महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

सेनापती संताजी घोरपडे

By Discover Maharashtra Views: 2436 12 Min Read

सेनापती संताजी घोरपडे –

“ सेनापती संताजी घोरपडे “ यांचे नाव ऐकताच शत्रूच्या हृदयात धडकी भरत असे त्यांचे घोडेही पाणी पीत नसत. संताजी घोरपडे यांचा जन्म अंदाजे १६४२ – ४५ च्या सुमारास झाला . छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली त्यावेळी धारातीर्थी पडलेल्या म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे सुपुत्र संताजी घोरपडे . सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या सोबत मोहिमेवर संताजी होते. सप्तप्रकरणात्मक चरीत्रनोंदीनुसार इ.स. १६७४ साली मराठा सैन्यात जुमलेदाराचा हुद्दा मिळाला. “ संताजी घोरपडे यांनी कामे बहुत केली .शिपाई मर्द जाणोन हंबीरराव यांणी विनंती केलियावरून तैनात जाजती करून जुम्लेदारी दिल्ही “. शिवाजी महाराजांनी इ.स. १६७९ जालनावर स्वारी केली त्यावेळी संताजी या मोहिमेत सहभागी होते. मोहिमेत त्यांच्याकडून उतावीळपणा झाला त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मुजऱ्यास येण्यास मनाई केली. ९१ कलमी बखरीनुसार “ संताजी घोरपडे यांनी युद्ध समयी उतावळी केली म्हणोन इतराजी होऊन मुजरेयासी येऊ दिले नाही. “ सभासद त्याच्या बखरीत लिहितो शिवाजी महाराजांनी “ संताजी घोरपडे व बहिरजी घोरपडे व धनाजी जाधव हे जरी वाचले तरी मोठा पराक्रम करतील “ असे उदगार काढले. म्हणजे खुद्द शिवाजी महराजांना देखील त्यांच्याबद्दल विश्वास होता .

संभाजी महाराजांच्या काळात संताजींच्या प्रराक्रमाच्या विशेष नोंदी आढळून येत नाहीत . औरंजगजेबाने संभाजी महाराजांची केलेली क्रूर हत्या व रायगडास मोगलांचा वेढा पडल्यामुळे छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजीस जाण्याचा निर्णय घेतला. अशा बिकट प्रसंगी रणमार्तंड संताजी घोरपडे यांच्या प्रराक्रमाचा उदय झाला. औरंगजेबाची छावणी तुळापुर येथे होती. औरंगजेबाच्या छावणीवर छापा घालून त्याच्या तंबूचे तणावे ( दोर ) व डेऱ्याचे सोन्याचे कळस कापून ते सिंहगडाच्या पायथ्याशी आले. तेथे दोन दिवस मुक्काम करून रायगडास वेढा देवून बसलेला मोगल सरदार जुल्फकार याच्या फौजेवर छापा घातला. मोगली सैन्याचे हानी करत त्यांचे पाच हत्ती पकडून आणले. छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्यावर वास्तव्यास होते त्यांच्यासमोर बादशाहच्या डेऱ्याचे कळस व पाच हत्ती नजर केले. राजाराम महाराजांनी खुश होऊन त्यांना वस्त्रे , आभूषणे व किताब दिले. राजराम महाराजांच्या चरित्रात याविषयी माहित येते “ प्रथम लढाई शिवाजी महाराजांचे नावावर केली , यश आले, आणि पाद्शाहाच्या डेऱ्याचे कळस हस्तगत झाले, पाच हत्ती मिळाले, हा संतोष मानून संताजी घोरपडे यांस “ ममलकतमदार “ किताब दिला.

संताजी घोरपडे यांस सेनापतीपदाची प्राप्ती :- चिटणीस बखरीनुसार बादशाहाच्या डेऱ्याचे कळस काप्नून आणल्याने त्यांना रामचंद्र अमात्य यांच्या विनंतीनुसार सेनापतीची वस्त्रे शके १६१० , विभवनाम संवत्सरे , श्रावण शुद्ध ५ स दिली ( इ.स. १६८९ ). परंतु याविषयी मतमतांतरे आहेत संताजी घोरपडे यांना सेनापतीची वस्त्रे इ.स. १६९१ च्या सुरवातीस दिली गेली असावीत .

