचे सुप्रसिद्ध वार्ताहर कै श्री टिकेकर यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात त्या काळी परदेशात राहणाऱ्या कित्येक मराठी माणसांच्या तोंडी सावरकरांच्या पोवाड्यातील ओळी ऐकायला मिळाल्याचा उल्लेख केलेला आहे.वीर सावरकर यांच्या वर अभ्यास करणाऱ्या आताच्या पिढीतील किती जणांना याची माहिती आहे? छत्रपती शिवरायांच्या वर हे पोवाडे त्या काळी लंडन मध्येही गाणारे शाहीर महादेव नानिवडेकर यांचे कौतुक करावे तितके कमीच! त्यानंतर शिवछत्रपतींच्या पराक्रमावर शाहीर अमरशेख , आत्माराम पाटील आणि प्रा. वसंत बापट यांनी लिहिलेले पोवाडे तर अजूनही कित्येकांना अनभिज्ञ आहेत.असो.

तर या पोवाडा या शिवचरित्राच्या एका साधनांवर पूर्ण पणे वाहिलेला एकमेव ग्रंथ म्हणजे “शाहिरांचे छत्रपति शिवाजी महाराज”! १९८८ साली श्री छत्रपति शिवाजी महाराज स्मारक समिती ,मुंबई यांनी संकलित केलेला हा प्रचंड अभ्यासपूर्ण ग्रंथ आहे. यात शिवछत्रपतींच्या पराक्रमावर  एकूण ५५ पोवाडे लिहिलेले आहेत. ते मग शिवजन्म ,अफझलखान, शाहिस्तेखान, आग्र्याहून सुटका, तान्हाजी मालूसरे यांचा पराक्रम, बाजीप्रभू,ते शिवराजभिषेक असा एकूण शिवचरित्राचा कालखंड आहे.

तसे पहावयास गेले तर श्री य.न.केळकर यांनी १९२८ साली या सर्व पोवाड्यांचे एकत्र संकलन करून   “ऐतिहासिक पोवाडे” हा ग्रंथ साकारलेला आहेच. त्यात त्यांनी शिवशाही ते पेशवाई  काळात प्रसिद्ध असलेले पोवाडे एकत्र केलेले आहे. असे दुर्लभ काम करणे आजच्या काळात कठीणच म्हणावे लागेल. अज्ञानदास आणि तुळशीदास यांचा पोवाडा सर्वप्रथम आताच्या पिढीपर्यंत आणण्याचे श्रेय त्यांना दिले गेलेच पाहीजे. याविषयी ची अधिक माहिती आपण त्यांच्या लेखमालेत घेणार आहोतच.

शिवचरित्र अभ्यासताना दुर्दैवाने, “पोवाडा” या विषयावर आजच्या काळात हवे तितके लक्ष दिले जात नाहीय. हे दुर्दैवाने म्हणावे लागते आहे.म्हणून या एका महत्वाच्या विषयावर घेतलेला हा एक संक्षिप्त धांडोळा !

पुढील लेखमालेत आपण शिवचरित्राच्या अजून काही महत्वाच्या साधनांचा धांडोळा घेणार आहोत.

आपणही योग्य संदर्भ ग्रंथ वाचन करीत राहावे आणि योग्य माहितीचे आकलन करीत राहावे हाच या पोस्ट मधील एकमेव उद्देश.

बहुत काय लिहिणे? अगत्य असू द्यावे.

किरण शेलार

Leave a comment