मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग १२

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 3
4 Min Read

मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग १२ –

पेशवेकालीन प्रशासकीय पद्धती ‘माघारी शिक्याची’ चाल – पेशवाईच्या काळात प्रशासकीय कामकाजात ‘मुद्रा’ (शिक्का) हे अत्यंत महत्त्वाचे आणि अधिकृत मानले जाणारे साधन होते. हे आपणास माहीत आहे. परंतु सामान्यत एखादा पदाधिकारी बदलला किंवा मृत झाला की नवीन अधिकाऱ्याची मुद्रा अस्तित्वात येणे अपेक्षित असे. परंतु, काही विशेष परिस्थितीत एखाद्या कर्तबगार घराण्यातील अथवा प्रधानपदावर असलेल्या पुरुषाच्या मृत्यूनंतरही जिल्हेच्या पत्रांवर उमटवला जाणरा त्याचा मुतालकी शिक्का किंवा सनदापत्रावरील खासा शिक्का पुढे काही काळ चालु ठेवला जाई. या प्रशासकीय प्रथेला ‘माघारी शिक्याची चाल’ असे म्हणता येईल.

‘माघारी शिक्याच्या चालीची कारणे –
​पेशवाईत एखाद्या कर्तबगार पुरुषाच्या किंवा प्रधानपदावरील व्यक्तीच्या मृत्यूनंतर पुढील तीन मुख्य कारणांमुळे जुनाच खासा किंवा मुतालकी शिक्का काही काळ वापरला जात असावा,

१. सरकारी मान्यतेचा विलंब – नवीन नियुक्त केलेल्या व्यक्तीला व त्याच्या शिक्याला अधिकृत सरकारी मान्यता मिळेपर्यंत जुनाच शिक्का चालवावा लागे.

२. नवीन शिक्का तयार होण्यास लागणारा वेळ – नवीन शिक्का कोरून मिळेपर्यंत दैनंदिन आणि तातडीच्या सरकारी कामकाजात खंड पडू नये म्हणून जुना शिक्का वापरण्याची रीत होती.

३. बापाच्या मृत्युच्या पश्चात स्वतः च्या नावाचा शिक्का न बनवता बापाच्या नावाचाच शिक्का वापरुन आपल्या पुर्वजांच्या प्रति सन्मान आदरभाव राखणेसाठी.
​
याची दोन ऐतिहासिक संदर्भाने उदाहरणे देता येईल –
१. बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि थोरले बाजीराव पेशवे –
घटनाक्रम – २ एप्रिल १७२० पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाले.
१७ एप्रिल १७२० रोजा छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजीपंतांचे सुपुत्र थोरले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे दिली.
​
प्रसंग व विसंगती –
​७ डिसेंबर १७२१ रोजीचे (तर्फ निरथडी मधील मौजे परिंचे या गावचे) एक सारा वसुली संदर्भातील पत्र उपलब्ध आहे. दुष्काळामुळे बाळाजी विश्वनाथ यांनी जीवनमाफिक खंडणी ठरवून, सारा रकमेत सवलत देत मोकदमाच्या नावे नवीन कतबा लिहून दिला होता.
विशेष म्हणजे, बाळाजीपंतांच्या मृत्यूनंतर तब्बल १८ महिन्यांनी लिहीलेल्या या ७ डिसेंबर १७२१ च्या पत्रावर बाळाजी विश्वनाथ यांचाच मुतालकी शिक्का उमटवलेला दिसतो.
​
यामागील संभाव्य कारणे –
​१. बाळाजीपंतांच्या निधनानंतर अवघ्या १५ दिवसांत बाजीरावांना पेशवाईची वस्त्रे मिळाल्याने सरकारी मान्यता लगेच मिळाली होती. परंतु वस्त्रे प्राप्त होताच थोरले बाजीराव पेशवे लगेच खानदेशच्या मोहिमेवर रवाना झाले. त्यामुळे नवीन मुतालकी शिक्का बनवून घेण्यास उशीर झाला असावा आणि म्हणूनच जुनाच शिक्का वापरावा लागला असेल.
संदर्भ – पेशवे दफ्तर, रुमाल नं. ३९४ ( ऐतिहासिक परिंचे गाव पुस्तकात प्रकाशित पत्र)
​
२. अपवाद – शंकराजी नारायण पंतसचिव घराणे
​पदधिकारी बदलताच मुद्रा बदलण्याची प्रथा असली, तरी याला पंतसचिव घराणे हे एक प्रमुख अपवाद ठरले.
पंतसचिवांचे शिक्के – शंकराजी नारायण पंतसचिव यांचे संस्कृत आणि मराठी असे दोन शिक्के होते.
कायमस्वरूपी वापराची परंपरा – इ.स. १७०७ मध्ये शंकराजी नारायण यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतरही या घराण्यात पुढील काळात “श्री शंकराजी नारायण” असा मजकूर असलेला मूळ शिक्काच शेवटपर्यंत वापरला गेला.
याचा ऐतिहासिक संदर्भ – १४ सप्टेंबर १७२७ च्या एका महजर पत्रावरून हे स्पष्ट होते. एका न्यायनिवड्याच्या प्रसंगी ‘नारो शंकर सचिव’ हे हाजीर मजालिस म्हणून उपस्थित होते; परंतु पत्रावर त्यांनी स्वतःच्या नावाऐवजी वडिलांचा शंकराजी नारायण पंतसचिव यांचाच शिक्का उमटवला होता.
​
संदर्भ: पुरंदरे दफ्तर, भाग १, लेख ८९, पृष्ठ ५९

निष्कर्ष – पेशवेकालीन दफ्तरांचा आणि निवाडपत्रांचा अभ्यास करताना ‘माघारी शिक्याची चाल’ ही अत्यंत महत्त्वाची ठरते. केवळ कागदावरील शिक्याची कोणाचा किंवा शिक्क्यातील नाव पाहून दस्तऐवजाचा काळ ठरवणे चुकीचे ठरू शकते; कारण सत्तांतर किंवा अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतरही काही महिने (किंवा पंतसचिवांसारख्या अपवादात्मक प्रकरणात पिढ्यानुपिढ्या) जुनेच शिके अधिकृत मानून वापरले जात असत.

राम वाघोले

Leave a Comment