राजाराम महाराज जिंजीस जाण्यास निघाले त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा कारभार रामचंद्र अमात्य यांच्याकडे सोपवला व त्यांच्या मदतीस शंकराजी नारायण, संताजी घोरपडे व धनाजी जाधव दिले. राजाराम महाराज बिद्नुरची राणी चेनम्मा हिच्या मुलकातून जात असताना तिने त्यांना आश्रय दिला व आपल्या राज्यातून सुखरूप जाण्यास मदत केली म्हणून औरंगजेबाने जाननिसारखान सरदारास कर्नाटकात रवाना केले. “ मासिरे आलमगिरीतील नोंदीनुसार “ जाननिसार खानाला मोठ्या तुकडीनिशी त्या अस्वलणीवर ( राणी चेनम्मा ) चालून जायचा आदेश झाला. तेंव्हा त्या सैतानी संताने ( संताजी घोरपडे ) यशस्वीपणे खान , मतलबखान व सारजा खानाला थोपवले. शेवटी त्या राणीने दंड म्हणून थोडी रक्कम देवून ते प्रकरण मिटवले.

संभाजी महाराजांना कैद करणारा शेख निजाम याचे पारपत्य करण्यासाठी रामचंद्र अमात्यांनी संताजीस धाडले त्याचे वर्णन राजारामचरित्रंम ( जिंजीचा प्रवास ) या संस्कृत साधनांत आढळून येते. :- इकडे निजामाला जिंकण्यासाठी पाठविलेल्या संताजी घोरपड्यादिकांनी प्रथम निजामाचा पराभव करून त्याचे हत्ती, घोडे , व पुष्कळ द्रव्य हरण केले. तेंव्हा अंगावर जखमा झालेला निजाम कसाबसा जीव बचावून करवीरास पळून गेला . नंतर घोरपड्यादि मंडळी रामचंद्रपंताला जाऊन मिळाली.

ताराबाई कालीन कागदपत्रे :- “ राजश्री संताजी बिन मालोजी घोरपडे सेनापती – राजश्री छत्रपती स्वामी कर्नाटकात जाते समई तुम्हास या प्रांते ( महाराष्ट्रात ) ठेवून गेले . त्या समई इकडे गनिमाची धामधूम बहुत कुल देश व दुर्गे हस्तगत केली होती. राज्यामध्ये काही अर्थ उरला नाही . कुल मऱ्हाठी यांनी इमान खता करून गनीमाकडे गेले. परंतु तुम्ही इनाम ( संताजीने ) खता न करिता राजश्रीच्या पायाशी बहुतच येकनिष्ठा धरून जमाव करून सेख निजाम व सर्ज्याखान व रणमस्तान व ज्यानसरखान येसे उमदे वजीर बुडविले ! जागा जागा गनिमास कोठ्या घालून नेस्तनाबूद केले आणि देश सोडविला . राज्य संवरक्षणाचे प्रसंगास असाधारण श्रम केले. औरंगजेबास दहशत लावली . पुढेही कितेक स्वामी कार्याचे ठायी हीमत धरिता .

संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाची धास्ती :-

( चिटणीस बखर ) :- “ मोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणी न पीत . त्यांस मोगली लोकांनी म्हणावे जे पाण्यामध्ये धनाजी व संताजी दिसतो कि काय ? रात्री दिवसा कोणीकडून येतील, काय करतील असे केले.

औरंगजेबाचा समकालीन चरीत्रकार खाफीखान लिहितो :- “ समृद्ग शहरांवर हल्ला करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संतांजीची खूपच प्रसिद्धी झाली होती . ज्याला ज्याला म्हणून संतांजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला, त्याच्या त्याच्या नशिबी खालील तीनपैकी एक परिणाम ठेवलेला असे. एकतर तो मारला जाई. किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे किंवा त्याच्या सपाटून पराजय होई आणि त्याचे सैन्य व बाजारबुणगे गारद होत . आपण जीवानिशी सुटलो हाच आपला पुनर्जन्म झाला , असे त्यास वाटे.

