महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,99,046

शिवकालीन सरदार घराण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव !

By Discover Maharashtra Views: 1360 3 Min Read

शिवकालीन सरदार घराण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव !

सर्वात जुना सार्वजनिक गणपती कोणता, पुण्यातला भाऊ रंगारी – गुरुजी तालीम कि सोलापूर चा आजोबा गणपती अश्या चर्चा कायमच होताना दिसतात. पण डामडौल, मिरवणुका , मानपान असलेला सार्वजनिक गणेशोत्सव मराठेशाहीत सुद्धा होत असे ज्याला २७५-३०० वर्षे जुना इतिहास आहे.(शिवकालीन सरदार घराण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव !)

१७३२ सालच्या एका उल्लेखात कण्हेरखेड चे इतिहासप्रसिद्ध शाहू छत्रपतींचे सरदार आणि बाजीराव पेशवे यांचे सहकारी राणोजी शिंदे यांच्या जहागिरीतील गावात गणेशोत्सव सार्वजनिक रित्या मिरवणूक निघून साजरा होत असे, “गणेश चौथीचा गणेश, पुढे रानवडे यांचा, मागून सिंदियांचा’ असे कागदपत्रात स्पष्ट म्हटले आहे. यावरून मिरवणुकीत मानाचे अग्रक्रम मूळ पाटील रानवडे यांचा प्रथम तर मागे शिंदे यांचा गणपती असे.

१७५२ सालच्या एका नोंदीनुसार शाहू महाराजांचे सरदार असणाऱया जगदाळे यांच्या गराडे या गावातही सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात होत असे, गराड्याची पाटीलकी पूर्वी बाजीराव पेशवे,चिमाजी अप्पा आणि नंतर पुरंदरे यांच्याकडे होती . यात पाटीलकीचे हक्क ,अग्रक्रम आणि मानपान याविषयी कलम असून, “गणेश गौरी पुरंदऱ्यांच्या पुढे व मागे जगदाळे यांच्या’ असा स्पष्ट उल्लेख आहे.  पुरंदरे यांच्या नंतर मूळ पाटील असलेल्या जगदाळेंचा गणपती असेल असेल असे नमूद आहे.

कऱ्हाड जवळील मसूर येथेही सरदार महादजी जगदाळे यांनी उभारलेल्या भव्य पाटीलवाड्यात तेव्हापासून आजतागायत गणेशोत्सव साजरा केला जातो. श्रींची मूर्ती तयार करण्याचा मान धर्माधिकारी घराण्याकडे आहे. गणेशोत्सवानिमित्त वाडा काचेची झुंबरे, हंड्या व झालरी, कमानी याने सजवला जातो व रंगरंगोटी करुन शाही थाट दिला जातो.कीर्तन, नृत्य-गायनाचा कार्यक्रम, भजन असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. याशिवाय प्रतिवर्षाप्रमाणे सांगलीच्या नर्गिसबानू, औरंगाबादच्या शबाना बानू या घराण्यांच्या नृत्यांगनांचा परंपरेनुसार बहारदार नृत्याचा कार्यक्रम आजही मसूरकरांची मने जिंकून जातो.

मिरज च्या सरदार डुबल घराण्याची गणेशोत्सवाची परंपराही सुमारे १७३४ साल पासूनची आहे, मिरज च्या किल्ल्यात गणपती बसून त्याची गावात मिरवणूक निघत असे.

पुण्यात नानासाहेब पेशव्यांच्या काळात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असे ,त्यासाठी त्यांनी शनिवारवाड्यात गणपती रंग महाल हि बांधून घेतला होता. नंतरच्या काळात याची ” Here the great festival in honour of Ganpati was celebrated with eclat every year in the bright half of Bhadrapad which lasted for ten days.” ब्रिटिशांनी केलेली हि नोंद हि आढळते.

या मराठाकालीन गणेशोत्सवांचे वर्णन तत्कालीन कागद्पत्राबरोबरच तत्कालीन परदेशी चित्रकारांच्या चित्रातही दिसते. शनिवार वाडा  येथील मराठा भित्तिचित्रे, तत्कालीन पेंटिंग्स, बर्नाड पिकार्ट सिरीज मधील गणपतीची चित्रे यातून तत्कालीन गणेशोत्सव, गणपतीची आरास यांचे दर्शन होते.

आता सांगा सर्वात जुना सार्वजनिक गणपती कोणता ते ?

चित्र – मराठेशाहीतील गणेशोत्सव

– मालोजीराव जगदाळे

Leave a Comment