खाफीखान सेनापती संताजीस “ नालायक , हलकट , कुत्रा ” अशी शिव्यांची लाखोली वाहतो. डॉ. जयसिंगराव पवार लिहितात खाफीखानाने संताजींच्या मृत्यू नंतर आपला ग्रंथ तयार केला. असला तरी , संताजीने मोगली फौजांवर केलेले आघातच एवढे जबरदस्त होते की त्याच्या जखमा खाफिखानाच्या मनात त्यावेळीही ओल्या होत्या . म्हणूनच संताजीविषयी लिहिताना त्याच्या लेखणीस संयम राहत नाही. खाफीखान लिहितो “ युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून तो नालायक आणि हलकट कुत्रा ( संताजी ) तयार होऊन जाई तिकडे तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशहाच्या प्रतीष्टीत सरदारांनपैकी एकही तयार होत नसे ! जगाला धडकी भरून सोडणारी फौज घेऊन तो कोठेही पोहचला की नरव्याघ्राप्रमाणे असलेल्या अनुभवी योध्यांची ह्रदये कंपायमान होत. “

संताजी घोरपडे आणी धनाजी जाधव व राजाराम महाराज यांच्यात वितुष्ट :- जदुनाथ सरकार लिहितात “संताजी व धनाजी हे उच्च दर्जाचे लष्करी लोक होते, मात्र आयुष्यभर एकमेकांशी शत्रुत्व बाळगून राहिले .”

जिंजीतील मोगल सरदार जुल्फीकारखान हा मराठा फौजांच्या कचाट्यात सापडला असता त्याचा नायनाट करावा असे संताजींचे मत होते परंतु राजाराम महाराजानी जुल्फीकारखानास सुखरूप जाऊ दिले यामागे राजराम महाराज व जुल्फीकारखान यांचे अंत:स्थ राजकारण होते. परंतु यामुळे संताजी घोरपडे नाराज होऊन दुखावले गेले. जेधे शकावलीनुसार “ वैशाख मासी संताजी घोरपडे राजारामसीही बिघाड करून देशास गेले. त्यावरी धनाजीस नामजाद केले. परंतु हुकुमतपनाह रामचंद्र अमात्य यांनी मध्यस्थी करून समेट घडवून आणला.

कासीम खान व हिंम्मत खान अशा अनेक मोगली सरदारांना संताजी यांनी युद्धात धूळ चारली परंतु छत्रपती राजाराम महाराजांनी याबाबत संताजींचे कौतुक केले नाही व धनाजी जाधवांचा गौरव केला . त्यामुळे संताजी व धनाजी यांच्या दुरावा निर्माण होऊन आयवारकुटी येथे संताजी व धनाजी यांच्यात युद्ध होऊन त्यात धनाजी जाधव यांचा पराभव झाला व या युद्धात अमृतराव निंबाळकर मारला गेला.

जेधे शकावलीनुसार :- जेष्ठ वद्य ४ भोम वासर घटिका ४ पले ९ धनिष्ठा ४३ विश्यंकयोग २९/९ रात्रो घटी १८/१० राजा चैत्र मासी राजारामाच्या दर्षनास संताजी घोरपडे चंदीस गेले. जेष्ठ मासी बिघडोन कची अलीकडेस भांडण जाले. धनाजी जाधव पलोन देशास आला . अमृतराव निंबाळकर पडीला . संताजीची फत्ते जाली.

भीमसेन सक्सेना तारीखे दिलकुशा म्हध्ये लिहितो :- धनाजीने राजारामाचे मनात मनात असे भरवून दिले कि, संताजी आता कोणाचेच हुकुम मानीत नसून त्याचा इरादा स्वतंत्र होण्याचा आहे. त्याला मृत्युचीच शिक्षा दिली पाहिजे . असा बेत ठरवून राजाराम व धनाजी अमृतराव निंबाळकरास आघाडीवर ठेवून संताजीवर चालून गेले . लढाई होऊन अमृतराव मारला गेला .

साकी मुस्तेदखान मासिरे आलमगीरीत लिहितो :- राजारामला घेऊन जाणाऱ्या धना जाधव याच्याशी त्याचे जुने वैर होते. त्यामुळे जिंजीला जाताना त्याची धनाशी झटापट झाली. संताचा विजय झाला व त्याने धनाचा साहाय्यक व नागोजीचा मेहुणा अमृतराव , याला पकडून हत्तीच्या पायी दिले. त्याने राजा रामाला पण पकडले. पण धना ( धनाजी ) निसटला. दुसऱ्या दिवशी संता ( संताजी ) हात बांधून राजा रामाच्या समोर आला व म्हणाला की , “ मी पुर्विचाच सेवक आहे. तुम्ही धनाला माझ्या बरोबरीचा मान दिलात व जिंजीला त्याच्या मदतीने जायचे ठरवलेत म्हणून मला राग अनावर झाला. आता तुम्ही सांगाल ती सेवा मी करायला तयार आहे. त्याने राजारामाला सोडले व जिंजीला घेऊन गेला.

संताजी घोरपडे सेनापती पदावरून निलंबित :-

ऑक्टोंबर १६९६ रोजी संताजी घोरपडे यांना सेनापती पदावरून दूर करण्यात आले व त्यांच्याकडील फौज छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या बाजूने करून घेतली.

पेशवे दफ्तर ३१/ ६८ : – संताजी घोरपडे याणी स्वामीच्या पायाशी हरामखोरी केली. याकरिता त्यास सेनापतीचा कार्यभार होता. तो दूर करून फौज हुजूर आणविली.

संताजी घोरपडे यांचा खून :- सेनापती पदावरून संताजी यांना काढल्यानंतर त्यांना विशेष अशी कोणतीही कामगिरी न देता त्यांच्या जवळील फौज काढण्यात आली त्यामुळे त्यांची लष्करी ताकद कमी झाली. राजाराम महाराजांच्या आज्ञेने धनाजी जाधव संताजीवर चालून आले. विजापूरला त्यांच्यात युद्ध झाले. त्यात संताजींचा पराभव झाला व त्यांनी या युद्धातून माघार घेतली.

मोगल सरदार गाजीउद्दीनखान फिरोजजंग बाद्शहाच्या आदेशाने संताजीवर चालून आला. त्यामुळे एकीकडे मोगली फौजा व दुसरीकडे धनाजी जाधव यांच्या फौजा यांच्या कचाट्यात संताजी घोरपडे सापडले.

जेधे शकावलीनुसार :- चैत्र मासी संताजी सातारा प्रदेशात आला आणि त्याचा पाठलाग करीत गाजीऊद्दीन मागून गेला.

धनाजींच्या सैन्यातील हणमंतराव निंबाळकर संताजीचा पाठलाग करत राहिला त्यामुळे संताजी घोरपडे यांना शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या डोंगरात आश्रयास जावे लागले. तेथे नागोजी माने याने आपला मेव्हणा अमृतराव निंबाळकर ज्यास संताजीने हत्तीच्या पायी दिले होते त्याचा सूड घेण्यासाठी नागोजी माने याने बायकोच्या सांगण्यावरून संताजी घोरपडे एका ओढ्यावर अंघोळ करत असताना अचानक हल्ला करून संतांजीस ठार केले . संतांजीचे मस्तक धडावेगळे करून ते तोबऱ्यात भरून घोड्यावरून जात असताना तोबऱ्यातून त्यांचे मस्तक जमनीवर पडले. मोगली सरदार फिरोजजंग यास हे मस्तक सापडले ते त्याने बादशहास पाठवले . बादशाहने खुश होऊन त्यास बक्षिसी दिली.

जेधेशाकावली :- “ आषाढ मासी संताजी घोरपडे यांसी नागोजी माने याणी महादेवाजवळ दगा देवून मारिले “

संताजी घोरपडे समाधी ( मराठ्यांची धारातीर्थे , प्रवीण भोसले ) :- १८ जून १६९७ रोजी मराठ्यांच्या आपसातील वादामुळे संताजी घोरपडे मारले गेले. संताजी घोरपडे यांच्या तीन समाध्या कण्हेर , कापशी व कारखेल या ठिकाणी आहेत . संतांजीची हत्या कण्हेर येथे झाली . त्यांचे शीर कारखेल येथे पडले . अस्थीकलश कापशी येथिल समाधीत असल्याने मुख्य समाधी कापशी येथील मानली जाते .

संताजी घोरपडे यांची मुद्रा :-

( १ ) श्री राजारामचरणी तत्पर /

संताजी घोरपडे निरंतर //

( २ ) श्री राजारामभूपाल भक्तसेनापते शुभा /

संताजी घोरपडे तस्य मुद्रा भाती जयप्रदा //

श्री . नागेश सावंत

संदर्भ :- राजाराम महाराज चरित्र ( जिंजीचा प्रवास ), पेशवे दफ्तर ३१ ,चिटणीस बखर , ९१ कलमी बखर , ताराबाईकालीन कागदपत्रे , पेशवे दफ्तर ३१, जेधे शकावली.
मासिरे आलमगिरी : -रोहित सहस्तबुद्धे.
सेनापती संताजी घोरपडे :- जयसिंग पवार.
सेनापती धनाजी जाधव :- सदाशिव शिवदे.
छायाचित्र साभार गुगल.

Leave a comment